१९८४ साली भक्तांना व समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी भाऊ महाराजांनी 'ओम सद्गुरु प्रतिष्ठान' या टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकास्थानाची तथा अध्यात्मिक केंद्राची बोरिवली येथे स्थापना केली. त्याचप्रमाणे १९९० साली टेंबे स्वामी महाराजांच्या चैतन्यस्वरुप पंचधातूच्या मूर्तीची खोपोली येथे प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली. यापैकी बोरिवली येथील पादुकांची स्थापना प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्याहस्ते झाली. जिथे भाऊ महाराजांनी अनेक संकल्प करून ते भक्तांकडून सिद्धीस नेले. त्यांनी स्वामी महाराजांची स्पंदने नामस्मरणाच्या व नामजपाच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोचविली. भक्तांच्या व समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह झिजवला.
भक्त मग तो गरीब असो वा श्रीमंत असो किंवा कुठल्याही जाती-धर्माचा असो. असंख्य भक्तांच्या असंख्य समस्या त्यांनी सोडवल्या, अनेकांना आर्थिक विवंचनेतून मार्ग दाखवला, काहींचा अपमृत्युही टाळला. गुरुवर्य भाऊंच्याच माध्यमातून जरी हजारो भक्तांना याचे अनुभव आले; तरीही त्यांनी कधीही कोणालाही असे म्हटले नाही की, 'मी महाराज आहे' उलट ते सर्वांना सांगत की, 'मी महाराजांचा एक पाईक आहे, सेवक आहे. हे जे काही माझ्याकडून बोललं जात आहे ती माझ्या गुरुंची, प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची माझ्यावरची कृपा आहे."
वेळेचे महत्व अचुक जाणणारे भाऊ महाराज अतिशय वक्तशीर होते. कर्तव्यदक्ष माणसे त्याचप्रमाणे शब्द वा वेळ पाळणारी माणसे त्यांना आवडत. भक्तांना मिळणाऱ्या अनुभवांना, प्रचितीनां त्यांनी कधीही अवास्तव चमत्कारांचे स्वरूप दिले नाही. ते म्हणायचे, "ही vibration theory आहे. ज्याची गुरुतत्वावर निष्ठा आहे, असीम श्रद्धा आहे त्याच्यापर्यंत ही स्पंदनं पोचतात वा त्याला प्रचिती येते." सद्गुरु भाऊंच्याकडे येणाऱ्या तरुण भक्तांना त्यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. कुठल्याही कर्मकांडाला किंवा अंधश्रद्धेला वाव न देता त्यांनी सर्व भक्तांना डोळस पण सश्रद्ध भक्ती करण्यास शिकविले.
"तुझे आहे तुजपाशी. फक्त अखंड नामस्मरण करीत विवेकबुद्धीने दैनंदिन कर्म चोखपणे करीत रहा." हाच त्यांचा मूलमंत्र होता, आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर "बोल बाळा !" हे त्यांचे प्रेमळ शब्द वा "चिंता करु नकोस" असे सुहास्य वदनाने म्हणत दिलेला आश्वासक धीर....खरंच अथांग करुणेचा सागर होते सद्गुरु भाऊ !
सद्गुरु भाऊ प्रवचन करताना तर अतिशय गंमत यायची. त्यांच्या प्रवचनातून समोर ऐकत असलेल्या शेकडो भक्तांच्या मनात चाललेल्या विचारांची किंवा शंकाविषयीची उत्तरे आपोआप मिळत असत. काही वेळा तर या प्रवचनांमध्ये भक्तांच्या चुका सुधारण्यासाठी मारलेल्या कोपरखळ्यादेखील असत. भाऊंना नीटनेटके रहाणे पसंत होते. ते स्वतः नेहमी टापटिप रहात. त्यांच्या बोटांमध्ये खूप अंगठ्या असायच्या. काही लोकांच्या मनात विचार यायचा की 'हे सद्गुरु आहेत, मग एवढे अलंकार का मिरवतात ? हे टेंबे स्वामी महाराजांचे भक्त आहेत; पण टेंबे स्वामी तर संन्यासी होते, सर्वसंग परित्यागी होते. मग भाऊमहाराज एवढे छान का रहातात ?'
एकदा भाऊंनी प्रवचनात सहज बोलता बोलता सांगितले की, “माझ्या हातात या ज्या अंगठ्या तुम्ही बघतां ना, त्या प्रत्येक अंगठीमध्ये माझ्या एका-एका भक्ताचे प्रेम आहे वा त्या भक्ताला माझ्या माध्यमातून माझ्या गुरुंनी दिलेल्या प्रचितीची ती खूण आहे. जर का तुम्ही मला एखादी गोष्ट प्रेमाने व भक्तिभावाने दिलीत व मी ती वापरली नाही तर तुम्हाला किती वाईट वाटेल ! मीही भक्तांसाठी, त्यांच्या प्रेमासाठी आहे. तरी कोणाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर माझ्या मागे चर्चा करण्यापेक्षा मला आत येऊन विचारा. मी नक्की सांगेन कुठली वस्तू कुठल्या भक्ताने दिली आहे ते" असे म्हणून ते अर्थगर्भ हसले.
असंच एकदा माझ्या एका मैत्रिणीची शनिवारची आरती कधी नव्हे ती चुकली. चुकली म्हणण्यापेक्षा तिने चुकवली कारण त्या दिवशी ती ब्युटी पार्लरमध्ये फेशियल करायला गेली. लगेचच पुढच्या शनिवारी भाऊंचा प्रवचनातून शेरा - "सतत श्वासे श्वासे सद्गुरुंचे नामस्मरण करीत राहिलात तर चेहऱ्यावर आपोआप इतकं तेज येईल की त्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज उरणार नाही."
एखाद्याला प्रेमाने आपलसं कसं करावं हे तर गुरुवर्य भाऊंकडून शिकावं. चार व्यक्तींचे आपापसांत कोणतेही मतभेद किंवा भांडणे असतील पण भाऊंकडे मात्र ती सर्व एकत्र येत असत.
भाऊ महाराजांना माणसांची अतिशय आवड. अतिशय साधेपणाने भक्तांमध्ये मिसळणाऱ्या भाऊंनी भक्तांवर निरतिशय प्रेम केले. ते नामस्मरण करण्यासाठी भक्तांच्या घरोघरी जायचे. तासनतास नामस्मरणासाठी व पाद्यपूजेसाठी बसायचे. अनेक सत्पुरुष आपला चरणस्पर्शही करून देत नाहीत पण भाऊ मात्र भक्तांकडून आनंदाने, प्रेमाने पाद्यपूजन करून घ्यायचे. त्याला सर्वतोपरि आनंद देण्याचा प्रयत्न करायचे.
|