बोल जाणीवेचे ...
वाचकांकरिता 'सद्गुरु आनंदयोगेश्वर....एक साक्षात्कारी अनुभूति' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्याचप्रमाणे हे फक्त सद्गुरुकृपेमुळेच शक्य झाले आहे याचीही सार्थ जाणीव आम्हाला आहे. आनंदयोगेश्वर सद्गुरु निळकंठ महाराज उर्फ परमपूज्य भाऊमहाराज करंदीकर यांच्या भक्तांना आलेल्या अनुभवांवर आधारित या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या वर्षी 'आनंदयोगधाम' या गुरुवर्य भाऊ महाराजांच्या पादुका-स्थानावरुन परमपूज्य श्री वसंतराव गोगटे यांच्यापर्यंत पोचले. श्री वसंतराव गोगटे यांनी सद्गुरु श्री गजानन महाराज - शेगाव यांचे मंदिर विलेपार्ले येथे स्थापन केले आहे व आजतागायत ते श्री गजानन महाराजांचे कार्य सेवाभावाने करीत आहेत. तसेच १९८४ सालामध्ये जेव्हा सद्गुरु भाऊ महाराजांनी आपले गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुका-स्थानाची स्थापना केली तेव्हा त्यांच्याबरोबर विशेषत्वाने असलेली व्यक्ती म्हणजे श्री. वसंतराव गोगटे. हा केवळ सद्गुरुंनी जुळवून आणलेला एक योगच असावा.
निरपेक्ष सेवाभावाने भक्ती करताना असे अनेक योग सद्गुरुच त्या त्या भक्ताच्या, साधकाच्या जीवनात निर्माण करीत असतात याची या पुस्तकाच्या निमित्ताने आलेली एक प्रचिती रोमांचकारी आहे. हे पुस्तक लिहीत असताना याची पृष्ठसंख्या किती असावी याचा आम्ही दोघे विचार करीत होतो. मी म्हटले "माझ्याकडून काही ७५-८० पानांहून जास्त लिहून होणार नाही." दिवसही कमी होते. श्रीशंकरमहाराजांचा संकेत होता की १५ दिवसांच्या आत हे पुस्तक लिहून व्हायचे आहे. त्याचवेळी एका गुरुवारी प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दृष्टांतात सांगितले की, "या पुस्तकाची १२८ पाने होतील." त्यावेळी प्रॅक्टिकली विचार करता हे अशक्य वाटले. प्रत्यक्षात माझ्याकडून ९५ ते १०० पाने लिहून झाली होती. परंतु ज्यावेळी या पुस्तकाची डमी प्रत आमच्याकडे आली त्यावेळी आतील सद्गुरुंची छायाचित्रे, त्यांचे आचार-प्रवर्तक सुविचार हे सर्व मिळून खरोखरच या पुस्तकाची एकूण १२८ पाने झाली होती. हे सर्व अतर्क्य आहे. परंतु साक्षात सद्गुरु पाठीशी असल्यावर अशक्य ते काय ?
म्हणूनच तर एका वर्षात या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती संपल्या. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून या पुस्तकाच्या प्रती मागवल्या गेल्या. आजही मागवल्या जात आहेत. 'संपूर्ण शरणांगतता व श्रद्धा आणि सबुरी असेल तर सद्गुरु आपल्या भक्तासाठी काय करू शकतात' हे पुढील पिढ्यांपर्यंत पोचावे या एकमेव हेतूने या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती आम्ही प्रकाशित करीत आहोत.
|