|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

|| प्रस्तावना ||

सकाळी दहा-सव्वा दहाची वेळ. फोन खणखणला. समोरून बोलणारी व्यक्ती "आम्हाला एका पुस्तकाच्या कामाविषयी आपणांशी बोलावयाचे आहे." असे सांगत होती.

खामकर कुटुंबियांशी माझी झालेली ही पहिलीच ओळख. फोन केल्यानंतर श्री. व सौ. खामकर दोन-अडीच तासाने घरी आले. पुस्तकाविषयी बोलणे झाले. त्यानंतर प्रत्यक्ष तसेच फोनवरून बारा-पंधरा वेळा बोलणे झाले. पुस्तक प्रकाशनाविषयीच्या त्यांच्या लगबगीपेक्षाही प्रकर्षाने लक्षात राहिली ती त्यांची प.पू. भाऊ मह्राराजांविषयी तळमळ.

अगदी पहिल्या भेटीपासून आजतागायत या दांपत्याविषयीचं वाटणारं कुतूहल अजूनही शमलेलं नाही. माझ्या आयुष्यात मी ध्येयवेडी, ध्यासमग्न अशी अनेक माणसे पाहिली. मात्र गुरुतत्वाचा एवढा ध्यास घेतलेली ही माणसे पाहिली की क्षणभर स्वतःमध्ये 'आपण अतिशय खुजे असल्याची' प्रामाणिक भावना दाटून येते.

प्रांजळपणे सांगायचं तर मी प.पू. भाऊ महाराजांबाबत त्यांच्या नावाखेरीज फारसं काही ऐकलं नव्हतं. सौ. खामकरांनी दिलेलं प.पू. भाऊमहाराजांचे 'गुरुसाधना' हे नित्यउपासनेचे पुस्तक आणि या पुस्तकाच्या निमित्ताने प.पू. भाऊंची जी काही ओळख झाली, त्यातून प.पू. भाऊ महाराज इतके सुपरिचित झाले की या गुरुतत्वाशी आपला जन्मोजन्मीचा ऋणानुबंध आहे असे वाटू लागले.

प.पू. भाऊ महाराजांचे कार्य अलौकिक आहे. स्वतःला 'मी' पणातून मुक्त करून गुरुतत्वाशी, श्रीस्वामी महाराजांशी अनुसंधान ठेवून, श्रीचरणी निष्ठा ठेवून प.पू. भाऊमहाराजांनी स्वतःस एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले हे अंतिम व पूर्ण सत्य आहे. 'स्व' तत्वाचा अंगीकार न करतां केवळ 'गुरुंचे चरणरज' या भूमिकेत वावरणे ही सहजसोपी गोष्ट नाही.

स्वतःला 'मी' पासून मुक्त ठेवणे ही आजकालच्या उथळ व "Show Business" च्या या जमान्यात तर अतिशय दुर्मिळ व अप्राप्य अशी गोष्ट बनली आहे. गुरुतत्वाशी लीन होऊन त्यास आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची ही दिव्य व गौरवशाली परंपरा प.पू. भाऊ महाराजांप्रमाणे त्यांच्या शिष्यांनीही अधिक दिमाखदारपणे चालविली आहे याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

सौ. श्रद्धा खामकर यांनी या पुस्तकाचे सहजसुंदर लेखन केले आहे. प.पू. भाऊंचे सगुण व निर्गुण स्वरूपात झालेले दर्शन व प्रचिती लिहिताना सौ. खामकरांची नकळतपणे येणारी सहज-सोपी भाषाशैली हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे. सौ. श्रद्धा खामकर यांचे स्वतःचे अनुभव तसेच भाऊंच्या हजारो भक्तांमधील काही निवडक भक्तांनी लिहिलेले त्यांचे अनुभव ही खऱ्या अर्थाने प.पू. भाऊंच्या चरणी वाहिलेली 'शब्दांजली' आहे.

साध्या सोप्या भाषेमध्ये, थेट हृदयाला भिडणाऱ्या या अनुभवांमधून 'प.पू. भाऊ महाराजांचे' व्यक्तिमत्व वाटतं त्यापेक्षाही लक्षपटीने अथांग व भव्यदिव्य आहे याची साक्ष पटते. गुरुला त्याच्या 'तत्वाशी' इमान राखणारा 'शिष्य' मिळावा व त्यातूनच एक समृद्ध गुरुशिष्य परंपरा निर्माण व्हावी असेच जणू काही श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, प.पू. भाऊ महाराज व त्यांच्या शिष्यांविषयी झाले आहे. हे सर्व अप्राप्य व दुर्मिळ आहे त्यामुळे या परंपरेविषयी एक लोभस 'हेवा' वाटतो.

या पुस्तकासाठी 'प्रस्तावना' लिहिणे हे मला माझ्या लेखन कारकिर्दीतील सर्वात 'अवघड' असे काम वाटले. मी अध्यात्मिक स्वरूपाच्या साहित्यक्षेत्रात रमणारा लेखक आणि इथे तर 'भाऊमय' झालेल्या भक्तांचे, कुठलीही साहित्यिक कारागिरी नसलेले, प्रत्यक्ष अनुभूतीतून आलेले साधे व सच्चे बोल. एखाद्या सुंदर गोष्टीला दृष्ट लागू नये म्हणून एक छोटीशी काजळाची तीट लावतात त्याचप्रमाणे परम आदरणीय प.पू. भाऊ महाराजांवरील या पुस्तकासाठी माझे हे "पांढऱ्यावरचे काळे"

|| श्रीआनंदयोगेश्वरायर्पणमस्तु ||

श्री विवेक दिगंबर वैद्य
१/५०, श्रीगणेश सदन, लो. टिळक नगर क्र. ३, म. गांधी रोड, गोरेगाव (प.), मुंबई ४०० १०४
दूरध्वनी क्र. ०९३२४४६८१५८, ०२२-२८७६८१५८
ई-मेल संपर्क : vivekdvaidya@rediffmail.com

<< Previous      Next >>