" ॐ भवति भिक्षामदेही" असे म्हणत आनंदयोगेश्वर भाऊ महाराज सुहास्य वदनाने दारासमोर उभे रहायचे. साक्षात श्रीदत्तगुरु. भिक्षा घेऊन ते जाईपर्यंत माझा देह माझा नसायचाच. संपूर्ण शरीर हलके व्हायचे. मनाची अवस्था संमोहन झाल्यागत व्हायची. प्रत्येक वेळी वाटायचे की या आनंदयोगेश्वरांशी , या गुरुतत्वाशी माझे जन्मोजन्मीचे नाते आहे.
या भिक्षेच्या निमित्तानेही त्यांनी मला गुरुभक्तीचे सार सांगितले. पहिल्यांदा जेव्हा भाऊ भिक्षेसाठी आले तेव्हा ५ घरी भिक्षा करून त्यांची झोळी जड होईल या त्यांच्या विषयीच्या काळजीने माझ्याजवळ असलेल्या भांड्यांतील थोडेच तांदूळ व डाळ मी त्यांच्या झोळीत घातले. तेव्हा भाऊ म्हणाले, “ श्रद्धा तुझ्याकडे जे हे ते सर्व मला अर्पण कर. गुरुच्याप्रती हातचे काही राखून न ठेवता सर्व समर्पणाचा भाव जो भक्त ठेवतो त्याला गुरुही आपल्याजवळचे तेज प्रदान करतो, जे सत आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे. ते सर्व तांदूळ व डाळ माझ्या झोळीत घाल. तुझे भांडे रिकामे कर, मग बघ गुरु तुझे जीवन जन्मोजन्मी कसे त्यांच्या कृपेने भरून टाकतात !"
आम्ही नेहमी म्हणायचो की भाऊ हे घर आमचे नाही तुमचेच आहे. या घरामध्ये अग्नी कुठे असावा (गॅसची शेगडी कुठे ठेवावी), देवघर कुठे असावे व आम्हाला हॉलमध्ये जी भाऊमहाराजांची खुर्ची ठेवायची होती ती कुठे ठेवायची हे सर्व भाऊंनीच (पहिल्यांदा जेव्हा ते घर बघायला आले तेव्हा) सांगितले.
एकदा भाऊंनी माघ महिन्यात आम्हाला नवग्रहांचा याग (हवन ) करण्यास सांगितले. १८ फेब्रुवारी १९९९ हा दिवस त्त्यांनीच सुचवला. ब्राह्मणसुद्धा त्यांनीच सुचविले. आम्ही भाऊंना म्हटले की , "भाऊ , हे तुमचे घर आहे. तुम्ही यायला पाहिज़े" भाऊ आले. ब्राम्हणांनी यजमानाला पाटावर बसण्यास सांगितले तेव्हा सवयीने ( यजमान म्हणून) माझे पती उठले. भाऊंनी त्यांना हाताने आहे त्या जागेवर बसण्याची खूण केली व स्वतः उठून पाटावर बसले, म्हणाले " अगं , हे माझेच घर आहे " व ते संपूर्ण हवन भाऊंनी स्वतः यजमानपदी बसून केले.
काय आनंद होता. आणि अजुनही आहे. अजुनही भाऊंचा श्वास त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्व आम्ही आमच्या घरात अनुभवतो. हे घर सोडून कुठेही जाण्याची इच्छाच होत नाहीं.
सद्गुरु भाऊ महाराजांचा कर्मकांडावर नाही तर कर्मयोगावर विश्वास होता. ते नेहमी सांगायचे की, "आपले दैनंदिन कर्तव्य चोख करा. ते करत असताना सद्गुरुंचे नाम घ्या" कोणीही आपले काम-धाम टाकून किंवा उगाचच ऑफिसला सुट्टी घेऊन त्यांच्याकडे आलेले त्यांना आवडत नसे. मला जेव्हा त्यांच्याच कृपेने 'जेट एअरवेज' या कंपनीमध्ये नोकरी मिळाली तेव्हा मला चांगली नोकरी मिळाल्याचा आनंद तर झालाच; परंतु 'आता मी सबंध दिवस ऑफिसमध्ये गुंतणार मग स्थानावर मला सेवा कशी करायला मिळणार ?’ या विचाराने मी अस्वस्थ झाले. माझी नोकरी अशी होती की मला रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावे लागे. त्याच सुमारास गाणगापूर यात्रा उत्सव सुरु झाला.
दर वर्षी या सप्ताहामध्ये माझ्याकडून महाराज काही ना काही सेवा करून घ्यायचे, तेवढा वेळही मी देऊ शकायचे. यावेळी मला खूप वाईट वाटले. मनामध्ये भाऊंना म्हटलं, "भाऊ माझ्यावर रागावलात का? का मला यावेळी असं दूर लोटलंत?" सप्ताह सुरु झाला. दर वर्षी प्रमाणे याही वेळी मी व माझे यजमान सकाळी श्रीगुरुचरित्र ऐकायला जाऊ लागलो. वाचन संपले की लगेच माझे यजमान मला स्कूटर वरून अंधेरी येथे ऑफिसला सोडत. त्यावेळी मी प्रोबेशनवर असल्यामुळे सुट्टी घेणे किंवा उशिरा जाणे योग्य नव्हते व मला माहित होते की माझ्या गुरुंनाही ते चालले नसते. रात्री यायला उशीर होई त्यामुळे ना संध्याकाळचा स्थानावरील कार्यक्रम मिळे ना सद्गुरूंची सेवा. ५ दिवस झाले. मन अतिशय खट्टू झाले. पण मनाची आर्तता असेल, सद्गुरुंविषयी कळकळ तळमळ असेल तर गुरु तो आनंद भक्ताला कसा देतात याचेच हे उदाहरण आहे.
सप्ताहाच्या ६व्या दिवशी रात्री पावणेदहाच्या सुमारास मी व माझे पती स्थानावर भाऊंना नमस्कार करायला म्हणून त्यांच्या खोलीत गेलो. भाऊंच्या घरून उपवासाच्या पदार्थांचा डबा आला होता. भाऊ सप्ताहामध्ये सातही दिवस उपवास करीत. सुरुवातीला अनेक वर्षे ते दूध व खजूर सोडून काहीही खात नसत परंतु वयोपरत्वे व अनेक भक्तांच्या आग्रहामुळे ते नंतर नंतर उपवासाचे पदार्थ घेत असत. आम्ही खोलीत गेल्यानंतर त्यांनी त्यांची नियमित सेवा करणाऱ्या एका भक्ताला सांगितले की, " आज मला श्रद्धा जेवण वाढेल." जणु काही ते माझीच वाट पहात होते.
जेवण बरेच थंड झाले होते. मी गरम करून पहिल्यांदा वाढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा गरम करण्यास उठणार एवढ्यात ते म्हणाले , "तू बैस. विकास ते गरम करेल" मग विकास म्हणजे माझे पती एक एक पदार्थ गरम करून मला आणून देत व मग मी ते वाढत असे . भाऊ अखंड बोलत होते. त्यामुळे खाण्याचा वेग कमी होता. तो वाढलेला पदार्थ पुन्हा थंड होऊन जाई. मी त्यांना पुन्हा खाण्याची आठवण करी. असे करत करत रात्रीचे ११.१५ वाजले. दुसऱ्या दिवशी भाऊंना वाचनासाठी सकाळी साडेचार वाजता उठायचे होते. बाहेर अनेक स्वयंसेवक व भक्त बसलेले होते. सर्वांनाच सद्गुरुंचा सहवास हवासा वाटायचा याचीही मला जाणीव होती. परंतु भाऊ उठूनच देत नव्हते. प्रत्येक वेळेस उठायला गेले की बैस म्हणत. मला सद्गुरुंची सर्व लीला कळत होती. माझी गेल्या ५ दिवसांची कळकळ त्यांच्यापर्यंत पोचली होती.
|