प्रस्तावना
"नामचिंतनाने चिंतामुक्त व्हा" असा संदेश देणा-या सद्गुरू भाऊमहाराजांचे अध्यात्मिक जीवनकार्य अगदी जवळून बघण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. १९८४ सालामध्ये, ज्यावेळी सदगुरू भाऊमहाराजांनी त्यांच्या सदगुरूंचे म्हणजे प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचे मोठे पादुका स्थान बोरीवली या ठिकाणी स्थापन केले; त्यावेळी झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. सदगुरू भाऊमहाराजांकडे असलेल्या अद्वितीय शक्तीची प्रचिती अनेकांना वेळोवेळी मिळाल्यामुळेच त्यांचा भक्तवर्ग हळूहळू वाढू लागला. सद्गुरू भाऊंचा अतिशय विनम्र स्वभाव, बोलण्यातील माधुर्य यांसारख्या गुणांमुळे त्यांनी अनेकांना आपल्याबरोबर जोडून घेतले.
परमहंस परिवाजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य जोमाने पुढे नेण्यासाठी सदगुरू भाऊमहाराजांनी भक्तीमार्गातील अतिशय साधे व सोपे असे नामाचे साधन निवडले. नामाच्याच माध्यमातून त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या कार्याची कक्षा वाढवत नेत, अनेक जीवांना आनंद देत, 'ओम् सदगुरू प्रतिष्ठान' या श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या स्थानाची तथा अध्यात्मिक संस्थेची स्थापना करून, आपल्या सद्गुरूंच्या प्रति असलेल्या आत्यंतिक भावनेला मूर्त स्वरूप दिले. राजा ते राजाभाऊ, राजाभाऊ ते परमपूज्य भाऊमहाराज करंदीकर व भाऊमहाराज करंदीकर ते सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज अशा चढत्या क्रमाच्या त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक प्रगतीचा मी एक साक्षीदार आहे, याचा मला अतिशय आनंद आहे.
परमपूज्य भाऊंची दोन वैशिष्ट्ये मला जास्त भावली. बरेच महाराज दाढी वाढवून रंगीबेरंगी कपडे घालून बाह्यांगाने महाराज म्हणून वावरतात. परमपूज्य भाऊमहाराज असे कोणतेही बाह्यांगाचे प्रदर्शन न करता, सामान्य माणसासारखे स्वच्छ लेंगा झबा घालून वावरत. त्यामुळे ते सर्वांना अधिक जवळचे वाटत.
परमपूज्य भाऊंचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, सध्याच्या जलद युगात त्यांनी तिन्ही 'योग' जपले. आपले सद्गुरू श्रीटेंबे स्वामी महाराज यांच्या प्रति असलेल्या अपार भक्तीभावातून त्यांनी अध्यात्मातील 'भक्तीयोग' साधला. अतिशय स्वच्छ रहाणी, सर्व दैनंदिन व अध्यात्मिक क्रियाकर्म निष्ठापूर्वक आचरून 'कर्मयोग' जपला. आपल्या विलक्षण बुद्धीने, प्रवचनांद्वारे 'ज्ञानयोग' ही साधला. त्यांनी भक्ती, कर्म व ज्ञान या तिन्ही योगांचा उत्तम संगम साधून तो समाजापर्यंत पोचवण्याचा अखंड प्रयत्न केला. त्यामुळे ते खरे 'आनंदयोगी' झाले, हे तिन्ही योग आचरणात आणणारे संत क्वचितच आढळतात, सद्गुरू भाऊंचे श्रेष्ठत्व तर उच्च कोटीचे होते.
सदगुरू भाऊमहाराजांनी त्यांच्या सदगुरूंचे कार्य करीत असताना, आपल्या स्वतःच्या आदर्शातून त्यांच्या भक्तांमध्ये सातत्याने नामाचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलित म्हणजे, त्यांच्याच अनुग्रहित शिष्यापैकी श्री. विकास व सौ. श्रध्दा खामकर हे, आपल्या गुरूंच्या जीवनप्रणालीचे, म्हणजेच परमपूज्य सद्गुरू भाऊमहाराजांच्या विचारांच्या प्रचार व प्रसाराचे, करत असलेले अध्यात्मिक कार्य होय. या उभयतांनी नामाच्याच माध्यमातून जमवलेला, आपल्या सद्गुरूंच्या ठायी असलेल्या दिव्यशक्तीचा व ज्ञानाचा अक्षय ठेवा जपण्याचा व तो समाजातील सर्व थरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष बघितल्यानंतर, माझ्या मनामध्ये जाणीव झाली की ही गुरू-शिष्य परंपरा अशीच पुढे चालत रहाणार.
सौ. श्रध्दा खामकर यांनी लिहिलेल्या 'सद्गुरू आनंदयोगेश्वर एक साक्षात्कारी अनुभूति भाग' या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माझी या उभयतांशी ओळख झाली. या पुस्तकाचे माझ्या हस्ते झालेले प्रकाशन ही माझ्यासाठी खूपच आनंदादायी गोष्ट होती. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर सदगुरू भाऊमहाराजांच्या जवळ आलो. ते पुस्तक वाचताना मी क्षणाक्षणाला सदगुरू भाऊंच्या अनेक आठवणींनी सद्गदित होऊन गेलो.
सौ. श्रद्धा खामकर यांनी लिहिलेल्या 'सदगुरू आनंदयोगेश्वर साक्षात्कारी अनभूति - भाग २' या पुस्तकामध्ये नामाच्याच माध्यमातून आलेले आपल्या सदगुरूंचे निर्गुण स्वरूपातील अनुभव वाचताना “तूज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे" या काव्यपंक्तींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. नामस्मरणांच्या यात्रांच्या निमित्ताने त्यांना स्वतःला व इतर भक्तांना आलेल्या विविध प्रचिती, या केवळ आपल्या सद्गुरूंच्या भक्तीमुळेच मिळाल्याची त्यांनी दिलेली ग्वाही, या मार्गातील अनेक साधक भक्तांना मार्गदर्शक ठरणारी आहे. सध्याच्या फास्ट लाईफ स्टाईलमध्ये यंत्रवत धावणा-या माणसाला मनःशांतीसाठी केवळ नामाचीच कास धरणे किती आवश्यक आहे, हे जाणवून देणा-या या अनुभूति आहेत.
श्री. विकास व सौ. श्रध्दा यांची निष्ठा व भाव पाहिल्यावर परमपूज्य भाऊमहाराजच त्यांच्याकडून आपले कार्य करून घेत आहेत याची जाणीव होते. या आनंदी दांपत्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तसेच या उभयतांना त्यांच्या या सत्कार्यामध्ये अशाच अनुभूति येत राहोत व गुरू शिष्य परंपरेची गंगा या भारत भूमीवर अशीच अखंड वाहत राहो, ही सदगुरू समर्थ श्रीगजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन.
श्री. वसंतराव गंगाधर गोगटे संपादक - गजानन आशिष
|