सर्वप्रथम मला हे पुस्तक लिहिण्यामागची संकल्पना व प्रेरणा याविषयीच्या अनेक गोष्टी स्पष्ट करणे अतिशय जरुरीचे वाटते. हे पुस्तक मी लिहिले नसून ते अनेक विभूतींनी माझ्याकडून लिहून घेतले आहे. हे जे मी आपल्याला सांगत आहे ते कदाचित आपल्याला अतिरंजित वाटेल. परंतु यातील एकही अक्षर असत्य नाही. हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना व प्रेरणा संपूर्णपणे परमपूज्य श्रीशंकरमहाराज (पुणे) यांची आहे. श्रीशंकरमहाराज हे श्रीस्वामी समर्थांच्या परंपरेतील एक दिव्य सत्पुरुष. हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी त्यांचीच इच्छा होती. हे पुस्तक पूर्ण होई पर्यंतच्या प्रत्येक टप्यावर त्यांनी मला गुरुप्रमाणे; त्याचप्रमाणे एखाद्या सख्याप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्याच आज्ञेने सोमवार दिनांक ६ जून २००५ रोजी रात्री या लिखाणाची छोटीशी सुरुवात केली गेली व त्यानंतर त्यांच्याच कृपेने पुढच्या १५ दिवसात हे पुस्तक संपूर्ण लिहून झाले. त्याविषयी थोडेसे :
आनंदयोगेश्वर सद्गुरु निळकंठ महाराज उर्फ परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर सगुण रुपात वावरत असतांना त्यांची स्पंदने इतक्या जबरदस्त प्रमाणात मिळत असत की त्यांच्याच कृपेने माझ्याकडून त्यांच्यावरच्या अनेक काव्यरचना, आरत्या त्यावेळी लिहिल्या गेल्या. त्यावेळी त्या आरत्यांच्या मागे श्रीसाईबाबांचीही प्रेरणा होती. परंतु सद्गुरु आनंदयोगेश्वर देहातीत रुपात गेल्यानंतर (तुकाराम बीज, २००४) बरेच महिने काही सुचत नव्हते. आपले गुरु आपल्या बरोबर आहेत हा विश्वास होता, भाव होता ; परंतु तशी अनुभूती, तशी प्रचिती मिळत नव्हती. सद्गुरुंची नियमित सेवा, आरती मात्र भक्तिभावाने चालू होती. एकीकडे मन सतत त्यांना हाक मारत होते की, "भाऊ तुम्ही कुठे आहात? कसे आहात ? आम्हाला विसरलात का ? आमच्याशी बोलत का नाही ?" नऊ-दहा महिने असेच गेले आणि २००५ सालातील जानेवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये सद्गुरु भाऊ महाराजांचा, ते देहातीत रुपात गेल्यानंतरचा पहिला दृष्टांत मला मिळाला. मला वाटले की मी सतत त्यांचे ध्यान करते म्हणून मला तसे स्वप्न पडले असावे. परंतु, तसाच दृष्टांत माझे पती विकास व माझी मुलगी पूजा यांनाही मिळाला व त्या दृष्टान्तामध्ये भाऊ महाराजांनी जे सांगितले तसेच पुढच्या काही दिवसात घडले. त्यानंतर दर चार पाच दिवसांनी सद्गुरु भाऊ आम्हाला दृष्टांत देऊन आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तसेच त्यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्येही मार्गदर्शन करु लागले. मनात एखाद्या कार्याविषयी शंका जरी आली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भाऊ महाराजांचा दृष्टांत होत असे व त्या दृष्टांतानुसार लगेच प्रचितीही मिळत असे.
याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रविवार दिनांक २७ मार्च २००५, तुकाराम बीज या दिवशी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांची पहिली पुण्यतिथी होती. आम्ही विचार करत होतो की या दिवशी सद्गुरुंच्या प्रार्थनास्थळावर एक भक्त म्हणून आम्ही कोणता विधी करणे आवश्यक आहे. आम्ही पुण्यातील एक दशग्रंथी ब्राम्हण श्री. खर्शीकरगुरुजी (ज्यांचे पौरोहित्य गुरुवर्य भाऊंना अतिशय आवडायचे) यांना फोन करून विचारले. त्यांनी आम्हाला 'रुद्र, लघुरुद्र, सौर सूक्त अशा ५/६ गोष्टींपैकी काहीही करु शकता' असे सांगितले. तरीही भाऊंना यातील काय आवडेल व ते आम्हाला सर्व दृष्टीने कसे काय जमू शकेल असा प्रश्न पडला. त्यावेळी माझ्या पतींना टेंबे स्वामी महाराजांनी दृष्टांत रुपाने सांगितले की "लघुरुद्र करा". झाले. त्याप्रमाणे आम्ही ब्राम्हण शोधण्यास सुरुवात केली. खर्चाचा अंदाज घेतला. परात्पर गुरुंचा दृष्टांत झाला होता. त्याची प्रचितीही लगेचच मिळाली. लघुरुद्र करण्यासाठी ६ ब्राम्हण लागतील व अंदाजे २००० रु. पर्यंत खर्च होईल असे कळले. परंतु आपल्या परम भक्ताच्या या पुण्यतिथीला स्वामी महाराजांनी कोणाचेही ऋण घेतले नाही. रविवारी पुण्यतिथी होती. आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली होती आणि आदल्याच गुरुवारी आमच्या घरी कुरिअरने एक चेक आला. विकासच्या, माझ्या पतींच्या इन्कम टॅक्समधून चुकून जी रक्कम जास्त घेतली गेली होती; ती त्या चेकच्या स्वरुपात परत मिळाली. रक्कम होती २११७ (बेरीज ११, जो दत्तगुरुंचा आवडता अंक आहे असे मानले जाते).
आम्ही धन्य झालो. आमच्या गुरुंचे आमच्याकडे पूर्ण लक्ष आहे, त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हाला अखंड लाभले आहे हा विचारच अंगावर रोमांच आणणारा होता. पण खरी गम्मत तर याही पुढे होणार होती. सद्गुरुतत्वाची रुपे निरनिराळी असली तरी ती शक्ती व ते गुरुतत्व एकच असते असे या पूर्वी अनेकदा ऐकले होते, वाचले होते. परंतु याची साक्षात्कारी प्रचिती मी व माझे कुटुंबीय गेले ६ महिने घेत आहोत. आम्ही प्रत्यक्षात आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर यांचे भक्त. दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे आमचे परात्पर गुरु. त्यामुळे सद्गुरु साईनाथ महाराज वगळतां इतर कुठल्याही सत्पुरुषाचे स्मरण, पूजन आम्ही कधी केले नाही. परंतु गेल्या ६ महिन्यांमध्ये इतरही अनेक सत्पुरुषांनी आम्हाला दृष्टांत रुपाने किंवा संचार रुपाने मार्गदर्शन केले व आमच्या गुरुंचे प्रचार व प्रसाराचे जे कार्य होत आहे त्याकरिता आम्हाला आशीर्वाद प्रदान केले. या ६ महिन्यात आमच्या लक्षात आले की आमच्या सद्गुरु भाऊ महाराजांवर फक्त आम्हा भक्तांचेच प्रेम नाही, त्यांच्या कार्याची कळकळ व तळमळ फक्त आम्हालाच नाही; तर निराकार, निर्गुण स्वरुपात वावरत असलेल्या अनेक विभुतींना व अनेक शक्तींनाही भाऊंविषयी अथांग प्रेम आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याविषयी आमच्यापेक्षाही जास्त कळकळ आहे.
|