त्यादिवशी भाऊ महाराज माझ्याशी पूर्णतः अध्यात्मिक विषयांवर बोलले. त्यांची त्यांच्या गुरुंशी असलेली नाळ, ते त्यांच्या गुरुंशी कसे बोलतात, गुरु कशाप्रकारे त्याच्या सद्भक्ताला जन्मोजन्मी आपल्या जवळ ठेवतो, त्याला सांभाळतो अशा अनेक विषयांवर ते ओघवते बोलत होते. त्या ओघात मीही त्यांना म्हटले की, "भाऊ, या जीवाला कधीही कुठल्याही जन्मात स्वतःपासून वेगळं करू नका. सद्गुरुंच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात या जडदेहाकडून व जीवात्म्याकडून तुमची अखंड सेवा करून घ्या. " आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी माझ्या मस्तकावर दोन्ही हात ठेवले व उत्तरले "तथास्तु."
एवढा मोठा प्रसाद कदाचित मला सात दिवस सुट्टी घेऊन सेवा केल्यानंतरही मिळाला नसता. किती प्रिय होता त्यांना कर्मयोग. रोजचे काम करत असताना जर का सद्गुरुशी सतत मनाने जरी अनुसंधान ठेवलं (देहाने येणे शक्य नसेल तर ) सद्गुरु त्या भक्ताला, त्या साधकाला काय आनंद देऊ शकतात!
असेच एकदा भाऊंच्या खोलीमध्ये बसून त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. त्या काळात मला अध्ये-मध्ये खूप वैराग्य यायचे. माझा नवरा , माझी मुले, माझे घर यात काही अर्थ नाही ही फक्त या भौतिक जगतातील नाती आहेत, बंध आहेत. यातून बाहेर पडायला हवे असे वाटायचे. तर कधी कधी घरातल्या एखाद्या लहानशा गोष्टींमध्येही मन गुंतून रहायचे. त्याविषयी गुरुवर्य भाऊंना मी विचारले की, "भाऊ, मी कधी कधी इतकी अनासक्त होते की या सर्वांपासून खूप लांब जावेसे वाटते. कशात काही अर्थ नाही असे वाटते. तर कधी तीच मी माझ्या मुलाच्या परीक्षेत गेलेल्या अर्ध्या मार्कासाठीही अपसेट होण्याइतकी जीवनाप्रती आसक्त होते. मलाच कळत नाही यातली खरी 'मी' कोण आणि संपूर्ण वैराग्य व संपूर्ण आसक्ती या मनाच्या अवस्थेतून बाहेर कसे पडायचे?”
भाऊ महाराज मनापासून हसले व म्हणाले, " चांगला प्रश्न आहे माझ्याकडे असे प्रश्न घेऊन फार कमी लोक येतात. श्रद्धा, एक गम्मत सांगतो, तसं कर. ज्यावेळी मन जडवस्तूसाठी आसक्त होईल, त्यावेळी इथे स्थानावर येऊन महाराजांचा जप करत बैस. आणि ज्यावेळी कशात काही अर्थ नाही असे वाटेल व मन पूर्ण अनासक्त होईल त्यावेळी एक झकासपैकी सिनेमा बघ." भक्ताला सिनेमा बघण्याचा सल्ला देणारा असा एखादाच सत्पुरुष असेल ना ! पुढे भाऊ म्हणाले, "शरीराने आणि मनाने सगळ्यामध्ये असूनही कशातच नसणं हे खरं अध्यात्म. शरीर कुठेही असलं तरी मन आपल्या सद्गुरुंच्या ठिकाणी असावं. आताच बघ ना ! मी आता तुझ्याशी बोलतो आहे. तुला असं वाटतंय की मी तुझ्याबरोबर बसलो आहे. तुझ्याशी बोलतो आहे. पण खरं म्हणजे मी बाहेर माझ्या गुरुंच्याकडे , महाराजांकडे बसलो आहे. असं असायला हवं आणि श्रद्धा , एक लक्षात ठेव वैराग्य हे मनाचं असावं". अध्यात्मातील हे मर्म त्यांनी मला किती सहजपणे सांगितलं. अशाप्रकारे दैनंदिन जीवन व अध्यात्मिक जीवन यांची योग्य प्रकारे सांगड घालण्याची शिकवण त्यांनी आम्हाला नेहमीच दिली.
आनंदयोगेश्वर भाऊंनी दृष्टांतरूपानेही अनेक वेळा दर्शन दिले. १९९४ साली एकदा स्वप्नामध्ये मी माझ्या मुलीच्या शाळेत गेले असता त्या ठिकाणी भाऊ आले. त्यांनी हाफ शर्ट घातला होता. भाऊंना शर्ट पॅंटमध्ये मी पहिल्यांदा व शेवटचे पाहिले ते त्या स्वप्नातच. ते खूप चिडलेले दिसत होते. ते मला रागावून म्हणाले "किती दिवस मी तुझी वाट बघायची? लवकर माझ्याबरोबर चल. मी त्यांच्या मागून गेले तर समोर एक सफेद रंगाची लांबलचक गाडी उभी होती. त्यांनी मला गाडीमध्ये बसण्यास सांगितले. ती गाडी लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह होती मी उजवीकडे बसले मात्र, भाऊंनी जोरात गाडी चालू केली. त्यानंतर एक खूप मोठा रस्ता होता व त्या रस्त्यावरून आमची गाडी सुसाट वेगाने जात होती. या दृष्टांतानंतर लगेचच भाऊंचा अनुग्रह झाला. (२४ जुलै १९९४)
त्यापूर्वीही खरं म्हणजे, स्थानावर नियमितपणे यायला सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच मला भाऊमहाराजांचा पहिला जाज्वल्य दृष्टांत मिळाला - मी व माझी मैत्रीण रश्मी बसने प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या खोपोली येथील स्थानावर गेलो. अफाट गर्दी होती. भाऊ खूप लांब उभे होते. त्यांनी जांभळ्या रंगाचं सोवळं परिधान केलं होतं. आम्ही टाचा वर करून भाऊ महाराजांना पहाण्याचा प्रयत्न करत होतो व इतक्यात गर्दीतून वाट काढत स्वतः भाऊमहाराजच माझ्याजवळ आले व चटकन म्हणाले "माझ्याबरोबर चल. तुला माझ्याबरोबरच यायचंय."
त्यानंतर ज्यावेळी मला आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांचा अनुग्रह मिळाला त्यावेळीही ते जांभळ्या रंगाचेच सोवळे नेसले होते. हा योग की निव्वळ योगायोग? याही प्रश्नाचं उत्तर मिळालं ते १९९८ साली जेव्हा अनुग्रहाच्या पादुकांचा पुनः संस्कारण सोहळा स्थानावर संपन्न झाला.
मी भाऊंना सहज मनात म्हटलं की, "भाऊ हा जर निव्वळ योगायोग नसेल तर याही वेळेस तुम्ही जांभळ्या रंगाचे सोवळे परिधान केले असले पाहिजे." प्रचिती मिळाली पाहिजे. आणि काय आश्चर्य ! भाऊ खरंच याही वेळी जांभळ्या सोवळ्यातच होते. वरील सर्व अनुभव व प्रचिती देऊन माझ्या आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांनी दृष्टांतामध्ये उच्चारलेले स्वतःचे शब्द खरे केले "माझ्याबरोबर चल, तुला माझ्याबरोबरच यायचंय."
॥श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ॥
तुम्ही जर का खरे भक्त झालात तर जे मनात आणाल ते करु शकाल. जे साक्षात ईश्वराला शक्य नाही ते भक्ताला शक्य आहे.
..... आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराज
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|