|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

प.पू. शंकरमहाराज मे महिन्यामध्ये मला म्हणाले की, "आता आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांवर लिहायला सुरुवात करा. " परंतु मी ते फारसे गांभिर्याने घेतले नाही. ६ जूनला रात्री पुन्हा श्रीशंकर महाराजांनी तोच आदेश दिला व त्यानंतर लगेच साक्षात सद्गुरु भाऊमहाराजांनी दृष्टांतात सांगितले, "श्रद्धा, अजून लिहायला सुरुवात केली नाहीस? शंकर महाराजांनी काय सांगितले ? अगं, आम्ही सर्व एकच आहोत. ज्या ज्या ठिकाणी गुरुतत्वाचे पूजन होते, त्या त्या ठिकाणी सर्व सत्पुरुष व शुभ शक्ती चैतन्यरुपाने वावरत असतात. लगेच लिहायला सुरुवात कर." मी विचारले, "भाऊ, कशावर लिहू ?" भाऊ महाराज म्हणाले, "माझ्या अनुभवांवर लिही". मी म्हटले, "माझ्याजवळ तुमच्या भक्तांना आलेल्या अनुभवांची फारशी माहिती उपलब्ध नाही. मी काय लिहिणार ?" भाऊ म्हणाले, "अगं, तुझे स्वतःचे अनुभव तर लिही, मग पुढचं पुढे." मी म्हटले, "भाऊ, उद्या लगेच सुरुवात करते." त्यावर भाऊ म्हणाले, "उद्या नाही, आज, आत्ता. भाऊंकडे उद्या हा शब्द नाही." मी ताबडतोब उठून माझ्याकडील भाऊमहाराजांच्या अनुभवांची फाईल काढली. जो हाताला लागेल तो अनुभव बाहेर काढला. खरं म्हणजे डोळ्यावर खूप झोप होती. परंतु, जसजसा अनुभव वाचत गेले, तसतशी डोळ्यावरची झोप कधी उडाली हे कळलेसुद्धा नाही. तो एक अनुभव त्या रात्री लिहून काढला. सौ. रुपाली घाग नावाच्या एका भक्ताचा अनुभव होता. परंतु त्यात काही संदर्भ असे होते की, जे सद्गुरु भाऊ महाराजांनी आमच्याकडून जी अध्यात्मिक वाटचाल करून घेतली त्याला समांतर होते. त्यानंतर श्रीशंकरमहाराजांनी थांबू दिले नाही. माझा मराठी टायपिंगचा वेग अगदी कमी आहे. कीबोर्ड बघत बघत टाईप करावे लागते, तरीही अक्षरशः थेट कॉम्पुटरवर सर्व लिखाण झरझर टाईप करुन घेतले. यातील नामाविषयी लिहिलेली लहानशी कवितादेखील मला सुचलेली नाही. ती शंकर महाराजांनी माझ्यासमोर रचली व मला लिहिण्यास सांगितली.

मध्येच टाईप करता करता माझ्या मनात विचार आला की कशाला एवढी घाई करायची? आपण सावकाश टाईप करु. तेव्हा श्रीशंकरमहाराजांचा आदेश मिळाला, "थांबणे नाही, आपल्याला आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांचे हे पुस्तक लवकरात लवकर काढायचे आहे. " मी म्हटलं, "महाराज, पुस्तक लिहावे एवढी माझी कुवत नाही आणि आमची पुस्तक काढण्याएवढी ऐपतही नाही." तेव्हा श्रीशंकरमहाराज म्हणाले, "तुम्ही कोण लिहिणार? सर्व काही आम्ही करुन घेणार. ही तर फक्त सुरुवात आहे. पैशाची चिंता करु नका. सर्व गोष्टी श्रीगजानन महाराजांवर सोडा." सत्पुरुषांच्या लीला आपल्याला काय ठाऊक ! आम्ही फक्त त्यांच्या आज्ञा पाळण्याचे काम केले.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कोणता फोटो छापायचा हेही सद्गुरु भाऊमहाराजांच्या आदेशानुसार केले आहे तसेच पुस्तकाचे नावही भाऊमहाराजांना विचारुन नक्की केले आहे.

श्रीशंकर महाराजांच्याच आज्ञेवरून, त्यांच्याच सांगण्यावरुन कसलीही माहिती नसताना आम्ही श्री. विवेक दिगंबर वैद्य यांच्याकडे गेलो. श्रीशंकरमहाराज म्हणाले, "उनसे कहना शंकर महाराजने भेजा है." श्री विवेक वैद्य हे स्वतः श्रीगजानन महाराजांचे भक्त आहेत. ते व त्यांच्या पत्नी या पुस्तकांच्या छपाईचेही काम करतात.

या पुस्तकाला प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्रीसाईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज, श्रीअक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य श्रीदादामहाराज निंबाळकर, परमपूज्य श्रीनानामहाराज तराणेकर, परमपूज्य श्रीशंकरमहाराज व स्वतः आनंदयोगेश्वर भाऊमहाराज या सर्व विभूतींचे मार्गदर्शन, आशीर्वाद लाभले आहेत. त्याचप्रमाणे गुरुवर्य श्रीभाऊ महाराजांच्या आज्ञेवरुन परमपूजनीय श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडे गेलो असतां त्यांचेही आशीर्वाद या पुस्तकास तसेच आनंदयोगेश्वरांच्या या मह्त कार्यास लाभले आहेत. आम्ही कृतार्थ झालो.

फक्त एका गुरुभक्तीने आमचे जीवन धन्य झाले !

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>