माझे एक मित्र श्री. मायकल परेरा हे ख्रिस्तवासी होण्यापूर्वीची गोष्ट आहे. हे गृहस्थ अतिशय धार्मिक वृत्तीचे परोपकारी व सेवावृत्तीचे असे होते. ते जेथे रहात तेथील परिसरात कोणाही व्यक्तीला त्याच्या आजारपणात मदत करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, प्रसंगी आर्थिक मदत करणे अशी निरपेक्ष सेवा ते करीत असत आणि वेळ मिळेल तेव्हा येशूस्मरणी तल्लीन होत. ते आजारी पडल्याचे समजताच एका संध्याकाळी मी त्यांच्या घरी पत्ता शोधीत पहिल्यांदाच गेलो. बऱ्याच वेळपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारल्या. अशक्तपणामुळे त्यांना फार वेळ बसताही येत नव्हते. मी त्यांच्या कृश देहाकडे बघत परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करत उठलो तर तशाही अवस्थेत ते चटकन उठून आतल्या खोलीत गेले व हातात सोनटक्क्याची पसाभर फुले घेऊन आले. ती फुले माझ्या हातात देत म्हणाले, "अरे आज तू पहिल्यांदाच आलास. माझ्याकडे देण्यासारखे काही नाही. पण ही ताजी फुले आहेत. घेऊन जा." त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मलाही गहिवरून आले. सद्गदित अंतःकरणाने मी फुले स्वीकारली. बाहेर आल्यावर विचारचक्र सुरु झाले. हा सत्कार माझा होता का ? नाहीच. हा सत्कार तर फादर बाबांनी स्वामी महाराजांचा, माझ्या भाऊ महाराजांचा केलेला होता. सद्गुरुंनी भक्ताला चिकटवलेल्या सद्गुणांमुळे झाला होता.
असाच अनुभव मला उत्तन भाईंदर येथील बालेपीर बाबाशाह या दर्ग्यावरील सत्पुरुष श्री. महंमद शहा यांना भेटल्यावर आला. त्यांच्याशी माझा फारसा परिचय नसताना त्यांच्या दर्ग्यावरील घरात गेलो असता माझ्या अंगाला त्यांनी एवढे अत्तर चोपडले की माझा शर्ट ओला झाला. त्याचा सुगंध अनेक दिवस त्या शर्टला येत होता. अशा तऱ्हेने अज्ञात अशा शक्ती दृष्यरुपाने आपणांस अज्ञात असलेल्या अदृष्य शक्तींचा मान सन्मान करीत असतात. हा सन्मान माझा नव्हता तर माझे सद्गुरु भाऊ यांचा होता.
माझ्या जीवनात सद्गुरु भाऊंनी अनेक प्रकारे सहाय्य केले आहे. अनेक आपत्तीमय प्रसंगातून माझी अनाकलनीय तऱ्हेने सोडवणूक केली आहे. तसेच योग्यवेळी मार्गदर्शन करुन नुकसानीपासून दूर ठेवले आहे. याचा किस्सा असा..
एकदा वर्तमानपत्रात आर्थिक फायद्याची एक जाहिरात वाचली. तेथे काही गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने तेथील अधिकाऱ्यांची भेटीची वेळ मागून घेतली. त्याप्रमाणे त्यांच्या ऑफिसवर गेलो. कंपनीची भव्य इमारत व तेथील झगमगाट पाहून गुंतवणूक करण्याचे निश्चित केले. तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने मला सर्व माहिती दिली. परंतु ऐनवेळी मुख्य संचालक अधिकाऱ्याची भेट झाली नाही. त्यामुळे नंतर येऊ म्हणून घरी गेलो. मध्यंतरी काही कामांमुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा एक महिन्याने गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने त्या कंपनीवर गेलो असता कंपनी बंद झाली व संचालक पळून गेले असे समजले. कंपनीच्या दारावर काही फसवणूक झालेली माणसे भेटली. मी मात्र परत फिरलो ते स्वामी महाराजांचे आभार मानत. कारण कोणत्या तरी अज्ञात शक्तीमुळे त्या संचालकाची होणारी भेट टळली होती व फसवणुकीपासून मी वाचलो होतो.
सद्गुरुंशी तुम्ही समरस झालात की सद्गुरु तुमची अनेक तऱ्हेने परीक्षा घेत असतात. कधी रागावून तर कधी गोड बोलून, तर कधी दूर लोटून. हे सर्व समजण्यासाठी सद्गुरुंशी समरसता साधायला हवी. सद्गुरुंना आपले जीवन समर्पित करण्याची तुमची तयारी हवी. गुरुभक्ती ही फार कठीण आहे. सद्गुरु सदैव तुमच्याजवळ असतात नव्हे, ते तुमच्यात समरस झालेले असतात. मात्र यासाठी आपण स्वतःवर काही बंधने, काही निर्बंध घालून घ्यायला हवेत. मग सद्गुरु 'आपणासारखे करिती तात्काळ' हेच खरे.
अनुग्रहानंतर गुरुंशी शरणागत झाल्यानंतर गुरु तुमची योग्य ती काळजी घेत असतात. या शक्ती कोणत्या असतात हे मात्र अज्ञात असते. सद्गुरु तुमच्याबरोबर कोणत्या रूपात असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सतत सावधानता हवी. मन अहंकार मुक्त असावे. मुखी नामस्मरण असावे. अनेक अद्भुत अनुभव देत सद्गुरु तुमच्याबरोबर अज्ञातपणे वाटचाल करत असतात.
म्हणूनच आमचे आनंदयोगेश्वर जी काही अनुभूती देतात त्यापैकी सगळ्याच अज्ञात रहस्यांचा उलगडा झाला नाही तरीही जे काही घडते ते आम्हा भक्तांच्या उध्दारासाठीच असते हा माझा दृढ विश्वास आहे. अनुभवांची ही शब्दफुले सद्गुरुचरणी वाहताना एकच प्रार्थना आहे की या देहाला सद्गुरुंच्या चरणांपाशी विश्रांती मिळावी.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|