Aanandyogeshwar maharaj
Home
Jeevan Charitra
Bhau's Quotes
Anubhav
Photos
 
Naam Chintanane Chintamukta Vha
Name: Megha Sawant
My Experience


नाव : सौ मेघा महादेव सावंत वय : 55 सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज उर्फ परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांच्या 'आनंदयोग धाम' या पादुका स्थानावर मी २१ मार्च २०१० सालापासून येऊ लागले. माझ्या पतींना २००७ पासून अपचनाचा गंभीर त्रास होत होता. आनंदयोग धाम या पादुका स्थानाविषयी, सद्गुरू भाऊ महाराजांविषयी तसेच गुरुमाऊली परमपूज्य श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ यांच्याविषयी माझ्या भावाने त्याच्या शैलेंद्र नावाच्या मित्राकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे माझा भाऊ व मी रविवारच्या आरतीला शैलेंद्रसोबत गेलो. तिथे गेल्यावर लक्षात आले की आनंदयोग धाम हे परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांचे पादुका स्थान आहे. त्याच प्रमाणे या ठिकाणी प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ राऊळ महाराज आणि परमपूज्य सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांची नित्य उपासना चालते.

पादुका स्थानावर होणार्‍या एका सुरात, एका तालात लयबद्ध आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या आरत्या माझ्या मनाला खूप भावल्या. आरती व गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊंचे प्रवचन ऐकण्यासाठी मी नालासोपारा येथून दर रविवारी येऊ लागले. गुरुमाऊली परमपूज्य श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ हे दांपत्य संसारात राहून परमार्थ कसा करावा,याची शिकवण आम्हा भक्तांना स्वतःच्या आचरणातून देत आहेत. त्यांनी सद्गुरू भाऊ महाराजांची स्पंदने नामस्मरणाच्या व नाम जपाच्या माध्यमातून आम्हा भक्तांना पर्यंत पोचविली आणि नामस्मरणाची गोडी निर्माण केली. भक्तांच्या कल्याणासाठी हे दाम्पत्य आपला देह झिजवत आहे, याची हळूहळू मला जाणीव होऊ लागली.

या पादुका स्थानावर येण्यापूर्वी सद्गुरु-तत्वाविषयी काहीच ज्ञान मला नव्हते. आमच्या गुरुमाऊली परमपूज्य श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ या ज्ञानसागराकडून पदोपदी ज्ञान मिळत गेले. ते नेहमी सांगतात की, सद्गुरू-तत्त्वा प्रति जे आपले आचरण असते तीच भक्ती होय. नि:स्वार्थी सेवाभाव ठेवून सगुण-साकार रूपाची सेवा कशी करावी हे त्यांच्याकडूनच मला शिकायला मिळाले. स्थानाची शिस्त काटेकोरपणे याठिकाणी पाळली जाते. इथे येणारा तरुणवर्ग तर खूपच भाग्यवान आहे. कारण या ठिकाणी त्यांना संस्काराचे बाळकडू पाजले जाते. गुरुमाऊली परमपूज्य सौ श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ यांच्याकडून प्रत्येक भक्ताला भरभरून प्रेम मिळत असते आणि मग ते भक्त या स्थानाचा एक अविभाज्य घटक बनतात. प्रत्येक भक्त आनंदी कसा राहील यासाठी दोघांची तळमळ मला प्रकर्षाने जाणवली. या स्थानावर विचारांची देवाण-घेवाण होते. लहान मुलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर अगदी गर्भापासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी गुरुमाऊली सौ श्रद्धा आई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊ झटत असतात. प्रत्येक भक्तामधील चांगला गुण वाखाणला जातो. लहान मुलांच्या सुप्त गुणांना येथे वाव दिला जातो. त्यांच्यातील कलागुणांचा विकासाच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन दिले जाते. वैयक्तिक विकास साधण्यासाठी दोघांचे मार्गदर्शन लाभदायक असते. या स्थानावर नामस्मरणाचा संकल्प केला जातो. नामस्मरणाच्या चैतन्यमय वातावरणात आम्ही भक्तही नामात रंगून जातो. असे क्षण संपूच नये असे प्रत्येकाला वाटत असते. स्थानावर अनेक उत्सव साजरे केले जातात. गाणगापूर यात्रा उत्सव, परमपूज्य भाऊ महाराज यांची पुण्यतिथी,प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी, आनंदयोग धाम स्थानाचा वर्धापन दिन, गुरुपौर्णिमा, परमपूज्य भाऊ महाराज यांची जयंती, दत्त जयंती असे उत्सव साजरे करताना अनेकांना वेगवेगळ्या सेवेच्या संधी सहजतेने उपलब्ध होतात. दरवर्षी अध्यात्मिक शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात भक्तांमध्ये अध्यात्मिक बीज पेरले जाते. मनोरंजनात्मक खेळ खेळले जातात. त्यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत चे सर्व भक्त हिरिरीने भाग घेतात आणि आनंद घेत असतात. त्या खेळाद्वारेही सद्गुरु आम्हा भक्तांना शिकवण देत असतात. सद्गुरू भाऊ महाराजांनी स्वतः सिद्ध केलेला 'नमो गुरवे निळकंठाय' हा नामजप आम्हा भक्तांच्या श्वासामध्ये असला पाहिजे, असं गुरुमाऊली श्रद्धाई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊ नेहमी सांगत असतात. या नामजपाने माझ्यासारख्या सेवकांमध्ये सकारात्मक बदल घडून येतोय, हे स्वतःला जाणवते. या सर्व गोष्टींमुळेच मला या स्थानाविषयी हळूहळू आस्था निर्माण झाली आणि मी एकही खंड न पडता दर रविवारी आरतीला येऊ लागले. सर्व सेवांमध्ये सहभागी होऊ लागले.

गुरुमाऊली परमपूज्य सौ श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ यांच्या माध्यमातून अनेक भक्तांना अनुभव आले. पण ते आम्हा भक्तांना नेहमी सांगत असतात की हे आम्ही नाही केलं तर सद्गुरू भाऊ महाराजांनी केलं. ही सगळी त्यांची आमच्यावर असलेली कृपा आहे. या सद्गुरु परमपूज्य भाऊ महाराज स्वरूप दाम्पत्यांने अनेक भक्तांच्या समस्या सोडवल्या आहेत. मलाही अनेक प्रचिती आल्या आहेत. माझ्या पतीना २००७ पासून अपचनाचा गंभीर त्रास होत होता. त्यांना इतके ढेकर यायचे की ते बोलू शकत नव्हते आणि रात्रभर झोपू शकत नव्हते ज्या दुकानात ते काम करत होते तिथे ते सेल्समन होते. त्यामुळे बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. पण काहीच उपयोग झाला नाही. एकदा वैतागून ते म्हणाले "मी सगळे उपचार घेणं बंद करणार." हे ऐकून मला खूप टेन्शन आलं. मी माझ्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ज्योतिषाकडे गेले. त्या ज्योतिषांनी मला सांगितले की,"तुमच्या पतीचा येत्या सहा महिन्यात मृत्युयोग आहे." हे ऐकून छातीत धस्स झाले. पायाखालची जमीन सरकली. मी माझ्या भावाला सगळं सांगितलं. त्याचा मित्र शैलेंद्र यांच्याकडून माझ्या भावाने बऱ्याच वेळा सद्गुरू भाऊ महाराज, गुरुमाऊली श्रद्धाई व गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ यांच्याविषयी ऐकले होते. त्यामुळे माझ्या भावाने शैलेंद्रला माझ्या पती विषयी सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार मी व माझा भाऊ त्याच्या सोबत २१ मार्चला रविवारच्या आरतीच्या वेळी पादुका स्थानावर गेलो. आरती संपल्यावर शैलेंद्रने गुरुवर्य सौ श्रद्धाई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊंना सगळं सांगितलं. तेव्हा मला खूप रडू आलं. त्यांनी मला खूप धीर दिला आणि म्हणाले "काही चिंता करू नको. ११ रविवारी आरतीला या." गुरुमाऊली सो. श्रद्धाई यांनी मला त्यांनी स्वतः लिहिलेलं 'सद्गुरु आनंद योगेश्वर एक साक्षात्कारी अनुभूती... भाग एक' हे पुस्तक वाचायला दिले. ११ रविवार पूर्ण झाल्यावरही मी पुढे सातत्याने आरतीला येऊ लागले. दरम्यान माझ्या पतींचा अपचनाचा त्रास कमी होऊ लागला. सगळी औषधे बंद करूनही आजतागायत त्यांची प्रकृती सद्गुरू भाऊ महाराजांच्या कृपेने चांगली आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी पहिली प्रचिती आहे.

माझे पती वसई येथे एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये नोकरी करत होते. त्यांनी एकवीस वर्षे नोकरी केल्यावर २०१२ मध्ये सद्गुरू भाऊ महाराजांच्या कृपेने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नालासोपारा येथे इलेक्ट्रॉनिक शोरूम उघडले. हा व्यवसाय सद्गुरूंच्या कृपादृष्टीने चांगला चालू आहे. मुंबईसारख्या ठिकाणी दहिसर येथे २०१३ मध्ये केवळ सद्गुरू भाऊ महाराजांच्या आणि सद्गुरू समर्थ अण्णा महाराजांच्या कृपेने मोठं घर घेऊ शकलो. स्वप्नात देखील विचार केला नव्हता आम्ही मोठं घर घेऊ शकू. गुरुमाऊली श्रद्धाई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊ यांना आम्ही सांगितले की आम्हाला दहिसरला घर घ्यायचे आहे. पण वन रूम किचन किंवा वन बेडरूम किचन कारण आमचं जास्त बजेट नव्हतच मुळी. त्यांनी शोधलेलं घर मी आणि माझे पती बघायला गेलो. किंमत ऐकून माझ्या पतीच्या मनात आलं की हे तर आपल्या आवाक्याबाहेर आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी होणार? पण सद्गुरु परमपूज्य श्री विकासभाऊ माझ्या पतींना म्हणाले, "तुम्ही टोकन द्या. पैशाची काळजी करू नका. तुमचं काम होईल." सद्गुरु आपले शब्द कधीच खाली पडू देत नाहीत, याची प्रचिती यावेळी आली. एका महिन्यात लोनची व्यवस्था झाली. सगळं वेळेत झालं. अजूनही माझे पती सांगत असतात की, "हे कसं काय झालं ते मला अजुन कळलेच नाही." कारण ते आम्ही नाही, तर सद्गुरु सर्व घडवत होते.

अजून एक खूप मोठी अनुभूति आम्हाला ३ महिन्यांपूर्वी आली. एप्रिल २०२१ मधील घडलेला प्रसंग. जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा आमच्या कुटुंबातील माझी पावणेतीन वर्षाची नात, माझे पती, सून आणि मी कोरोनाने बाधित झालो. सद्गुरू कृपेने माझ्या नातीला काहीच त्रास झाला नाही. कोरोना झाल्यावर आठ दिवसांनी माझे spo2 ८५ला आलं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता. पण सद्गुरू कृपेने लगेच बेड उपलब्ध झाला. हॉस्पिटल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असताना spo2 तपासले असता ९८ आला. मी पुन्हा पुन्हा ऑक्सीमीटरकडे बघत होते. हा तर सद्गुरूनी केलेला चमत्कारच म्हणावयाचा! नऊ दिवसांनी मी बरी होऊन घरी आले तेव्हा मला वाटलं की मी नवीन जन्मच घेऊन आले. त्यावेळी सद्गुरू समर्थ अण्णा महाराज स्वतः मला रोज फोन करत होते. मला धीर देत होते. तसंच सद्गुरु गुरुमाऊली सौ.श्रध्दाई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊ हे अखंड दिवस-रात्र आमच्यासाठी जप करीत होते. सद्गुरू भाऊ महाराजांना कळकळीने प्रार्थना करीत होते. त्यांना जास्त काळजी होती ती माझ्या मुलाची. त्याला अस्थमा असल्यामुळे फार जपा असं वर्षभर ते कळवळून सांगत होते. पण घरातल्या त्याला सोडून बाकी सगळे बाधित झाले होते. तो आमच्यामध्ये वावरत होता. त्याच्या लहान मुलीला घेत होता. त्यामुळे त्याने त्या दरम्यान तीन वेळा कोरोनाची चाचणी केली पण निगेटिव्ह आली. कारण त्यावेळी सद्गुरूंनी त्याची काळजी घेऊन त्याला सांभाळलं. गुरुमाऊली सौ. श्रद्धाई आणि गुरुवर्य श्री विकास भाऊ यांनी आमची लहान बाळाप्रमाणे काळजी घेतली. दोन्ही वेळचे जेवण, नाष्टा स्वतः करून पाठवत होते. वेळीच औषधे घ्या, गरम पाणी प्या, वाफ घ्या असं पुन्हा पुन्हा फोन करून सांगत होते. हे दोघेही जण आम्हाला हे पोटतिडकीने सांगायचे पहिली लाट आली तेव्हापासून. पण आमच्या निष्काळजीपणामुळे आम्ही कोरोना बाधित झालो. सद्गुरूनी आम्हा सगळ्यांना यातून तारून नेलं.

हल्लीच आलेला खूप मोठा अनुभव : ११ जुलै २०११ रोजी रात्री नऊ वाजता घडलेला हा प्रसंग आहे. आमच्या बेडरूममधील टीव्ही त्यावेळी चालू होता. टीव्ही खाली स्वीच बोर्ड आहे. त्याला थ्री पिन लावली होती. माझ्या पावणे तीन वर्षाच्या नातीने ती पिन हाताने हलविली आणि क्षणात स्पार्क होऊन आग लागली. माझ्या सुनेने बघितल्यावर लगेच तिला बाहेरच्या रूम मध्ये घेऊन आली. माझ्या मुलाने मेन स्वीच बंद केला तरी आगीच्या ज्वाळा वाढतच होत्या. आम्ही इतके घाबरलो होतो की आम्हाला काही सुचतच नव्हते. मी मनात सद्गुरूंचा धावा केला. माझ्या पतींनी जवळ जाऊन हाताला लागलेले माझ्या नातीचे स्वेटर घेऊन आग विझविली. टी.व्ही. त्या बोर्डाच्या वर फिट केला होता. त्यामुळे आगीच्या ज्वाळा टीव्हीवर जात होत्या. आम्ही त्याच क्षणी विचार केला की आता टीव्ही नक्कीच बिघडला. पण इलेक्ट्रिशियनला बोलावून जेव्हा स्विच बोर्ड ठीक केला तेव्हा बघतो तर काय! टीव्ही चालू झाला. यात सर्वात मोठी अनुभूती म्हणजे माझ्या नातीला त्यावेळी काहीच इजा झाली नाही. तिला शॉक लागून काही होऊ शकले असते. त्यामुळे या वेळीही सद्गुरू भाऊ महाराजांनी यातून तारून नेले.

सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या कार्याची ज्योत परमपूज्य गुरुमाऊली सौ. श्रद्धाई आणि गुरुवर्य परमपूज्य श्री विकास भाऊ या दांपत्याच्या हृदयात तेवत आहे. सद्गुरू भाऊ महाराजांचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य हा त्यांच्या जीवनाचा श्वास आहे. मी आनंदयोग धामच्या भक्त परिवारातील एक सदस्य म्हणून खरोखरच खूप भाग्यवान आहे; कारण मला परमपूज्य सौ.श्रद्धाई आणि परमपूज्य श्री विकास भाऊंसारखे सद्गुरु लाभले. तसेच त्यांच्याच माध्यमातून परमपूज्य सद्गुरु समर्थ अण्णा महाराजांसारख्या सत्पुरुषाची प्रत्यक्ष सेवा करण्याचा लाभ मला मिळाला. माझे जीवन धन्य झाले. परमपूज्य सद्गुरू समर्थ अण्णा महाराज, परमपूज्य सौ. श्रद्धाई आणि परमपूज्य श्री विकास भाऊ यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत.
--------------------------

Back  Previous  Next
Aanandyog
Aanandyog Dham
Events
Namasmaran
Downloads
Contact
 




English Version         Marathi Version         Gujarati Version

Copyright © 2017 Anandyog Dham