श्री. अनंत शेट्ये , भाईंदर
अध्यात्म्यातील अज्ञात रहस्य
श्री शरद तळवळकरांना कोणीतरी प्रश्न विचारला सर्वात निःस्वार्थ प्रेम कोणाचे ? तळवळकर ताडकन उत्तरले निसर्गाचे आणि गुरुचे. हे खरंच आहे ना ! जसे सूर्य, चंद्र, नद्या, वृक्ष, वेली मानवाला प्रकाश, शांत-शीतल किरणे, जल, फळे, फुले देत असतात आणि मानवाचे जीवन समृद्ध करीत असतात तसेच गुरुही अध्यात्ममार्गाने निःस्वार्थ प्रेम देऊन मानवी जीवन कृतार्थ करीत असतात. या बदल्यात निसर्ग आणि गुरु घेत मात्र काहीच नाहीत.
प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजेच आमचे आनंदयोगेश्वर सद्गुरू भाऊ महाराज (भाऊमहाराज हे जरी रूढ अर्थाने टेंबे स्वामी यांचे भक्त असले तरी आमच्यासाठी ही दोन्ही स्वरूपे एकच होती व आहेत) यांच्या दर्शनासाठी मला जवळ जवळ २५ वर्षे प्रतिक्षा करावी लागली. सद्गुरुंचा शोध मी अनेक वर्षे घेत होतो. भेटत होते मात्र बुवा, ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक व दंभी बाबा. सद्गुरु भेटावे ही तळमळ कायम होती. सद्गुरु भेटतील या आशेने अनेक ठिकाणी गेलो पण पदरी निराशा येत असे.
असाच एकदा आपत्तीत एका साप्ताहिकात श्री. फादर अग्रेल बाबा यांच्या बांद्रा येथील समाधीबद्दल व तेथील चमत्काराबद्दल आलेल्या वृत्तांतावरुन मी दर रविवारी त्या ठिकाणी जाऊ लागलो व त्यांच्या समाधीसमोर प्रार्थनेस हजर राहू लागलो.
तेथे येणाऱ्या हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण होत असत परंतु तेथे वैयक्तिकदृष्ट्या प्रश्न सोडवले जात नसत. मग मला मार्ग कसा सापडणार ? पण तेथे जाऊन नियमितपणे प्रार्थना करू लागलो की, "बाबा फादर अग्रेल मला माझे सद्गुरु दाखवा. मी माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडेन. मी त्यांच्याशी बोलेन. माझे दुःख व्यक्त करेन. मी येथे येतो पण माझे समाधान होत नाही. मला माझे सद्गुरु हवेत. तुम्हीच माझी माझ्या गुरूंशी भेट घडवून द्या." आणि खरेच आश्चर्य घडून आले.
मी ज्या फायबर फॉइल्स कंपनीमध्ये नोकरीस होतो तेथे श्री. खातू नामक गृहस्थ काही महिन्यांसाठी काम करण्यासाठी आले. बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांनी मला एक दिवस बोरिवली येथील स्थानावर आणले. त्यावेळेस माझा परिचय परमपूज्य भाऊंशी झाला - जे माझ्या पुढील आयुष्याच्या वाटचालीमध्ये मला सद्गुरु म्हणून लाभले.
पहिल्या भेटीतच सद्गुरु भाऊमहाराजांनी मला सांगितले, "तू इथे येत जा. तुझी सर्व कामे होतील." मी त्यावेळी धन्य झालो कारण गेली २५ वर्षे मी ज्या गुरुंच्या शोधात होतो तेच साक्षात भेटले होते. या घटनेतील अज्ञात रहस्य असे आहे की फादर आग्नेलबाबा हे ख्रिस्ती धर्मीय सत्पुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या जागृत समाधीसमोर केलेली प्रार्थना त्या अदृष्यातील सत्पुरुषांनी ऐकून श्री. खातू यांना निमित्त करून साक्षात भाऊ महाराजांसारख्या सद्गुरुंशी भेट घडवून दिली हा एक अद्भुत चमत्कार आहे. या भेटीनंतर काही महिन्यातच श्री. खातू यांनी माझ्या कंपनीतील नोकरी सोडली.
माझे गुरुवर्य भाऊमहाराजांकडे येणे सुरु झाले. स्थानावरील आरती, नामस्मरण आदि कार्यक्रमांना मी हजर राहू लागलो. माझ्या ऐहिक व अध्यात्मिक अडचणी मी भाऊंसमोर मांडू लागलो. आणि हळूहळू माझ्या जीवनात परिवर्तन होऊ लागले. माझा रागीट स्वभाव शांत होऊ लागला. एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट का घडते याचा कार्यकारणभाव समजू लागला.
जीवनात सुख म्हणजे नेमके काय, आपण अध्यात्मामध्ये काय शिकायला हवे याचे हळूहळू ज्ञान होऊ लागले. अध्यात्मिक भाषेतील अनेक शब्दांचे अर्थ समजायला लागले. व्यावहारिक जीवनातील मित्र, नातेवाईक व संबधीत लोकांशी कसे वागावे, सद्गुरुंशी अनुसंधान कशासाठी आवश्यक आहे. अनुग्रहित भक्ताचे कर्तव्य काय आहे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भाऊमहाराजांच्या प्रवचनातून, मार्गदर्शनातून मिळाली. हे सर्व घडत असतांना एक दिवस सद्गुरु भाऊमहाराज स्वतः मला म्हणाले, "अरे, अनुग्रह घे" आणि १९९२ साली अक्षय तृतीयेला अक्षय अशा अनुग्रहात त्यांनी मला बंदिस्त केले.
सद्गुरु आपल्या भक्तांमध्ये आपल्यातले सद्गुण उतरवत असतात. मात्र ते समजण्यासाठी आपले मन अहंकार मुक्त असायला हवे आणि 'जे सर्व घडते आहे ते सद्गुरुंमुळे' याची सातत्याने जाणीव ठेवायला हवी.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|