स्नेहल पाटील
१५ नोव्हेंबर १९९० रोजी प.पू. थोरले स्वामी महाराजांच्या बोरिवली येथील स्थानावर मी व माझे पती पहिल्यांदा गेलो. "तो परत येणार आहे" असे शब्द प.प. थोरल्या महाराजांनीच गुरुवर्य भाऊ महाराजांच्या मुखातून उच्चारले आणि खरोखरच तो २७ ऑगस्ट १९९१ रोजी या जगात पुन्हा आला. कोणालाही अशक्य कोटीतली वाटणारी ही घटना सत्य बनून, दत्त म्हणून पुढे उभी राहिली. तो म्हणजे आमचा मुलगा-अमेय. तेरा वर्षे आमच्यात राहून अकस्मातपणे आम्हाला सोडून गेला. त्यावेळी माझे वय ३७ वर्षांचे. संतती नियमनाचे माझ्यावर झालेले ऑपेरेशन १३ वर्षांनी ओपन केले. डॉक्टरांनी कुठली खात्री दिली नव्हती. असे असताना तो महाराजांचे दर्शन होऊन या जगात पुन्हा आला - केवळ माझी गुरुमाऊली भाऊंच्या आशीर्वादाने.
१५ नोव्हेंबर १९९० रोजी आमची नाळ प.प. वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज व सद्गुरु भाऊमहाराज यांच्याशी स्थानाच्या माध्यमातून जोडली गेली व बाळाला आईच्या उदराचे कवच मिळावे तसे आम्हाला सद्गुरुंचे संरक्षण लाभले. सद्गुरूंची कृपादृष्टी, त्यांच्यावर असलेली आमची अढळ श्रद्धा व सततचे अनुसंधान यामुळे आमच्या मनोकामना पूर्ण होतात. कुठल्याही कठीण प्रसंगी आम्ही जमल्यास दर्शन घेऊन, नाहीतर मनोसंधानाद्वारे स्वतःला भाऊंवर सोपवतो व सतत त्यांनी सांगितलेला जप करत रहातो. यश आले नाही असे कधी झाले नाही. त्यांचा वरदहस्त सतत आमच्यावर असतो याची प्रचिती कशी येते यासाठी उदाहरणादाखल एक सत्यकथा :-
मी ठाणे महानगर पालिकेत शिक्षिका म्हणून काम करायचे. काही कारणास्तव २५/३० शिक्षकांचे पगार एकदम दोन-अडीच हजारांनी कमी केले. त्याचा फटका मलाही बसला. आम्ही सर्वांनी अर्ज विनंत्या केल्या, उच्च पदस्थांच्या भेटी घेतल्या, थोरामोठयांना मध्यस्थ केले. पण काम झाले नाही. शेवटचा उपाय म्हणून कोर्टाची पायरी चढलो. अन्याय झाला होता पण कोर्टाचा कारभार साक्षीपुराव्यांवर अवलंबून. म्हणून आम्ही सर्वच जण घाबरलो होतो. शंकाकुशंका काढत होतो. मीही निकालाबद्दल साशंक होते. सतत तेच तेच विचार मनात येऊन बेचैन होत होते. काय करावे सुचत नव्हते. ८ दिवसांत केस जिंकून देतो असे वकिलांनी सांगितले होते. पण तारखांवर तारखा पडत होत्या व निकाल लांबणीवर पडत होता. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
माझ्या मनात मग विचार आला - 'आजपर्यंत महाराजांनी आपल्याला अंतर दिले नाही. हे ही महाराजांवर सोपवून शांत बसावे.' स्थानावर जाऊन भाऊंच्या कानावर घालायला या ना त्या कारणाने शक्य झाले नाही. शेवटी मनातल्या मनात स्वामी महाराजांचे व भाऊ महाराजांचे स्मरण केले व सर्व काही त्यांच्यावर सोपवले. मन शांत झाले. शेवटची तारीख २८.७.९८ या दिवशी होती आणि दोन दिवस अगोदर भाऊमहाराजांनी मला दृष्टांत दिला.
पहाटेच्या वेळी भाऊमहाराज माझ्या स्वप्नात आले. ते कुठल्याशा दुकानात अत्तर खरेदी करत होते. मीपण त्या ठिकाणी होते. अत्तर कसे आहे हे बघण्यासाठी किंवा अत्तराचा स्प्रे कसा उडतो हे पहाण्यासाठी भाऊंनी माझ्या अंगावर अत्तर स्प्रे केले. सर्व अंगावर अत्तराचा शिडकावा झाला, सर्व वातावरणात सुगंध दरवळला. मन मोहून गेले व अशा प्रसन्न मनःस्थितीत जाग आली. दोन मिनिटे मी विचारात पडले की काय असेल या स्वप्नाचा अर्थ? काय सुचवायचे आहे सद्गुरुंना असा दृष्टांत देऊन ? दोन दिवसावर आलेल्या केसची एकदम आठवण झाली आणि अर्थ उमगला. हो! हाच अर्थ आहे या दृष्टांताचा ! शंकाच नको. केसचा निकाल नक्कीच आपल्या बाजुने लागणार. मी मनात पक्के केले व निश्चिन्त झाले.
निकालाचा दिवस उगवला. माझ्या एका सहकाऱ्याने फोन केला, "अहो पाटीलबाई, आज निकाल आहे. गणपती पाण्यात बुडवा." मी चटकन म्हणाले, "गरज नाही. केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार. तसा दृष्टांत माझ्या गुरुंनी मला दिला आहे." "एवढे का तुमचे गुरु 'पॉवरफूल' आहेत की ते निकाल आपल्या बाजुने लावतील?" सहकाऱ्याचा प्रश्न. "फारच पॉवरफूल आहेत. त्यात काहीच फरक पडणार नाही." मी ठासून सांगितले.
संध्याकाळ झाली. दुसऱ्या एका सहकाऱ्याने फोन केला. "आपण केस जिंकली आहे." मन आनंदाने उल्हसित झाले. कशासाठी ? केस जिंकली म्हणून की सद्गुरू भाऊंचा दृष्टांत खरा ठरला म्हणून ! ....
असे माझ्या बाबतीत का घडते? काय करते मी सद्गुरुंसाठी ? मी एक प्रपंचात गुंतलेली गृहिणी आहे. महाराजांच्या सेवेत स्वतःला झोकून देऊ शकत नाही. पण यथाशक्ती मी महाराजांना शरण जाते. त्यांचे स्मरण, जप करीत रहाते. आनंदयोगेश्वर भाऊ महाराजांचे नाव सदा सर्वकाळ मुखावर ठेवते. बस. एवढ्याच अनुसंधानातून मला एवढा कृपाप्रसाद मिळतो. स्वामी महाराज व भाऊ महाराज सतत पाठीराखे बनून पाठराखण करतात. किती भाग्यवान आहे मी !
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|