|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

आता वाटतं ज्या गुरुंनी आमच्यासाठी आपला देहं झिजवला त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ? तेव्हाही आणि आताही !

भाऊमहाराज खरोखरंच 'दीनबंधू कृपासिंधु' आहेत याची प्रचिती मला त्यानंतर अनेकवेळा आली. माझ्या मुलीला, चि. पूजाला पहिलीमध्ये ऍडमिशन घ्यायची होती. एजुकेशन डिपार्टमेंटने बोरिवली (प) येथील सेंट अ‍ॅन्स हाईस्कूलचे नाव लिहून दिले होते. परंतु इंटरव्ह्यू नंतर माझ्या मुलीला ऍडमिशन नाकारले गेले. तोपर्यंत जूनमध्ये शाळा सुरु झाली. त्यावेळी माझी आई माझ्या वडिलांना घेऊन मिरज येथील मेन्टल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी गेली होती. इथे माझ्याबरोबर कोणीही नव्हते. मी एकटीच, मुलीला घेऊन रोज सकाळी सेंट अ‍ॅन्स शाळेच्या खेटा घालू लागले. रोज तिथल्या प्रिंसिपॉलना (सिस्टरला) भेटून त्यांना सर्व प्रकारे convince करण्याचा प्रयत्न करायचे.

जुलै महिना उजाडला तरी ऍडमिशन मिळाले नाही. मग मात्र मी निराश झाले. स्थानावर येऊन स्वामी महाराजांसमोर बसले. रडूच फुटले. आता माझ्या मुलीचे शाळेचे अख्खे वर्ष फुकट जाणार होते. स्वामी महाराज व भाऊ महाराजांना म्हटलं, " महाराज, तुमच्याशिवाय या जगात या जीवाचं आणखी कोणीही नाही. मी स्वतःला तुमच्या हातात सोपवलं आहे. तुम्हीच या जीवाचं काय करायचं ते करा." दुसऱ्या दिवशी शेवटचा प्रयत्न म्हणून शाळेत गेले.

प्रिंसिपॉलच्या केबिनमध्ये जाताच त्यांनी माझ्यासमोर एक कागद ठेवला. बघते तर काय ! तो ऍडमिशन फॉर्म होता. तो फॉर्म भरत असताना मनात विचार आला की जे काही थोडे फार दागिने आहेत ते विकून डोनेशनचें पैसे उभे करायचे, कारण इतर पालकांकडून डोनेशनच्या रुपाने १५ ते २० हजार रुपये घेतल्याचे ऐकिवात होते. भीतभीतच त्यांना डोनेशन किती असे विचारले. त्या म्हणाल्या, " Nothing. You have to pay only admission and tution fee. ” कसलेही जास्तीचे पैसे न भरता माझ्या मुलीला त्या शाळेत ऍडमिशन मिळाले.

अशा प्रकारे वेळोवेळी त्यांच्या हातात सोपवलेल्या माझ्यासारख्या सामान्य भक्ताला त्यांनी तारले. याचा अत्युच्च बिंदू म्हणजे - त्याच सुमारास अतिशय प्रोब्लेममध्ये असतांना मुलीला घेऊन मी आत्महत्या करायला निघाले. गेट वे ऑफ इंडियाला जाऊन बोटीतून मुलीला घेऊन खाली उडी मारायची ही कल्पना. मी अतिशय depressed झाले होते व त्याच मनःस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला डॉन बॉस्को शाळा, बोरिवली (प) येथून स्टेशनला जाण्यासाठी एका रिक्षात आम्ही बसलो.

रिक्षा सुरु झाली. मनात वादळ चालू होतं - आपण आत्महत्या करु शकू का ? मुलीला मारु शकू का ? सहज नजर समोर गेली ; तर रिक्षात समोरच प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा आणि गुरुवर्य भाऊ महाराजांचा छोटा फोटो. एक क्षण मी साफ भारावून गेले, चक्रावून गेले आणि मग इतका वेळ सावरून धरलेला बांध फुटला. रडतच रिक्षावाल्याला विचारलं की ही रिक्षा कोणाची आहे ? हा फोटो कोणी लावला ? तो म्हणाला, "मला माहित नाही. मी दुसऱ्या एका माणसाची रिक्षा आजच चालवायला घेतली आहे." आणि मला खरंच देहरुपात वावरत असलेल्या माझ्या सद्गुरु भाऊ महाराजांमधील परमेश्वरीय शक्तीची प्रचिती मिळाली.

त्याचबरोबर माझे मन अतिशय शांत व निश्चिन्त झाले. 'आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते केवळ माझे सद्गुरुच घडवत आहेत, त्यांना माझे जे काही करायचे आहे ते करू देत आपण कशाला चिंता करायची' ही भावना निर्माण झाली आणि कालांतराने ही भावना किती खरी आहे याची प्रचितीही अशाप्रकारे आली. एकदा गुढी पाडवा, गुरुवार दिनांक १८ मार्च १९९९ या दिवशी सांताक्रूझ - वाकोला येथील दत्त मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या ठिकाणी गुरुवर्य भाऊमहाराजांचे प्रवचन होते. प्रवचन संपल्यानंतर ते जवळच राहणाऱ्या एका भक्ताच्या घरी गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मला थांबण्यास सांगितले. मला म्हणाले, " जाताना आपण एकत्र जाऊ. मलाही स्थानावरच जायचे आहे. मी तुला बोरिवलीला सोडतो. " माझा आनंद गगनात मावेना. साक्षात सद्गुरुंबरोबर त्यांच्या गाडीतून जायचे ! ही खरंच पूर्वपुण्याई आणि माझ्यासाठी तर ती मोठी पर्वणीच होती.

गाडीतून जात असताना मी त्यांना बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात रेंगाळत असलेला प्रश्न विचारला, " भाऊ, मानवाचे कर्म आणि विधिलिखित यामध्ये श्रेष्ठ काय? कशाचा पगडा मानवाच्या दैनंदिन जीवनावर जास्त असतो? आणि जर का विधिलिखिताप्रमाणेच जीवनात गोष्टी घडत असतील व सर्व काही ठरलेलेच असेल तर मग मानवाच्या हातून या जन्मात घडणाऱ्या दैनंदिन कर्माला महत्व काय?"

भाऊ नेहमीप्रमाणे हसत उत्तरले, "विधिलिखिताप्रमाणे, पूर्वसंचितानुसार मानवाच्या जीवनाची काही प्रमाणात धाटणी झालेली असते. त्या त्या जन्मवेळेनुसार विशिष्ट ग्रहांचाही परिणाम त्याच्यावर होत असतो. त्याप्रमाणे ते ते भोग, चांगले किंवा वाईट, मानवाला भोगावेच लागतात. परंतु ते भोग भोगत असतांना तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वागतो, आपला तोल कसा सांभाळतो किंवा ढळू देतो या कर्माला या जीवनात अतिशय महत्व असते."

थोडं थांबून ते पुढे म्हणाले, "तुला एक उदाहरण देतो. एखाद्या माणसाला विधिलिखितानुसार खूप कठीण समस्या भेडसावत आहे. जीव अगदी मेटाकुटीला आला आहे. अशा वेळेस त्याचा एक मित्र त्याला परमेश्वरीय शक्तीची किंवा सद्गुरुंकडे जाऊन मन शांत ठेवण्याची वाट दाखवतो तर दुसरा मित्र त्याला दारूच्या गुत्त्यावर जाऊन मद्य प्राशन करून दुःख विसरण्याचा सल्ला देतो. यातील कुठला पर्याय निवडायचा हे सर्वस्वी त्या माणसावरच निर्भर असतं ना? त्यावेळी तो जे वागेल ते त्याचे या जन्मातील कर्म. अशा प्रत्येक कर्माचा आपल्या पुढील जीवनावर परिणाम हा होतच असतो. हां, मात्र सत्पुरुष विधिलिखित व कर्म यांचे हे समीकरण बदलू शकतात. कळलं ?" आणि नंतर त्यांनी जे काही मला सांगितलं ते माझ्या या जीवनाचे सार होते.

<< Previous      Next >>