* मी आणि माझे आनंदयोगेश्वर (सगुणात्मक)
* इतर भक्तांचे अनुभव
* मी आणि माझे आनंदयोगेश्वर (निर्गुणात्मक)
हे पुस्तक वरीलप्रमाणे, तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.
पहिल्या भागामध्ये आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्या मी अनुभवलेल्या सगुणात्मक कार्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सगुणात्मक कार्य म्हणजे गुरुवर्य भाऊमहाराजांनी माझे वैयक्तिक प्रापंचिक जीवन कसे घडवले, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये माझ्या गुरुंनी मला आनंद कसा प्राप्त करुन दिला व तो देत असतानाच त्याला अध्यात्मिक वळणही कसे दिले याविषयीचे अनुभव कथन केले आहेत.
दुसऱ्या भागामध्ये सद्गुरु भाऊमहाराजांच्या अनेक भक्तांना त्यांच्या दैनंदिन तसेच पारमार्थिक जीवनामध्ये आपल्या गुरुंचे जे अनुभव आले त्यातील काही अनुभव कथन केले आहेत.
तिसऱ्या भागामध्ये सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे निर्गुण कार्य ते सगुण रुपात वावरत असताना, त्यांच्याच प्रेरणेने कसे सुरु झाले व त्यामुळेच आज ते निर्गुण रुपात वावरत असतानाही त्यांच्या गुरुतत्वातील सगुणात्मकाचा अनुभव व प्रचिती भक्तांना कशाप्रकारे येत आहे हे कथन करण्याचा प्रयत्न केला आहे.
मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर त्या जडदेहाला एखादा सद्गुरु लाभणे ही अतिशय भाग्याची गोष्ट असते. कारण 'गुरूशिवाय मोक्ष नाही, गुरूशिवाय मुक्ती नाही व गुरुशिवाय हा जीवनरुपी भवसागर पार नाही' असे म्हणतात. आणि त्यातही सगुण रुपातील सद्गुरु लाभणे ही तर पूर्वपुण्याईच. प.प.श्रीमत श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज, श्रीसाईबाबा, श्रीगजानन महाराज, श्रीअक्कलकोट स्वामी महाराज, श्रीशंकरमहाराज व आता आनंदयोगेश्वर भाऊमहाराज या सर्व विभूति, या सर्व शक्ती आज निर्गुण रुपामध्ये वावरत आहेत. ते आपल्या भक्तांना निराकार, निर्गुण रुपामध्येच मार्गदर्शन करत आहेत, त्यांना अनुभव देत आहेत. त्यांचे आशीर्वाद आम्हांला अदृष्यामध्ये प्राप्त होत आहेत. पण जेव्हा या विभुति साक्षात सगुण स्वरुपामध्ये वावरत होत्या; तेव्हा त्यांना अनुभवणारे भक्त व त्यांच्या अनुभूतीची प्रचिती घेणारे किती भाग्यवान !
काळ कुठलाही असो, गुरुतत्व तेच असते. गुरु आणि भक्ताचे नातेही तेच असते. म्हणूनच तर या २१ व्या शतकात, या संगणकाच्या युगातही विश्वाचा समतोल राखला जावा व अखिल मानव जातीला योग्य विचार प्रवाह मिळावा म्हणुन सद्गुरु भाऊमहाराजांसारख्या सत्पुरुषांचा जन्म होत असतो.
अशा या थोर विभुतीचा, आनंदयोगेश्वर महाराजांचा सहवास, अनुभव व मार्गदर्शन माझ्याप्रमाणेच त्यांच्या इतर अनेक भक्तांना मिळाले आहे. सद्गुरुंचे ऋण आपण अनेक जन्मात फेडू शकत नाही. परंतु त्यांच्याकडून मिळालेले ज्ञान, अनुभूति, साक्षात्कार आपण इतर समाजापर्यंत पोचवण्याचा जर का प्रयत्न केला व समाजालाही त्याचा आनंद प्राप्त करुन दिला तर सद्गुरुंचे हे ऋण अंशात्मक रुपात का होईना, आपण फेडण्याचा प्रयत्न करू शकतो. वाल्मिकींनी लिहिलेले 'रामायण' हे प्रभु रामचंद्राचे चरित्र एवढ्या काळानंतरही टिकले आहे, आपल्यापर्यंत आले आहे; कारण त्या नंतरच्या प्रत्येक काळात ते समाजापर्यंत पोचवले गेले.
भक्तांच्या आयुष्यात आलेले अनेक अनुभवांचे क्षण हे त्या सत्पुरुषाच्या अलौकिकत्वाचे साक्षात्कारी चरित्रदर्शन घडवणारे असतात. म्हणूनच आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांमधील अलौकिकत्व साऱ्या समाजाला कळून ते पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोचावे (नव्हे ते पोचणार आहेच) आणि आपल्याला जो आनंद प्राप्त झाला तसा तो इतर गरजू, चिंताग्रस्त तसेच अध्यात्ममार्गावरील लोकांना मिळून त्यांना मानसिक शांतता मिळावी यासाठी मी वाचकांना प्रार्थनापूर्वक आवाहन करते की आपल्यापैकी कोणालाही आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांचे अनुभव प्रत्यक्षात किंवा दृष्टांतरूपाने आले असतील व ते सर्व समाजापर्यंत पोचण्यासाठी छापून येण्याची इच्छा असेल तर कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
मी कोणी मोठी लेखिका नाही, माझ्या सद्गुरुंची मी एक सामान्य भक्त आहे. केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळेच हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यामुळे लेखनाच्या दृष्टीने या पुस्तकात काही त्रुटी आढळल्यास आपण त्या समजून घ्याल अशी आशा करते.
सौ. श्रद्धा विकास खामकर
"आनंदयोग", २०१, संपदा बिल्डिंग, दौलत नगर रस्ता क्र.०५,
बोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६ , दूरध्वनी क्र. ०९८६७४६८७०७
ई-मेल संपर्क : anandyog _dham@rediffmail.com
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|