सौ. रुपाली विलास घाग
त्या काळात माझ्या घरच्या बिकट समस्यांमुळे मी नेहमी चिंताग्रस्त असे. नेहमी 'श्री साईचरित्र' वाचतेवेळी वाटे की, आज साईबाबा देहरुपात असते तर मी त्यांच्याजवळ प्रत्यक्षात हे सर्व बोलले असते, माझे दुःख हलके केले असते, ज्यांच्याशी मी प्रत्यक्षात बोलू शकेन, असे कोणी गुरु आताही असतील का ? या विचारात मी बऱ्याचदा असायचे. आणि अचानक एक दिवस माझी एक मैत्रीण माझ्याकडे खूप दिवसांनी आली. सहज बोलता बोलता तिने मला सद्गुरू भाऊमहाराजांविषयी सांगितले व मला स्थानाचा पत्ताही दिला. मला तेव्हाच फार बरे वाटले आणि मनाला ध्यास लागला, तो सद्गुरु भाऊमहाराजांच्या भेटीचा.
असेच एका गुरुवारी माझ्या दोन मुलांना घेऊन स्थान शोधत शोधत आले, तिथले वातावरण भक्तिरसात रंगून गेलेली भक्तमंडळी, गुरुवर्य भाऊंचे प्रसन्न व्यक्तिमत्व व त्यांचे मधाळ वाणीतील प्रवचन हे सर्व पाहून मी भारावून गेले. तरीही मनाला आंतरिक ओढ लागली होती ती सद्गुरु भाऊमहाराजांशी प्रत्यक्ष बोलून मन हलके करण्याची. त्या दिवशी भेटण्याचा योग आला नाही (नंबर मिळाला नव्हता) लगेचच्या शनिवारी नंबर मिळाला व हे लक्षात आले कि सद्गुरु जे काही घडवतात ते आपल्या भल्यासाठीच; कारण त्या दिवशी महाशिवरात्र होती. ब्रह्मा , विष्णू, महेश या तीन तत्वांपैकी महेश तत्वाचे दर्शन मला कदाचित घडायचे होते.
खरंच काय आनंद ! सद्गुरु भाऊ महाराजांनी जे काही सांगायचे ते मला सांगितले. त्यावर मी विश्वास ठेवला. आपल्याला गुरुमाऊलीने जी आज्ञा दिली आहे ती आपण पाळायची, बाकी दुसऱ्या कशात लक्ष घालायचे नाही हा विचार केला व त्या श्रद्धेने त्याचे पालन करायला सुरुवात केली, माझे प्रश्न हळूहळू सुटत गेले व मला जीवनात आनंदाचा लाभ झाला .
त्यावेळी मी घरच्यांपासून लपवून मुलांना घेऊन स्थानावर यायचे. काय करणार ? घरी सांगितले तर आपल्याला पाठवणार नाहीत. पण या गोष्टीचे मला नेहमी वाईट वाटायचे. केवळ सद्गुरु भाऊंच्या कृपेमुळे मला इथे येण्याची परवानगी मिळाली व माझा आनंद द्विगुणित झाला. भीती संपली.
त्यानंतर स्थानावर येत राहिले. एक दिवस खोपोलीलाही प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महारांचे स्थान आहे हे मला समजले. मे महिन्यात महाराजांच्या पालखीचा सोहळा होता. पण खोपोलीला जायला घरून परवानगी मिळेल की नाही ही भीती होती. शिवाय पैशाचीही सोय नव्हती. घरी विचारले तर या स्थानावरही यायची बंदी व्हायची व 'तेलही जायचे आणि तूपही जायचे' या विचाराने मी घरी विचारले नाही. पालखीला जायला न मिळाल्याचे दुःखही होते व मनामध्ये सतत भाऊंशी बोलणे चालू होते आणि काय आश्चर्य ! स्वामी महाराजांनी साक्षात स्वप्नात येऊन दृष्टांत दिला !
मी कधीही खोपोलीला गेले नव्हते; त्यामुळे प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा पुतळा पहाण्याचा संबंधच कधी आला नव्हता. परंतु स्वप्नात तशीच पंचधातूची मूर्ती आणि भक्तांची दर्शनासाठीची गर्दी दिसत होती. त्या गर्दीत मीही होते. बाजूलाच होम केलेला दिसला. त्यातील विभुती मला हवी होती. आणि अचानक मला हाक मारली गेली. मी जरा भांबावून गेले. पहाते तर समोर साक्षात टेंबे स्वामी महाराज सजीव रूपात ! त्याच मूर्तीच्या स्वरुपात ! त्यांनी हात पुढे केला होता व त्या हातात विभुतीची पुडी होती. त्यांनी मला ती विभुती घेण्यास सांगितले. स्वप्नांतही मला इतका आनंद झाला की मी त्याचे शब्दात वर्णन करू शकत नाही. भक्तीने व कृतज्ञतेने ऊर भरून आला व मला जाग आली.
माझी खोपोलीला जाण्याची तीव्र इच्छा माझ्या गुरूंपर्यंत पोचल्याची पोचपावती मला मिळाली आणि त्याचवेळी सद्गुरु भाऊमहाराजांचे शब्द आठवले की - "कळकळ-तळमळ असेल, आंतरिक ओढ असेल तर सद्गुरु त्या भक्तासाठी काहीही करु शकतात."
ज्यावेळी पहिल्यांदा मी खोपोलीला जाऊ शकले त्यावेळीही जाऊ शकेन की नाही याविषयी मी साशंकच होते. जेव्हा हे गुरुवर्य भाऊंशी बोलले तेव्हा ते प्रसन्नपणे म्हणाले, "बाळ, काळजी करु नकोस. घरून तुला यायला परवानगी मिळेलच." व खरेच तसे घडले. खोपोलीला गेल्यानंतर सद्गुरु भाऊंना नमस्कार करताना, "असाच आनंद करा हं बाळ" हे त्यांचे शब्द आणि दोन्ही हात उंचावून दिलेला आशीर्वाद आजही मी विसरू शकत नाही. "स्थानावर माझे सद्गुरु प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सजीव स्वरूपात वावरताहेत. त्यांना नीट पहा म्हणजे तुम्हाला दिसेल की महाराज बोलतात, हसतात" या भाऊंच्या शब्दाची प्रचिती अशा प्रकारे मला दृष्टांतरूपाने अनेकवेळा आली आहे.
खरोखरच माझी गुरुमाऊली भाऊ ही माझी आईच आहे. प्रत्यक्षात माझी आई लहानपणीच देवाघरी गेली त्यामुळे मी आईच्या वात्सल्यापासून वंचित होते." पण आता वाटतं, मला माझी आई माझ्या स्वामी महाराजांनी पुन्हा मिळवून दिली आहे, ती माझ्या गुरुमाऊली, भाऊंच्या रूपाने. त्यांच्याकडे आल्यापासून मी दुःख जवळजवळ विसरूनच गेले आहे.
जीवनात दुःख येतच नाही असे नाही परंतु मग लगेच मला गुरुमाउलीची आठवण होते. त्यांचे आचारविचार आठवतात व ते दुःख सुसह्य होते. जेव्हा या माउलीला डोळे भरून पहाते तेव्हा मनाला खूप धीर येतो व वाटते की माझ्या दुःखावर फुंकर घालायला माझी माऊली असताना मी कशाला रडू ? मला तिला काही सांगायचीही गरज नाही. फक्त तिचे चरण घट्ट धरुन तिची मनापासून सेवा करायची आणि तिने नेमून दिलेल्या मार्गावरून चालत रहायचे. आज सद्गुरु भाऊमहाराज जरी निर्गुण रूपात असले तरी माझ्या जीवनातील त्यांचे अस्तित्व मला आजही पदोपदी जाणवते. आजही त्यांच्या शब्दांची प्रचिती मला येते. या माझ्या गुरुमाऊलींकडे हेच कळकळीचे मागणे मागते की त्यांची चरणसेवा माझ्याकडून सदैव होत रहावी.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|