ते म्हणाले, " श्रद्धा, तुझ्या जीवनाचेच उदाहरण घे. तुझ्या नशिबात घटस्फोट नव्हता. तुझ्या नशिबात वैवाहिक जीवन समाधानाचे आहे. पण तुझ्याकडून जे अध्यात्मिक कर्म घडणे आम्हाला तेव्हा अपेक्षित होते; ते तुझ्या देहबुद्धीमुळे तुझ्याकडून झाले नाही. म्हणून आम्हाला तुला अशाप्रकारे आमच्यापर्यंत आणावे लागले. And tell me why you are remarried to Vikas only? Why not to anybody else ? कारण तुझ्याकडून जे पुढे व्हायचे आहे ते विकासच्याच साथीने पूर्ण होऊ शकतं. काय ?" आणि त्यांनी मस्तपैकी डोळे मिचकावले. खरंच भाऊ, तुम्हा सत्पुरुषांच्या लीला तुम्हालाच ठाऊक ! हे सर्व माझ्याशी बोलण्याची योजना होती म्हणून तर गाडीतून एकत्र जायचे प्रयोजन. दुसरं काय ? ही घटना १९९९ मधली.
त्याचवेळी काही वर्षांपूर्वी, १९९४ मध्ये घडलेला प्रसंग मला आठवला. माझी एक गुरुभगिनी सौ. अश्विनी बागलकर माझी पत्रिका बनवून तिच्या दिरांकडे (श्री. विलास बागलकर, जे ज्योतिषी होते) घेऊन गेली. त्यावेळी माझी केस चालू होती. त्यांनी सांगितलं की, "हिच्या पत्रिकेत घटस्फोट नाही. ती परत आपल्या नवऱ्याकडे जाणार याविषयी माझे चॅलेंज आहे." पण तोपर्यंत भाऊ महाराजांनी तर मला दुसरंच काही सांगितले होते. म्हणून आम्ही दोघी एका गुरुवारी दुपारी सद्गुरु भाऊंना भेटून याविषयी विचारण्यास गेलो. अश्विनीने माझी पत्रिका भाऊंसमोर धरली मात्र - भाऊंनी ती पत्रिका चिमटीत पकडली व बाजूला भिरकावून दिली. आम्ही दोघी एकमेकींकडे पहातच राहिलो. भाऊ पटकन म्हणाले, " हिचे ग्रह महाराज बदलणार, मी जे सांगितले आहे तेच करायचे." डोळ्यात पाणी तरळले, कृतज्ञतेचे.
१९९४ सालाचाच आणखी एक असाच अनुभव. मला लहानपणापासून वाचनाची व लिहिण्याची आवड होती. पण कधीही भक्तिरसात्मक काही लिहू शकेन असे वाटलेच नव्हते. जसजसे सद्गुरु भाऊमहाराजांचे अनुभव येऊ लागले, नामस्मरणाची गोडी लागली, प्रवचनांमधून भाऊंचे विचार ऐकत गेले तसतशी मनाने मी त्यांच्या अधिकाधिक जवळ येत गेले. गुरुंशी अनुसंधान वाढले व एक दिवशी घरात बसलेले असतांना ध्यानी मनी नसतानाही भाऊंच्यावर मनामध्ये एक काव्य तयार झाले. मी लगेच ते कागदावर उतरवले. तोपर्यंत माझ्या मनाची अशी पक्की धारणा झाली होती की प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुवर्य भाऊ हे वेगळे नाहीत. फक्त एक निर्गुण रुप तर एक सगुण. मी सहज ती कविता श्री. विकास खामकर (तेव्हा आमचे लग्न व्हायचे होते) यांना दाखवली. ते म्हणाले, "मी माझ्याकडे ठेवतो." पण माझ्या नकळत त्यांनी ती कविता सद्गुरु भाऊंना दाखवली. भाऊ म्हणाले, " तिला भाऊंवर अजुन कविता लिहायला सांग." विकासने लगेच रात्री १०.३० वाजता, भर पावसात येऊन मला तो निरोप सांगितला. मी त्यांना म्हटले की, "मला नाही वाटत मला हे शक्य होईल." विकास म्हणाला, " सद्गुरु बोलले आहेत ना मग ते होणारच. त्यांचा शब्द कधीही खाली पडत नाही. तू प्रयत्न कर."
ही जुलै १९९४ ची गोष्ट. त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. मनात भाऊंविषयीच्या विचारांनीच गर्दी केली होती. अनेक दिवसांपासूनची इच्छा होती की गुरुवर्य भाऊमहाराजांचा अनुग्रह घ्यावा. पण अनुग्रह म्हणजे नक्की काय? तो घ्यायचा असतो की तो आपोआप व्हावा लागतो? त्याचे विधी हा फक्त एक उपचार असला पाहिजे. गुरुचा खरा अनुग्रह हा व्हावाच लागतो. एखादा गुरु भेटणे हीच मुळात भाग्याची गोष्ट. आणि त्या गुरुचा अनुग्रह होणे ही तर परमभाग्याची गोष्ट. मग 'अनुग्रह' या शब्दाचा अर्थ किती व्यापक असेल ! अनुग्रहानंतर त्या गुरु आणि भक्तामध्ये आंतरिक एकरूपता व्हायला हवी, कुठल्याही प्रकारचा विभक्तपणा असता कामा नये. अशा विचारांमध्येच शब्द लिहिले गेले -
हे दत्त योगेश्वर वासुदेवा, भाऊ तुमचा अनुग्रह व्हावा
हृदयी तुमचे अधिष्ठान
तुम्हा असे का याची जाण
कंठी दाटूनि येती प्राण,
तव नाम घेतो जेव्हा,
भाऊ तुमचा अनुग्रह व्हावा
हातून घडता चूक भूल,
तुम्हीच दया क्षमाशील
तुम्हावीण मज कोण तारील,
ओळखा माझ्या भोळ्या भावा, भाऊ तुमचा अनुग्रह व्हावा
बोल तुमचे अर्थयुक्त
खरा असे तोचि भक्त
गुरुपासोनि नसे जो विभक्त
हाच मम अनुभव यावा,
भाऊ तुमचा अनुग्रह व्हावा
|