श्री विनायक महाजन
|| गुरु: ब्रम्हा गुरु: विष्णु गुरु: देवो महेश्वर:
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||
वरील उक्तींची तंतोतंत प्रचिती आम्हाला साक्षात कलियुगात आली. ब्रम्हस्वरूप प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आणि परमपूज्य सद्गुरु भाऊमहाराजांच्या मार्गदर्शनाने आणि कृपार्शीवादाने आम्हावर आलेले संकट टळू शकले व आमच्या जीवनाची दिशा आमूलाग्र बदलून गेली.
माझी पत्नी सौ. निलीमा १९९१ साली गर्भवती होती. जुलै १९९१ मध्ये आम्ही तिच्या रेग्युलर मेडिकल चेकअप साठी डॉ. संजय शहा यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करण्यास सांगितले व त्यानुसार १६ जुलै १९९१ रोजी आम्ही डॉ. हजारीवाला (Foreign Returned ) यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी जवळजवळ २० मिनिटे बाळाच्या छातीचे ठोके ऐकण्याचा व हालचाल पहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी स्वतः तिथे उपस्थित होतो. परंतु हार्टबीट्स ऐकू आल्या नाहीत व हालचालही दिसली नाही. म्हणून डॉक्टरांनी रिपोर्ट दिला की बाळ (गर्भ) पोटातच मृत झाले आहे व शक्य तितक्या लवकर 'मिसकॅरेज' करावे लागेल. आम्हा उभयतांवर आकाश कोसळले. मानसिक आधार मिळावा म्हणून मी माझ्या सासू-सासऱ्यांना पुण्याहून बोलावले. दरम्यान सोनोग्राफीचा रिपोर्ट ३/४ निष्णात डॉक्टरांना दाखविला. त्यांनीदेखील 'मिसकॅरेज लवकर करा' असा सल्ला दिला. ४/५ दिवसानंतर माझे एक मित्र माझ्या सासूबाईंना घेऊन ओम सद्गुरु प्रतिष्ठान - बोरिवली येथे दर्शनाला गेले. (दिनांक २२ जुलै, १९९१ - आषाढी एकादशी)
माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे माझ्या सासूबाईंनी परमपूज्य भाऊ महाराजांना सर्व परिस्थिती कथन केली. त्यावेळी सद्गुरु भाऊंच्या मुखातून शब्द आले. " बाळ जिवंत आहे. मला त्याच्या छातीचे ठोके ऐकू येत आहेत." त्यांनी सतत ४ दिवस स्थानावर नामजप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सोमवार ते गुरुवार 'नमो गुरवे वासुदेवाय' हा अखंड मंत्रजप केला. दरम्यान बुधवारी परत डॉक्टरांकडे सोनोग्राफी केली व आश्चर्य म्हणजे आता बाळाच्या छातीचे ठोके व्यवस्थित ऐकू येत होते. डॉक्टरांना देखील या घटनेने आश्चर्य वाटले. आधुनिक विज्ञानावर अज्ञात शक्तीने केलेली ही मात होती. सोनोग्राफी मशीनमध्ये कोणताही दोष नसताना व अनुभवी डॉक्टर तपासणी करत असताना देखील त्यांनी दिलेला पहिला रिपोर्ट खोटा ठरला.
हा अनुभव इतरांना कदाचित असंभव वाटेल ; परंतु तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. त्यापूर्वी कधीही आम्ही स्थानावर गेलो नव्हतो. गुरुवर्य भाऊ महाराजांनी तर माझ्या पत्नीस पाहिलेदेखील नव्हते. तरीसुद्धा हे सर्व सांगणे याचा अर्थ भाऊ महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवानच बोलले याची आम्हाला खात्री पटली.
पुढे डिसेंबर १९९१ मध्ये माझी पत्नी प्रसूत होऊन मुलीला जन्म दिला. या मुलीचे नामकरणही सद्गुरु भाऊंनीच केले. स्थानावर सर्वजण तिला भाऊमहाराजांचा प्रसाद म्हणूनच ओळखतात.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
सुधीर नारायण दुदवडकर
सद्गुरु भाऊ महाराजांकडे मी पहिल्यांदा आलो तो माझ्या मलंग आरस नावाच्या मित्राबरोबर. तो आम्हा सर्व इंजिनीरिंग कॉलेजच्या मित्रांना इथे घेऊन आला. मी काही महिन्यांपर्यंत नियमितपणे आरतीसाठी येत होतो. आरती केल्यानंतर स्वामी महाराजांचे व सद्गुरु भाऊ महाराजांचे दर्शन घेऊन फार बरं वाटत असे. पण कालांतराने मी माझ्या नोकरीमुळे आणि इतर अडचणींमुळे सद्गुरुंशी अनुसंधान ठेवू शकलो नाही. त्या काळात मी २ ते ३ कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण कुठेही मला मानसिक समाधान मिळाले नाही. मी नोकरी सोडली आणि स्वतःचा उद्योगधंदा सुरु केला. त्यातही मला यश मिळाले नाही. पण मी माझे पुढील शिक्षण चालूच ठेवले.
पवईच्या 'निटी' या संस्थेतून कॉम्पुटर सॉफ्टवेअरचा कोर्स केला. नोकरीसाठी प्रयत्नही चालूच ठेवले. पण कॉम्पुटर सॉफ्टवॅरचा अनुभव नसल्यामुळे मला चांगली नोकरी मिळत नव्हती. अशा कठीण परिस्थितीतून जात असताना मला पुन्हा सद्गुरु भाऊ महाराजांची ओढ लागली व पुन्हा दर गुरुवारी नियितपणे स्वामी महाराजांच्या आरतीसाठी व दर्शनासाठी स्थानावर जाऊ लागलो.
एका गुरुवारी मी गुरुवर्य भाऊंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना माझ्या नोकरीविषयी प्रश्न केला. त्यांनी मला नियमितपणे ११ गुरुवारी स्थानावर आरतीसाठी यायला सांगितले. सहा गुरुवार झाल्यानंतर मला नोकरी मिळाली. अंधेरी येथील 'इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' या कंपनीमध्ये मला कॉम्पुटर प्रोग्रामरची नोकरी मिळाली. ही स्वामी महाराजांची व भाऊ महाराजांची कृपा होती. या कंपनीची बससेवा बोरिवलीपर्यंत आहे. याच बसने मी दर गुरुवारी स्थानावर येत असे.
स्थानावरच्या प्रत्येक कार्यक्रमात उदा. नामस्मरण, नियमित सेवा, खोपोलीचा पालखी सोहळा, डायरी लिहिणे, नामजप संकल्प इत्यादीमध्ये मी सहभागी झालो आणि माझे आनंद द्विगुणित व्हायला लागले.
मला जुहू येथील एन. सी. एस.टी. (नॅशनल सेन्टर फॉर सॉफ्टवेअर टेकनॉलॉजी) या संस्थेत पुढील अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळाले. हा कोर्स मी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. मला डबल प्रमोशन मिळाले. वेतनात वाढ झाली. मी स्वतःचं घर घेतलं, गुरुवर्य भाऊंच्याच आशीर्वादाने मला आवडत असलेल्या मुलीबरोबर माझे लग्न झाले.
अशाप्रकारे केवळ आनंदयोगेश्वरांच्या म्हणजेच सद्गुरु भाऊमहाराजांच्या कृपेमुळे माझे संपूर्ण जीवन आनंदमयी झाले आहे व केवळ त्यांच्याच जीवनविषयक तत्वज्ञानानुसार दैनंदिन व अध्यात्मिक जीवनाची सांगड घालणे शक्य झाले आहे.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|