आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांनी आपल्या गुरुंचा, प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा, प्रचार व प्रसार करतानाच अनेक भक्तांना आपल्या कृपाशीर्वादाने कृतार्थ केले. भक्तांना अनेक प्रकारचे साक्षात्कारी अनुभव देतांना ते निरनिराळ्या रूपात भेटत गेले. भक्तांना त्यांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळून अनेक प्रकारचे अनुभव येत गेले.
भाऊ महाराजांकडे समाजातील सर्व स्तरावरील लोक येत. त्यामध्ये गरीब, श्रीमंत, अशिक्षित, सुशिक्षित, उच्चविद्याविभुषित असे अनेक प्रकारचे लोक असत. भाऊ महाराजांनी कुठलाही धर्मवाद (इझम) कधी मानला नाही. त्यांच्याकडे मराठी, गुजराथी, दाक्षिणात्य तसेच मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्व जाती धर्माचे लोक येत. ते जिथे जिथे जात तिथले लोक भाऊमय होऊन जात. म्हणूनच त्यांचे अरब, अमेरिकन, झाम्बियन भक्तही होते, आजही आहेत.
भाऊंच्या प्रत्येक शब्दाची प्रचिती सर्वांना तेव्हाही येत होती व आजही येत आहे. या साक्षात्कारी अनुभूतींच्या कोषातील काही पदर मी आपल्यासमोर या भागामध्ये उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
सद्गुरु भाऊ महाराजांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला वाटायचे की भाऊ माझे आहेत. प्रत्येकाला ते हे जाणवून द्यायचे की 'मी तुझाच आहे, तुझ्यामध्येच आहे.' वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाचे गुरुभाऊंशी एक प्रकारचे हळुवार नाते निर्माण झाले होते. प्रत्येकाशी ते तेवढ्याच प्रेमाने, उत्कटतेने बोलायचे. दिवसाकाठी जवळ जवळ चाळीसेक लोक त्यांच्याशी संपर्क करीत, प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरून. गुरुवारी तर मिनिटागणिक फोन येत, तरी ती व्यक्ती समोर आल्यावर किंवा त्या व्यक्तीने पुन्हा फोन केल्यास त्या प्रत्येक व्यक्तीला भाऊ विनासायास ओळखत. तिच्या समस्येविषयी किंवा आनंदाच्या बातमीविषयी स्वतःहून विचारीत. कोणाला काय करायला सांगितले आहे हेही त्यांच्या बरोब्बर लक्षात असे. त्यांच्या सर्व भक्तांना याचे विलक्षण आश्चर्य वाटे.
कोणाला विचारीत, "काय, कसा आहे आता तुझा पाय ?" तर कोणाला, "मी तुला जपाची डायरी लिहायला सांगितली होती. लिहोतोस की नाही ?" कोणाला समोर आल्यावर लगेच एखादे आयुर्वेदिक औषध लिहून देत. मग तर त्या औषधाचा गुण दुपटीने मिळे. तो आजार बरा करायला ते औषध एक निमित्त असे. एकदा माझ्या दुसऱ्या बाळंतपणानंतर लगेचच मला किडनी स्टोन झाला. ऍलोपॅथिक गोळ्या घेणे योग्य नव्हते. गुरुवर्य भाऊंनी मला दोन प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या लिहून दिल्या. मला औषधाच्या गोळ्या घ्यायचा असाही कंटाळा. गुरुवर्य भाऊंनी दिलेल्या गोळ्या म्हणून थोडे दिवस घेतल्या व नंतर खरंच देव्हाऱ्यात ठेवल्या. आजपर्यंत मला किडनी स्टोनचा त्रास नाही
गुरुवर्य भाऊंनी अनेक लोकांना रूढ अर्थाने जीवनदान दिले. कित्येक संसार केवळ गुरुवर्य भाऊ महाराजांच्या कृपार्शीवादाने आज आनंदाने चालले आहेत. जी लहान मुले गुरुवर्य भाऊंच्या कृपाशीर्वादाने जन्मली आहेत त्यांचे भाग्य तर किती थोर! आम्हाला जे वातावरण वयाच्या पंचविशीला मिळाले, ते ही मुले लहानपणापासून अनुभवत आहेत. भाऊ आजोबांवरील विश्वास हा त्या लहानग्या मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला प्रेरित करतो आहे. माझ्या ९ वर्षाच्या मुलाला लहान असल्यापासून एवढा आत्मविश्वास आहे की तो म्हणतो "आई, मला कशाची भीती वाटत नाही. भाऊ आजोबा माझ्याबरोबर आहेत. शाळेतसुद्धा काही अडले की मी भाऊ आजोबांची आठवण करतो.”
आज मनुष्य जीवनावरील व स्वतःवरील हा अढळ विश्वासच हरवून बसला आहे. हा आत्मविश्वास कमावण्यासाठी, स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आज आम्ही कुठले कुठले कोर्सेस शोधतो. तेथे अमाप पैसा व वेळ वाया घालवतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी निरनिराळ्या गोळ्या घेतो. त्याचप्रमाणे आयुष्यातील दैनंदिन तणावातून मुक्त होण्यासाठी किंवा त्यापासून तात्पुरते दूर पळण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करतो. हे सर्वस्वीपणे गैर आहे असे मला म्हणायचे नाही. परंतु या सर्व गोष्टी एका नामाच्या माध्यमातून प्राप्त होत असतील तर ! जे आनंदयोगेश्वर भाऊ महाराजांनी आम्हाला प्राप्त करून दिलं.
मात्र सध्याच्या 'फास्ट लाईफ' मध्ये सर्वांना इन्स्टंट रिझल्टची सवय लागली आहे. परंतु अशा इन्स्टंट रिझल्टने मिळणार आनंद हा बहुतेक वेळेला फसवा किंवा तात्पुरता असतो. नामाच्या माध्यमातून सद्गुरु भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद हा काही वेळेला पटकन जरी मिळाला नाही तरी; जेव्हा मिळतो तेव्हा शाश्वत टिकतो. चिरंतन रहातो. या नामाच्या माध्यमातून अनेक जन्मीच्या दोषांचे क्षालन होते. आपण फक्त आपले दैनंदिन कर्म करत करत नाम घ्यावे व स्वतःला त्या परमशक्तीच्या हातात तिच्या भरवश्यावर सोडून द्यावे. आपण चालता चालता थकू शकतो पण जेव्हा ती परमशक्ती, ते सद्गुरु नाम आपल्याला चालवते ना तेव्हा अनेक सुखदुःखे सहन करीत हा जीवनाचा भवसागर आपण केव्हा पार करतो हे आपणांस कळतही नाही.
परंतु अध्यात्म किंवा नाम घेणे ही म्हातारपणात करण्याची गोष्ट आहे असा एक सर्वसाधारण समज आहे. एखादी मोठी समस्या आली की आपण कुठल्यातरी परमशक्तीला नवस करण्यासाठी तिची करुणा भाकण्यासाठी धावतो. पण जर का नियमितपणे आपण त्या परमशक्तीचे नामस्मरण करत राहिलो तर ती परमशक्ती त्या समस्येतून आपल्याला आपसुकपणे कधी बाहेर काढते ते आपल्याला देखील समजत नाही. हेच नाम जर साक्षात सद्गुरु मुखातून आले असेल, त्यांनी सिद्ध केलेले असेल तर त्या नामाला एक वेगळे परिमाण प्राप्त होते. पण आपण आपल्याच बँकेच्या खात्यातून वाट्टेल तेवढी रक्कम काढू शकतो का ? अजिबात नाही. जेवढी आपली खात्यात जमा आहे तेवढीच रक्कम आपण काढू शकतो. अध्यात्माचे सायन्स काही वेगळे नाही. काही नव्याने निर्माण होत नाही व काहीही नष्ट होत नाही, हे विज्ञान सांगते. मग जेवढे सद्गुरु नामाचे सुकृत तुमच्या नावावर जमा होईल तेच तुमच्या आपदकाळामध्ये तुमच्यासाठी अधिकाराने वापरले जाऊ शकते.
वार्धक्याची सोय आपण तरुणपणापासूनच सुरु करतो - बँक सेव्हिंग, फिक्स डिपॉझिट, एल. आय. सी. पॉलिसि, काय काय करतो आपण ! पण त्याचबरोबर दैनंदिन नित्य-कर्मे करतां करतांच सद्गुरुनामाचं गाठोडं बांधलं व तो संचय वाढवला तर ! ….तर त्याचे रूपांतर संचितामध्ये होते. या मिळकतीवर कोणताही टॅक्स नाही; मात्र ही मिळकत व हे संचित पिढ्यान पिढ्या पुरते. कारण सद्गुरु नाम आणि सद्गुरु कृपा ही शाश्वत असते. पण आपण मात्र आयुष्यभर सर्व अशाश्वत गोष्टींच्या मागे पळत रहातो आणि ज्यावेळी जीवनाचे एकमेव सत्य मृत्यू समोर येतो त्यावेळी जाणीव होते की 'अरे, मी आयुष्यात माझ्यासाठी असं खरंच काय मिळवलं, जे मी जाताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. आता या पुढच्या प्रवासात कोणाची साथ मला मिळणार आहे ? कुठलेही बँक खाते मला यापुढच्या प्रवासात उपयोगी पडणार आहे का?’ आणि मग इच्छा असली तरी यावेळी वेळ निघून गेलेली असते, सर्व गात्रे थकलेली असतात. जीवनाचे खरे संचित साठवायचे राहून गेलेले असते.
हे सर्व मी माझ्या आजुबाजुच्या लोकांना अनुभवताना पाहिले आहे. म्हणूनच सांगते भक्तीचे संचित जमा होऊ द्या, नामाचा संचय करा - जे शाश्वत आहे , जे आम्हाला आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांनी सिद्ध करून दिले आहे या 'नमो गुरवे निळकंठाय' या नामाच्या आनंदतुषारांच्या शिडकाव्यात आम्ही न्हाऊन निघतो आहोत.
हे आनंदाचे तुषार समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचावे, त्यांच्यामध्ये हे भक्तीचे , श्रद्धेचे, नामाचे बीज अंकुरावे व आपले दैनंदिन जीवन जगता जगता मिळू शकणारा हा शाश्वत आनंद सर्वांना प्राप्त व्हावा हीच आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना !
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|