|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

किरण पात्रे

मी ऑगस्ट १९९४ पासून खोपोली येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या स्थानावर येत आहे. या स्थानाची तसेच परमपूज्य भाऊ महाराजांची माहिती नागोठणे येथील श्री. रामचंद्र उपाध्ये यांनी मला दिली. तेव्हापासून मी सद्गुरु भाऊ यांना माझ्या प्रापंचिक अडचणी सांगून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत आहे. भाऊ दर १५-२० दिवसांनी मला स्वप्नात दिसत असत. त्यांच्याच आज्ञेवरून मी फेब्रुवारी १९९७ ला त्यांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर मला माझ्या दैनंदिन जीवनात सर्व प्रकारचा आनंद मिळाला.

मी धाटाव येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आमची कंपनी आजारी(sick unit ) आहे. रोज आम्हाला नवीन बातम्या यायच्या की आता कंपनीचे काही खरे नाही. बहुतेक पुढच्या महिन्यात बंद पडणार. पेपरमध्येही अशा प्रकारच्या बातम्या यायच्या. मी खोपोली येथे जाऊन सद्गुरु भाऊ महाराजांना सांगितले की, "कंपनीची परिस्थिती अगदी बिकट झाली आहे. मी ही नोकरी सोडून भोर जि. पुणे (जिथे मी पूर्वी नोकरी करीत होतो) येथे नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू का ?"

परमपूज्य भाऊंनी मला एका वाक्यात सांगितले, "तुला सध्या या नोकरीत काही त्रास होत नाही, उगीच नोकरी सोडण्याची गडबड करू नकोस." त्यानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार मनातून काढून टाकला कारण ज्याअर्थी सद्गुरु भाऊंनी सांगितले त्याअर्थी यात नक्की माझे हित असणार याची मला खात्री होती. कंपनीची युनियन व व्यवस्थापन यांच्यात कराराची बोलणी चालू झाली. कंपनीची अशी अवस्था असताना करार होऊन पगारवाढ होईल अशी अपेक्षा करणेही मूर्खपणाचे ठरले असते. एका बाजूने कंपनी बंद पडण्याच्या बातम्या येतच होत्या. पण घडले उलटेच. व्यवस्थापनाने सर्वांना ८०० ते १२०० रुपये हंगामी पगारवाढ केली.

माझा या बातमीवर विश्वासच बसेना. मी ही आनंदाची बातमी त्वरित सद्गुरु भाऊंना फोन करून सांगितली. लगेच ते म्हणाले, "अभिनंदन" व पुढे हसत हसत त्यांनी मला प्रश्न केला, "काय रे बाळ, तू तर नोकरी सोडायला निघाला होतास ना?" मला त्वरित गुरुवर्य भाऊंनी खोपोली येथे सांगितलेले शब्द आठवले, "नोकरी सोडण्याची गडबड करू नकोस" व माझ्या गुरुमाऊलीविषयीच्या कृतज्ञतेने ऊर भरुन आला.

भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींची पूर्वकल्पना येऊन त्यांनी मला तारले ही त्यांची कृपा तर होतीच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, त्यांचे लाखो भक्त असतानाही, त्यांनी अनेक महिन्यांपूर्वी मला काय सांगितले आहे हे त्यांच्या पूर्ण लक्षात होते. सद्गुरु हे खरंच भक्तवत्सल भक्ताभिमानी असतात याची प्रचिती मला आली.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

सौ. रा. वि. पवार

एकदा मी नंबर काढून दि. २६/४/९८ रोजी सद्गुरु भाऊंना खोपोली येथे भेटण्यास गेले. काही घरगुती गोष्टी विचारायच्या होत्या. गुरुवर्य भाऊंनी माझ्या प्रश्नांवर मला मार्गदर्शन केलेच पण शिवाय ११ दिवस रोज १११ वेळा श्रीमत प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तांचे संकट दूर करण्यासाठी रचलेले अघोर संकटनाशन स्तोत्र मोठ्याने म्हणण्यास सांगितले. तसेच एका महिन्याने पुन्हा भेटावयासही सांगितले.

गुरुवर्य भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी मनात कोणतीही शंका न घेता दुसऱ्या दिवसापासूनच श्रद्धेने रोज ते स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. स्तोत्र म्हणून नऊ दिवस झाले त्यादिवशीची गोष्ट. माझा मुलगा, भास्कर, मुंबई-गोवा हायवेवरून मोटरसायकलने रात्री २ वा. डबलसीट चालला होता. तेवढ्यात मागून येणाऱ्या लक्झरीने जोरात धडक दिली व माझा मुलगा रस्त्यापासून जवळ जवळ ३० फूट दूर शेतात फेकला गेला.

अंगावरचे कपडे फाटले, चेहरा मातीने माखल्यामुळे ओळखू येत नव्हता. पण एवढा मोठा अपघात होऊनही फक्त हाताला व कमरेला किरकोळ मार बसला होता. महाराजांच्या कृपेने लक्झरी पाठोपाठ पोलिसांची गाडी. त्यामुळे रात्रीची वेळ असूनही लगेचच वेळेवर उपचार होऊ शकले.

मी सद्गुरु भाऊंना प्रवचनात सांगताना ऐकले होते की सद्गुरु सहा प्रकारचे अपमृत्यु टाळू शकतात. माझ्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून काढून भाऊंनी मला त्याची प्रचिती दिली व एका महिन्याने परत का भेटण्यास बोलावले होते याचा उलगडा झाला.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>