|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

'माझ्याबरोबर चल, तुला माझ्याबरोबरच यायचंय' हे शब्द होते आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराज यांचे; हे शब्द मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही. या शब्दांची प्रचिती मला त्यानंतर वेळोवेळी आली व आजही येत आहे.

१९९० साली मी पहिल्यांदा स्थानावर आले ते माझ्यावर अचानक कोसळलेल्या संकटामुळे. स्थानावरील एक भक्त श्री. मोरेश्वर सामंत हे मला पहिल्यांदा 'भाऊ' नामक व्यक्तीकडे घेऊन आले. तोपर्यंत मला गुरु , गुरुतत्व, अध्यात्म याविषयी काही माहित नव्हते. मात्र लहानपणापासून माझ्याकडून साईबाबांची अतिशय भक्तिभावाने सेवा झाली आहे. (आमच्याकडे बाबांची एक सुरेख मूर्ती होती). त्याव्यक्तीरिक्त अजून कोणाहीकडे जायची वेळ कधी आली नाही. त्यामुळे जेव्हा सामंतमामा म्हणाले की, 'तू भाऊंकडे चल. ते तुझा प्रॉब्लेम नक्की सोडवतील', तेव्हा काहीशी शंका मनामध्ये घेऊनच मी त्यांच्याबरोबर गेले. आरतीच्या आधी मला नंबर मिळाला नाही. (सद्गुरु भाऊमहाराज त्याकाळी दर गुरुवारी व शनिवारी आरतीच्या आधी भक्तांच्या प्रापंचिक व अध्यात्मिक समस्यांमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकी ३० नंबर घेत असत). आरतीनंतर तेथील एका व्यक्तीने फार सुंदर प्रवचन केले. मात्र मी तिला माझ्या जागेवरून पाहू शकत नव्हते. ती व्यक्ती बोलताना, "मी राजाभाऊ करंदीकर नावाचा एक साधा फाटका माणूस आहे. हे जे काही मी बोलतो आहे ते केवळ माझे गुरु प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपेमुळे." अशाप्रकारे बोलत होती. त्यामुळे सामंतमामा तर मला 'भाऊंकडे चल' असे म्हणाले होते पण इथल्या गुरुंचे नाव तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहे - हे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न मला पडला.

प्रवचन झाले. दर्शनाच्या वेळीही खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीला इतरांनी केला म्हणून मीही नमस्कार केला. तरीही माझी संभ्रमावस्था काही जात नव्हती. 'आत खोलीत जाऊन कोणातरी अज्ञात व्यक्तीशी स्वतःच्या वैयक्तिक समस्येविषयी बोलायचे आहे, ती व्यक्ती माझ्याशी कसे बोलेल, मला माझ्या समस्येवर उत्तर खरंच मिळेल का' अशा अनेक विचारांनीही मी अस्वस्थ होते.

शेवटी आता त्यांच्या खोलीमध्ये जाण्याची वेळ आली... तो क्षण आणि आताचा क्षण मी श्वासानेही त्या सद्गुरुपासून दूर जाऊ शकले नाही. त्यांनी जाऊ दिले नाही. खोलीमध्ये जाताच ज्यांना मी बाहेर नमस्कार केला होता तीच व्यक्ती एका गादीवर बसली होती. चेहऱ्यावर विलक्षण तेज व अतिशय प्रसन्न स्मितहास्य. ते हास्य पाहूनच माझी अस्वस्थता कुठल्या कुठे नाहीशी झाली. खोलीत फक्त ते आणि मी. त्यांनी थोडंसं पुढे वाकून प्रश्न केला, "बोल बाळ, काय प्रॉब्लेम आहे?'" आणि माझ्या मनाचा बांध फुटला. एवढ्या महिन्यांमध्ये जे दुःख, जी वेदना कुठेतरी आत दाबून ठेवली होती, जी मी अजुन कोणाही बरोबर शेअर करू शकत नव्हते तिला आऊटलेट मिळाला. इच्छा नसतानाही मी ओक्साबोक्शी रडायला लागले. रडत रडतच मी माझी समस्या त्यांना थोडक्यात सांगितली. ते म्हणाले, "बाळ, तू चिंता करू नकोस. तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल." तो क्षण माझ्या जीवनाची दिशा आमूलाग्र बसून टाकणारा एक योग होता. कदाचित माझ्यावर आलेले ते मोठे संकट म्हणजे या गुरुमाऊलींपर्यंत, माझ्या आनंदयोगेश्वरांपर्यंत पोचण्याचं एक निमित्त होते. आनंदयोगेश्वर-म्हणजेच माझे सद्गुरु भाऊमहाराज उर्फ निळकंठ अनंत करंदीकर.

भाऊमहाराजांनी 'चिंता करू नको' असे म्हटले तरीही मी पडले एक सामान्य स्त्री. माझी देहबुद्धी मला पुन्हा पुन्हा अस्वस्थतेकडे, अनिश्चिततेकडे खेचत होती.. भाऊंच्या शब्दावर संपूर्ण विश्वास ठेवायला मन तयार होते पण बुद्धी तयार नव्हती. कारण आपण माणसं या भौतिक जगात वावरत असतो. लहानपणापासून देवाला नमस्कार करण्याची सवय असते. या आस्तिकतेमुळेच नैसर्गिकपणे येणारा परमेश्वरावरील विश्वास असतो. परंतु समोर आपल्यासारख्याच दिसणाऱ्या सजीव देहावर पटकन श्रद्धा ठेवून निश्चिन्त रहाणे हे आपल्याला सहज शक्य होत नाही. एक तर अनेक जन्मींच्या पूर्वसुकृतामुळे एखादी व्यक्ती आपोआप अशा शक्तीकडे खेचली जाते किंवा एखाद्या ज्वलंत अनुभव किंवा प्रचितीमुळे. माझ्या बाबतीत हेच घडणार असावे.

तोपर्यंत मी स्थानावरील गुरुवारी व शनिवारी होणाऱ्या सं.७.२५ च्या आरतीला मात्र न चुकता हजर रहायचे. त्या आरतीतील शब्द, त्या शब्दातील आर्तता व सद्गुरु भाऊंच्या आवाजातील स्तोत्र व नामस्मरण याने सारे वातावरण भारून जायचे. सामुदायिक आरतीचे महत्व मला तेव्हाच कळले. आरतीपुरते तरी मनाला अतिशय बरे वाटायचे. मन त्या वेळेपुरते शांत व्ह्यायचे.

१९९१ सालची गोष्ट. माझे वडील, जे जवळ जवळ १७/१८ वर्षे मानसिक रुग्ण होते, ते आम्हा कुटुंबीयांबरोबर ट्रेनने बोरिवलीहून सांताक्रूझला माझ्या बहिणीकडे जाताना सांताक्रूझ स्टेशनवर हरवले. बुधवारी रात्री ते बेपत्ता झाले. आमच्या बिल्डिंगमधील श्री. श्रीपाद सामंत नावाचे गृहस्थ 'भाऊंना विचारु' म्हणून गुरुवारी संध्याकाळी माझ्या लहान बहिणीला घेऊन स्थानावर आले. पण सद्गुरु भाऊ त्यावेळी दिल्लीला गेले होते. आमच्या सुदैवाने रात्री ९च्या सुमारास स्थानावर भाऊंचा फोन आला. श्री. सामंतांनी प्रॉब्लेम सांगताच भाऊंनी (दिल्लीहून) फोनवर सांगितले की "त्या गृहस्थांची स्मृती गेलेली आहे व जरी ते सांताक्रूझवरून हरवले असले तरी येत्या गुरुवारच्या आत ते त्यांच्या बोरिवली येथील घरी परत येतील. तुम्ही त्यांचा कुठेही शोध घेऊ नका. मात्र ताबडतोब ३ दिवस जपाला बसा." याही शब्दांवर त्यावेळी आमचा पूर्ण विश्वास बसला नाही व आम्ही सांताक्रूझला राहूनच वडिलांचा शोध घेऊ लागलो. नातेवाईक, हॉस्पिटल्स सर्व ठिकाणी शोध घेतला. परंतु कुठेच पत्ता लागला नाही.

<< Previous      Next >>