श्री राजन चोरगे, वसई
सद्गुरुंनीच मार्ग दाखवला
माझे वसईतील मित्र व स्थानावरील एक भक्त श्री. दिपक साखळकर मला नेहमी प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या स्थानावर आरतीला चला, सद्गुरु भाऊमहाराजांची भेट घ्या म्हणून आग्रह करायचे. पण ज्यादिवशी मी येतो म्हणून सांगितले त्या दिवशी, म्हणजे दिनांक ३०.७.९६ रोजी ते मला स्थानावर नेण्यास विसरुन स्वतः निघून गेले म्हणून मग मी माझ्या दुसऱ्या एका मित्राला घेऊन बोरिवली स्टेशनपर्यंत आलो. पुढचा काही एक पत्ता मला माहिती नव्हता. फक्त त्या ठिकाणी आरती होते एवढेच माहित होते.
एवढ्याशा माहितीवर पत्ता सापडणार नाही याचीही जाणीव होती. पण आज कसेही करुन स्थानावर आरतीला जायचेच ही दुर्दम्य इच्छा मनात कुठून आली होती मलाही माहित नाही. विचारता विचारता एका गृहस्थांशी गाठ पडली व त्यांनी सांगितले की इथे बाजूलाच आरती वगैरे चालते. तेथे विचारा. नेमकी त्याचवेळी त्याठिकाणी आरती सुरु झाली. मी माझ्या मित्राला म्हणालो इतक्या लांब आलो आहोत तर निदान ही आरती तरी करुया व परत आपल्या मार्गाला वसईला निघूया. आरती केली. फार बरे वाटले आणि आरती संपल्यावर पाहतो तर जो मित्र मला स्थानावर आरतीसाठी घेऊन येणार होता तोच समोर उभा. आज आठवूनही अंगावर रोमांच उभे रहातात की माझ्या सद्गुरुंनी योग्य मार्ग दाखवून मला त्यांच्यापर्यंत कसे खेचून आणले.
स्वप्नातील दृष्टांत
त्यानंतर मी नियमाने प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या स्थानावर दर गुरुवारच्या ७.२५ च्या आरतीला जाणे सुरु केले. ते आजतागायत सुरु आहे. आरतीनंतर होणारे आनंदयोगेश्वर भाऊ महाराजांचे प्रवचन म्हणजे ज्ञानामृतच असायचे. मी नियमाने ग्रहण करायचो. त्यावेळी सद्गुरु भाऊंनी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या माळेवरील नामजपाचा संकल्प केला होता. स्थानावर येऊन हा जप करायचा होता व त्याची नोंदही एका वहीत करायची होती. त्या काळी मला माझ्या मुलाला काही कारणास्तव गोरेगाववरुन वसईला शाळेत आणावे लागे. त्यामुळे स्थानावर येऊन जप करण्यास पुरेसा वेळ मिळत नसे. मात्र स्थानावर येऊन जास्तीत जास्त माळा जप करण्याची मनाला अतीव ओढ लागली होती. त्यामुळे मला अतिशय वाईट वाटे.
अचानक एका पहाटे स्वप्नात आनंदयोगेश्वर भाऊ महाराज आले. मला म्हणाले, "बाळा, या नामजपाच्या माळा तू घरी जरी नित्यनियमाने केल्यास तरी त्या मला पोहोचतील." मला अतिशय आनंद झाला. दृष्टांतरूपाने माझ्या गुरुंनी मला 'आपले दैनंदिन कर्तव्य चोखपणे करीत नाम घेतलेस तर कसेही ते गुरूंपर्यंत पोचते' याची खूप मोठी शिकवण दिली.
पत्नीची बाळंतपणात सुखरुप सुटका
मार्गशीर्ष महिना होता. माझ्या पत्नीला बाळंतपणाकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु तिची प्रकृती काही ठीक नव्हती. डॉक्टरांनीही तसे सांगितले. आम्ही सर्व घरची मंडळी चिंतेत होतो. काय करावे सुचत नव्हते. तोच मला गुरुमाऊलींना फोन करण्याची आठवण झाली व मी त्यांना एकंदरीत परिस्थिती फोनवर सांगितली. त्यावर भाऊमहाराजांनी मला एक नामजप दिला व "काही काळजी करू नकोस. सद्गुरु सर्व ठीक करतील" असे सांगितले. खरोखरंच पत्नीची पुत्ररत्न होऊन सुखरुपपणे सुटका झाली. काही त्रास झाला नाही. ही माझ्या गुरुमाऊली आनंदयोगेश्वरांचीच कृपा होती.
अनुग्रहास पात्र
लहानपणापासून देवाचे नाव घेणे, देवळात तसेच तीर्थक्षेत्री जाणे व जेथे जेथे सत्पुरुष असतील तेथे जाऊन त्यांच्या दर्शनाचा लाभ घेणे याची मला खूप आवड होती. पण कोणी सगुण रुपातील गुरु खरंच भेटेल का, त्यांच्याकडून मला मंत्र मिळेल का अशी विलक्षण ओढ मला पहिल्यापासून लागली होती. स्थानावर आल्यानंतर, गुरुवर्य भाऊमहाराजांना पाहिल्यानंतर, त्यांना अनुभवल्यानंतर मला आस लागली ती या योगेश्वराच्या रूपातून प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मंत्र म्हणजेच अनुग्रह घेण्याची.
एक दिवस स्थानावर सांगण्यात आले की ज्या भक्तांना सद्गुरूंचा अनुग्रह घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे द्यावीत. मात्र त्या भक्ताला अनुग्रह द्यायचा किंवा नाही ते गुरुवर्य भाऊ महाराज ठरवतील. मला फार आनंद झाला. मी माझे नाव दिले. परंतु ज्यांना अनुग्रह मिळणार त्यांची नावे जेव्हा सांगितली गेली तेव्हा त्यात माझे नाव नव्हते. मी अतिशय निराश झालो. सद्गुरुंना मला का लांब ठेवायचे असावे या विचाराने कासावीस झालो.
दुसऱ्या दिवशी शनिवारी उदास अंतःकरणानेच आरतीसाठी गेलो. स्वामी महाराजांची व माझ्या गुरुमाऊलीची मनापासून प्रार्थना केली व नेहमीप्रमाणे जपास बसलो. एवढ्यात मला भाऊ महाराजांनी त्यांच्या खोलीत बोलवले व "तू उद्या अनुग्रह घेऊ शकतोस" असे सांगितले. परीक्षा बघितली होती का सद्गुरुंनी माझी? मला अनुग्रहाच्या विधीकरिता लागणाऱ्या सामानाची यादी मिळाली. अनुग्रह खोपोली येथील स्वामी महाराजांच्या स्थानावर मिळणार होता; जे स्थान मी कधीही पहिले नव्हते. ११ तारखेला मी खोपोलीला गेलो व स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन आश्चर्यचकित झालो. कारण ५ वर्षांपूर्वी माझ्या स्वप्नात एक मूर्ती आली होती आणि मी ते महाराज कोण म्हणून विचार करत होतो - ते माझे परात्पर गुरु प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|