|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

इकडे श्री. सामंत भाऊंच्या शब्दाप्रमाणे बिल्डिंगमधील काही मुलांना घेऊन ताबडतोब 'नमो गुरवे वासुदेवाय' या जपाला बसले. त्यांनी २ दिवस जप केला मात्र....तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी १० च्या सुमारास माझे वडील रिक्षाने आमच्या बोरिवली येथील घरासमोर उतरले. श्री. सामंतांनी आम्हाला फोन करून कळवले की ' वडील घरी आलेले आहेत.' भाऊंचे, सद्गुरु भाऊमहाराजांचे शब्द खरे ठरले. वडिलांच्या सांगण्यानुसार ते खरंच सर्व काही विसरले होते. त्यांना स्वतःचं घर आठवत नव्हते. दोन दिवस भटकंती केल्यानंतर ते शनिवारी रात्री चारकोप (कांदिवली) येथल्या खाडीमधील चिखलात पडले. त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते. त्यांना भोईर नावाच्या एका कोळ्याने त्या ठिकाणी पाहिले व स्वतःच्या घरी नेले. तेथे काही तासांनंतर त्यांना हळूहळू आठवायला लागले.

श्री. भोईर जेव्हा माझ्या वडिलांना घरी पोहोचवायला आले तेव्हा आम्हाला म्हणाले की, "ज्या ठिकाणी हे गृहस्थ पडले होते ती अतिशय आडवळणाची जागा आहे. तिथे मी कधीही जात नाही. त्या दिवशी माझे पाय नकळतपणे त्या बाजूला वळले व मी त्यांना घरी पोचवू शकलो." हा सर्व माझ्यासाठी एक अनुभवच होता. सद्गुरु भाऊमहाराजांनी तीन दिवस सतत नामजप करण्यास सांगितले होते. नामजपाच्या वैज्ञानिक माध्यमातून, नामाच्या स्पंदनातून (vibration theory) साध्य झालेला हा एक चमत्कारच होता जणू.

त्याच सुमारास माझ्या बाबतीत असाच चमत्कार आणखी एकदा घडला. माझी घटस्फोटाची केस चालू असताना समोरच्या लोकांनी आणखी एक केस टाकली - माझ्या ४ वर्षांच्या मुलीला मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्याकडे घेऊन जाण्याची. त्यावेळी मुलीशिवाय मला दुसरं काही जीवनच नव्हतं. त्यामुळे एक महिना तिच्याशिवाय रहाणे मला शक्यच नव्हतं. त्या लहान मुलीला कोर्टात आणण्यास सांगितले गेले. त्या लहानग्या मुलीला मी काय समजावणार होते ?

वडिलांचा वरील अनुभव आल्यामुळे मी त्या विश्वासाने लगेच स्थानावर भाऊंकडे धाव घेतली. सुदैवाने त्याचवेळी भाऊमहाराज एका भक्ताच्या गाडीचे उदघाटन करण्यासाठी तिथे आले होते. मी बाहेरच हे सर्व त्यांच्या कानावर घातले. बोलताना माझा स्वर कापत होता. भाऊ महाराजांनी माझ्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला व मला म्हणाले, "चिंता करू नकोस. कोर्टात जाशील तेव्हा अखंड नामस्मरण करीत रहा." आम्ही कोर्ट नं.३ (जे तिसऱ्या मजल्यावर होते) मध्ये गेलो. न्यायाधीश श्री. बग्गा यांनी तिच्या वडिलांना सांगितले की 'तुम्ही फक्त तिला इथून तळ मजल्यापर्यंत नेऊन आणा. जर का ती तुमच्याकडे एवढा वेळ राहिली तर तुम्ही तिला एक महिन्यासाठी घेऊन जाऊ शकता.

कायद्याप्रमाणे त्यावेळी माझी मुलगी दर शनिवारी त्यांच्याकडे एका दिवसासाठी जात असे. ते लोक अतिशय श्रीमंत असल्यामुळे माझ्या लहान वयाच्या मुलीला नैसर्गिकपणे त्यांच्या मोठया घराचे, तिथल्या खेळण्यांचे, त्यांच्या दोन दोन गाड्यांचे आकर्षण होते. त्यांची ओळखही होती. त्यामुळे न्यायाधीशांची एवढी लहानशी अट ते सहज पूर्ण करू शकत होते. मला ब्रह्मांड आठवले. भाऊ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हे नामस्मरण मनात अखंड चालू होते. पण तरीही खूप भीती वाटत होती. मी डोळे गच्च बंद करून घेतले व सद्गुरुंचा धावा सुरु केला. आणि काय आश्चर्य ! माझी मुलगी, जी त्यांच्याकडे दर शनिवारी आवडीने जायची, ती इलेक्ट्रिकचा शॉक लागावा त्याप्रमाणे त्यांच्याकडून स्पर्शही करून घेईना, तिचे वडील, आजोबा सर्वजण तिच्या मागे धावत होते. तिला कसली कसली आमिषे दाखवत होते व ती मात्र सर्व कोर्टरुमभर पळत होती, रडत होती. सर्व कोर्ट हा तमाशा बघत होते. तिची आई असूनही मी काही करू शकत नव्हते.

शेवटी ते न्यायाधीश समजायचे ते समजले व त्यांनी तिच्या वडिलांची केस निकालात काढताना सांगितले की, 'जी लहान मुलगी तुम्हाला स्पर्शही करून देत नाही ती तुमच्याबरोबर एक महिना कशी रहाणार ?" हे सर्व केवळ सद्गुरु भाऊमहाराजांच्याच आशीर्वादामुळे घडले होते हे कळायला मला वेळ लागला नाही. त्यानंतर मी गुरुवर्य भाऊ महाराजांचे चरण कधीही सोडले नाहीत.

हळूहळू भाऊ महाराजांच्याविषयी बरीच माहिती कळायला लागली. दत्तावतारी श्रीमत प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रचार व प्रसाराचे महत कार्य हाती घेतलेल्या या योगी पुरुषाचे बालपण व तरुणपण अतिशय कष्टप्रद गेले होते. लोकांनी त्यांना वेडे म्हटले, बुटांनी तुडवले, त्यांना अनेकदा नांवे ठेवली. पण ते वेडे नव्हते. त्यांच्याकडून त्यांच्या गुरुंचे जे कार्य व्हायचे होते त्याचीच ती नांदी होती. त्यांनी ३९ वर्षे चरक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली व संसारात राहून परमार्थ कसा करावा याची शिकवण स्वतःच्या आचरणातून घालून दिली. १९७६ साली त्यांची भेट परमपूज्य दादामहाराज निंबाळकर या 'अवलिया' सत्पुरुषाशी झाली. १९८१ साली दादामहाराजांनी गुरुवर्य भाऊंना सांगितले की, 'तुमचे गुरु मी नसून प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत.' त्याची प्रचितीही भाऊंना दुसऱ्या दिवशी लगेच मिळाली. श्री. बोडस नावाच्या एका व्यक्तीने भाऊंच्या हातात एक पोथी आणून दिली. ती पोथी म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे चरित्र होते. त्यानंतर सर्व विश्वामध्ये आपल्या गुरुंचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत गुरुवर्य भाऊंनी घेतले.

<< Previous      Next >>