आम्हाला खूप आनंद झाला. पण माझी मनापासुनची इच्छा होती की आमचे घर हे स्थानाच्या जवळ असावे. एरिया लहान असला तरी हॉल मोठा असावा. (घरी नामस्मरण ठेवण्याच्या दृष्टीने) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळ मजला असावा, कारण सद्गुरु भाऊ आमच्या घरी बऱ्याच वेळा यायचे. भविष्यात त्यांना आमच्याकडे येताना जिने चढण्याचा त्रास होऊ नये यासाठी मला तळ मजल्यावरच घर हवे होते. या सर्व गोष्टी आणि आमचं बजेट - काही केल्या समीकरण जमत नव्हतं. एवढ्या जागा बघितल्या की आम्हालाही सहज इस्टेट एजेन्सी काढता आली असती.
गणपतीचे दिवस होते. भाऊमहाराज त्याच सुमारास पहिल्यांदा अमेरिकेला दौऱ्यावर जाऊन आले होते. ते ज्या दिवशी आले तेव्हा आम्ही त्यांचे दर्शन घेण्यासाठी स्थानावर गेलो. तेथून बाहेर पडताना सौ. सराफ नावाच्या भक्त भेटल्या, त्या स्थानाच्या अगदी जवळ रहात. त्यांनी मला त्यांच्या घरच्या गौरीच्या हळदी कुंकुवाचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी मी व माझे पती त्यांच्याकडे गेलो. सहज बोलता बोलता विषय निघाला आणि आम्हाला श्री. सराफांकडून कळले की त्यांच्या बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एक जागा रिकामी आहे. त्यांच्याकडे चावी होती. त्यांनी लगेच आम्हाला जागा दाखवली. माझ्या इच्छेप्रमाणे तीनही गोष्टी याठिकाणी होत्या. स्थानाच्या जवळ, हॉल मोठा होता आणि शिवाय तळ मजल्यावर. जागेचे मालक नगर येथे रहाणारे. त्यांचे नाव श्री. कुमुदकुमार वासुदेव कुलकर्णी.
मी भाऊ महाराजांचे स्मरण केले व भीतभीतच कुलकर्णी यांना नगर येथे फोन केला कारण अजून बजेट हा प्रश्न होताच. त्यांनी सांगितले साडेआठ लाख. मी पुन्हा भाऊंचे स्मरण केले व त्यांना म्हटले की, "आपण एकमेकांपासून लांब रहातो. त्यामुळे वाटाघाटीसाठी पुन्हा पुन्हा फोन करणे किंवा भेटणे शक्य नाही. आमचे बजेट साडेसात लाखाचे आहे. त्याहून जास्त आम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला मान्य आहे का? मी पुन्हा कधी फोन करु?" ते म्हणाले, "१५ मिनिटांनी करा. मी विचार करुन सांगतो." त्या १५ मिनिटात आम्ही स्थानावर जाऊन गुरुवर्य भाऊंच्या कानावर हे घातले. ते नेहमीप्रमाणेच प्रसन्नपणे म्हणाले, " काही चिंता करु नका."
१५ मिनिटांनी श्री. कुलकर्णी यांना नगरला फोन केला. ते म्हणाले Done . एकमेकांची काहीही ओळख नसताना, ब्रोकर मध्ये नसताना केवळ दोन फोनमध्ये मुंबईतील एका फ्लॅटचा व्यवहार होतो व १५ मिनिटात एक लाख रुपये कमी होतात हेच मोठे आश्चर्य होते. पण आमचा खरा प्रॉब्लेम तर पुढे होता. साडेसात लाख बोलून बसलो होतो पण पैशाची जमवाजमव करायची होती. बँकेचे कर्ज घ्यायचे होते. सर्व काही जमवूनही डेफिसिट होताच. वेळही कमी होता. तेवढ्यात विकासच्या बँकेत घरासाठीच्या कर्जाची रक्कम वाढली असल्याचं सर्क्युलर आलं. सद्गुरु आपल्या भक्तासाठी काय काय करतात ! बरोब्बर ती वेळ साधली जाते. आमचा आनंद गगनात मावेना. त्याच्या ऑफिसमध्ये वाढीव हाऊसिंग लोन मिळालेले आम्हीच पहिले होतो. अशाप्रकारे सद्गुरुंनी आमचे घर आमच्या इच्छेनुसार मांडून दिले व मग स्वतःच मिश्कीलपणे म्हणाले, " अरे, महाराजांनाच तुम्हाला स्थानाच्या जवळ आणायचे होते."
जर आंतरिक श्रद्धा व सबुरी असेल तर त्यानंतर जे पदरी पडते ते अशाप्रकारे 'न भूतो न भविष्यति' असेच असते. दोन-सव्वा दोन वर्षे गुरुंची आज्ञा पाळून आम्ही पाठीवर संसार घेऊन राहिलो (त्यात एकदा आमच्या घरी खूप मोठी चोरीही झाली. पण आम्ही भाऊंना त्याविषयी काही विचारले नाही). त्यामुळे नुसतं मनाप्रमाणे घर मिळणे एवढीच ऐहिक गोष्ट प्राप्त न होता आणखीही खूप मोठा अध्यात्मिक प्रसाद आम्हाला, विशेषतः मला प्राप्त झाला.
प पू भाऊ महाराज दर वर्षी माघ महिन्यात स्थानावर गुरुचरित्राचे मोठ्याने अस्खलितपणे पारायण करायचे. ३१ वर्षे अखंडितपणे त्यांनी 'श्री गुरुचरित्र सप्ताह’ केले. स्थानावर हा सप्ताह "गाणगापूर यात्रा उत्सव" म्हणून संपन्न व्हायचा. जवळ जवळ ५०० भक्त संकल्पपूर्वक ते श्रवण करण्यास यायचे. साक्षात सद्गुरुंच्या अमृतवाणीतील 'श्री गुरुचरित्र" वाचन ऐकणे ही भक्तांसाठी खरोखरच अतिशय भाग्याची गोष्ट होती. सद्गुरु भाऊंना सोवळ्यामध्ये अतिशय शुचिर्भुत अशा वातावरणात गुरुचरित्राचे पारायण करताना बघून डोळ्याचे पारणे फिटायचे.
या गाणगापूर यात्रा उत्सवाच्या सातही दिवशी निरनिराळे कार्यक्रम संपन्न होत. त्यात स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असणारे कीर्तन, नामजपाची लक्षार्चना व शेवटच्या दिवशी संगीताचा कार्यक्रम असायचा. आठव्या दिवशी महाप्रसाद असे. त्यासाठी भाऊमहाराज प्रवचनाच्या वेळी सर्वांना " कोणीही या दिवशी स्वतःच्या घरातील चूल पेटवू नका व पै-पाहुण्यांसकट या महाप्रसादाला या" असे स्वतः आमंत्रण करीत. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेत. महाप्रसादाच्या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास सद्गुरु भाऊ पाच घरांमध्ये भिक्षा कारित. भर उन्हामध्ये अनवाणी पायाने हा द्वारकाधीश योगी झोळी घेऊन भिक्षेला निघे. ही भिक्षा एकत्र करून ते शिजवून त्याचा नैवेद्य दाखवला जाई व तो प्रसाद वाढवून सर्वांना देण्यात येई. हाच तो महाप्रसाद.
आमचे घर स्थानाच्या जवळ असल्यामुळे सद्गुरु भाऊमहाराज आमच्या घरी भिक्षेसाठी येत व हाच आमच्यासाठी 'न भूतो न भविष्यति' असा योग. तो दिवस आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठ्या सणासारखा असायचा. दारासमोर रांगोळी काढली जायची. मी तर आमच्या बिल्डिंगच्या गेटपासूनच केर काढून रांगोळी काढायचे. आम्ही घरातील मंडळी सकाळपासूनच तयार होऊन सद्गुरुंची वाट पहायचो. खरं तर कोणाची वाट बघणं ही किती कंटाळवाणी गोष्ट असते नाही? पण मी सांगते, सद्गुरुंची अशी डोळ्यात प्राण आणून वाट बघण्यातसुद्धा केवढा आनंद असतो. तो आम्ही अनुभवलाय.
|