मन इतके भाऊमय झाले की भाऊंच्या दर्शनाची आस लागली. शब्द उमटले.
दारी तुझ्या आलो घेऊनिया श्रद्धा - सुमन
त्वरा द्या दर्शन व्याकूळ हे झाले मन || धृ ||
नाम तुझे घेता घेता हरपले देहभान
वासुदेव वासुदेव लागियले ऐसे ध्यान || १ ||
नको ते श्रीफळ नको मेवा नको धन
कृपा ही शाश्वत हेचि द्या हो वरदान || २ ||
गांजल्या जीवा मिळावी भक्ती शक्ती मुक्ती म्हणून,
कष्टे प्रस्थापिले गुरुभाऊ तुम्ही स्थान || ३ ||
अर्पू तूज काय निर्धन मी निष्कांचन
तूज ओवाळितो डोळ्यांचं हे निरांजन || ४ ||
दुसरे काव्य असे होते -
गुरु भेटीची आस लागली मम आत्म्या आज का
दत्त दिगंबर गुरुभाऊ द्या साक्षात्कार साधका ।।
पतित आम्ही तूच दयाघन
तुझ्याच रंगून जय तनमन
मायबाप तू तुजवाचून हा जीव असे पोरका
दत्त दिगंबर गुरुभाऊ द्या साक्षात्कार साधका।।
हा विश्वाचा अथांग सागर
षडरिपू रुपी वादळ ज्यावर
नसशी तू तर याच वादळी सापडे जीवननौका
दत्त दिगंबर गुरुभाऊ द्या साक्षात्कार साधका ।।
जन्म मृत्यूचे चक्र आगळे
त्यात गुंतुनी रहाती सगळे
काय भास अन काय सत्य दे ज्ञान अजाण बालका
दत्त दिगंबर गुरुभाऊ द्या साक्षात्कार साधका।।
चित्र नित्य हे मानस कल्पित
उभा समोरी तू साक्षात
रूप साठवू डोळा की गुरु पुजू तव पादुका
दत्त दिगंबर गुरुभाऊ द्या साक्षात्कार साधका।।
सकाळी उठल्यानंतर लक्षात आले की सद्गुरूंनीच हे सर्व (एका रात्रीत तीन कविता) लिहून घेतले. विकासने सद्गुरू भाऊंना या तीन कविता दाखवल्या. त्यांना अतिशय आवडल्या. माझ्यासाठी हेच खूप होते. मात्र दोनच दिवसांनी विकासने निरोप आणला की तुझ्या कविता सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांनी कॅसेटसाठी निवडल्या आहेत व तुला त्यांना फोन करायचा आहे. माझा विश्वासच बसेना. माझे गुरु मला कुठे घेऊन चालले आहेत ? श्री. अजित कडकडे यांनी मला माझी तीनही गाणी सिलेक्ट केल्याचे व येत्या सोमवारी आणि मंगळवारी रेडिओ वाणी, वरळी येथे रेकॉर्डिंग असल्याचे सांगितले. कवयित्री या नात्याने मलाही तेथे बोलवले. तिथे गेल्यानंतर कळले की त्यांनी तीनच्या ऐवजी दोन गाणी निवडली आहेत.
त्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिथे गुरुवर्य भाऊ स्वतः उपस्थित होते. श्री अजित कडकडे यांनी सद्गुरू भाऊंना समोर बसवून ही गाणी गायली आहेत. म्हणूनच तर त्यात एवढा भाव प्रकट झाला आहे ! त्या रेकॉर्डिंगच्यावेळी मला प्रथमच मिळालेला माझ्या गुरुभाऊंचा एवढा मोठा सहवास ही माझ्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्याची शिदोरीच होति. श्री. अजित कडकडे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, " गेली दोन वर्षे माझ्याकडे भाऊमहाराजांवरील कवितांची एक मोठी फाइलच आहे. पण योग येत नव्हता. या वर्षी तो योग आला. मी कविता निवडत होतो तेव्हा भाऊमहाराजांकडून तुमच्या कविता माझ्यापर्यंत आल्या. मला त्या फार आवडल्या. त्यावर चालीही लगेच बसल्या." केवळ सद्गुरू कृपेनेच हे घडू शकतॆ.
भाऊमहाराजांनी जरी चमत्कारांना अवास्तव महत्व दिले नाही तरी चमत्कार वाटावे असेच अनुभव आम्हाला आले. पण सद्गुरु परीक्षाही बघतात की या भक्ताचा संयम केवढा आहे. आमचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीलाच सद्गुरु भाऊंनी सांगितले की जो पर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत स्वतःची वास्तू, स्वतःचे घर घ्यायचे नाही. आम्ही भाड्याने घर घेऊन राहू लागलो. दोनदा अचानकपणे घरे बदलायचीही वेळ आली. दोन मुलांना घेऊन भाड्याची घरे बदलणे काही सोपे काम नव्हते. शिवाय भाडे ही खूप द्यावे लागत असे. कधी कधी मी अपसेट व्हायचे. स्वतःचे घर नाही भाड्याच्या घरात काही मनासारखे करता येत नाही. पण तरीही भाऊंनी सांगितले आहे म्हणजे यात नक्कीच आमचे हित असणार हा ठाम विश्वास होता. आणि दोन-सव्वा दोन वर्षांनी एका गुरुवारी नमस्कार करताना भाऊंनी बोटांनी टिचकी वाजवत आज्ञा केली " चला, आता लगेच घर बघायला सुरुवात करा. "
|