व्यवसायात प्रगती व आनंदयोगेश्वरांची कृपादृष्टी
जसजसे माझे दर गुरुवारी स्थानावर आरतीला जाणे वाढले, गुरुवर्य भाऊंमहाराजांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुसंधान वाढले तसतसे माझ्या व्यवसायात मला भरभराट अनुभवण्यास येऊ लागली. अनेक वेळेला कोण कुठून कुठून काम देई त्याचा मला मागमूसही लागत नसे. असे अनुभव मी व्यवसायात बरेच घेतले. एकदा तर मला असेच एक मोठे उद्योजक भेटले ज्यांचे नाव निळकंठ ज्यांनी मला काही ओळख नसताना काम दिले. ते राहतात त्या ठिकाणाचे नावदेखील 'वासुदेव नगर, भाईंदर (पूर्व).'
रोगनिवारण शक्ती
माझ्या डोक्यात ठराविक अशा एका ठिकाणी एकदम अचानक मुंग्या आल्यासारखे व्हायचे व तो भाग बधीर व्हायचा. त्यावेळी मला अतिशय त्रास होत असे. याबद्दल घरात माझे आई, वडील, पत्नी सर्व चिंता करीत व मला मेंदूच्या डॉक्टरकडे जाऊन उपाय करण्याविषयी सांगत. पण मी मनात ठरवले की डॉक्टरात डॉक्टर माझे भाऊच आणि असाच एक दिवस गुरुवारी आरतीनंतर नमस्कार करताना सद्गुरु भाऊंना या आजाराबद्दल सांगितले. भाऊंनी फक्त डोक्यावरून एक-दोन वेळा हात फिरवला आणि त्या दिवसापासून माझ्या डोक्यात मुंग्या येणे वगैरे प्रकार कुठल्याकुठे गेला आणि मला हा साक्षात्कारी अनुभवच मिळाला की माझे आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराज कोणत्याही रोगाचे निवारण क्षणात करू शकतात फक्त आपली तेवढी ठाम श्रद्धा हवी कारण 'मनी नसे ते भाव आणि देवा मला पाव' हे अशक्य.
सद्गुरु अपमृत्यु टाळू शकतात
मी, माझी पत्नी व मुलगा आम्ही रिक्षाने चाललो होतो. रिक्षात सद्गुरु हाच विषय चालला होता. मी म्हटले, "आपले महाराज आपल्या भक्ताचा अपमृत्यूही टाळू शकतात." माझे वाक्य पूर्ण होते न होते तोच ड्रायव्हरने समोर न पाहता रिक्षा मेनरोडवरून एकदम उजवीकडे वळवली. समोरून येणारे दुसरे वाहन आमच्या रिक्षावर जोरात आपटेल किंवा आमचा ड्रायवर रिक्षा तरी पलटी करणार यात काही वादच नव्हता. ज्याप्रमाणे खाली पडल्यावर किंवा लागल्यावर आपण आईलाच हाक मारतो त्याप्रमाणे त्या काही क्षणात आपोपच माझ्याही नकळत मी माझ्या गुरुमाऊली भाऊंचे स्मरण केले. तोच रस्त्यावरील सर्वच वाहनांचे ब्रेक मारल्याचे आवाज आले व मी भानावर आलो तर आमची रिक्षा आहे तिथे थांबली होती. अशाप्रकारे माझ्या सद्गुरुंनी मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
गुरुमाऊली आनंदयोगेश्वरांचे साईरुपात दर्शन एकदा माझ्या घरातल्या मंडळींनी ठरवले की येत्या २-३ दिवसात शिर्डीला जायचे. पण दोनच दिवसांनी गुरुदिन (७ सप्टेंबर सद्गुरु भाऊ महाराजांचा वाढदिवस) होता म्हणून आम्ही गेलो नाही. ७ तारखेला स्थानावर गेलो तर काय आश्चर्य भाऊ महाराजांना साईंच्या रुपातील वाडी भरली होती. प्रत्यक्ष बाबा हेच गुरुभाऊ व गुरुभाऊ हेच साईबाबा ही साक्ष स्वामी महाराजांनी पटवून दिली. अशा माझ्या गुरुमाऊलींची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव रहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
मा धों. यशवंतराव
एका मित्राच्या सांगण्यावरून मी आनंदयोगेश्वर परमपूज्य भाऊमहाराजांकडे जून १९८३ मध्ये गेलो. तेव्हापासून आजपर्यंत न चुकता नियमितपणे आरतीला येत आहे. इथे आल्यानंतर मला कौटुंबिक स्वास्थ्य तर लाभलेच; परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मनःशांती मिळाली. त्यामुळे एवढी वर्षे केव्हा गेली समजलेच नाही.
मी जिथे पहिल्या घरात रहात होतो त्या घरात खूप अडचणी यायच्या. मुलगाही नेहमी आजारी पडायचा. त्यामुळे मी घर बदलायच्या विचारात होतो. परंतु योग्य घर मिळत नव्हतं, काही ठिकाणी पैशाचं जमत नव्हतं. मी माझी समस्या भाऊंना सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की, "घर लवकर मिळेल. चिंता करू नको. नविन घरात गेल्यानंतर मुलाची तब्येत सुधारेल. फक्त घरात प्रवेश करण्यापूर्वी मला भेट व मी सांगेन त्या वेळेसच नविन घरात प्रवेश कर." आणि खरंच लवकरच चांगले घर मिळाले. मुलाची तब्येतही तेव्हापासून छान आहे.
आनंदयोगेश्वर भाऊंचा अतिशय प्रेमळ स्वभाव, घरच्या वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे दिलेला योग्य व अचूक सल्ला व आमची श्रद्धा आणि विश्वास यामुळे आम्हाला कधीही काही मोठी अडचण आली नाही. आयुष्याची गाडी नेहमी रुळावरून व योग्य मार्गावरून चालत राहिली. माझी काही मोठी सेवा नाही. आरतीला हजर रहाणे, नामस्मरण करणे आणि सद्गुरु भाऊ जे काही सांगायचे त्याचे मनन चिंतन करणे हीच माझी साधना. सद्गुरु जे काही सांगत असतात त्यातील ४ आणे (२५%) तरी तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये प्रामाणिकपणे आचरणात आणलं पाहिजे. अध्यात्म याहून दुसरं ते काय! या साधनेतील सातत्य व गुरुंवरील अढळ श्रद्धा एवढी पाळली तर जीवनात अडचणी आल्या तरी त्या जाणवत नाहीत व सद्गुरूच त्या अडचणींमधून आपल्याला मार्ग दाखवतात.
सचिन विलास घाग
मी जेव्हापासून सद्गुरू भाऊ महाराजांच्याकडे आरतीला यायला लागलो तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. माझी अशी धारणा असायची की प्रत्यक्षात टेंबे स्वामी महाराजच सद्गुरु भाऊ महाराजांच्या रुपात प्रवचन करतात. त्या भाऊंच्या प्रवचनांमधून मी एवढं काही शिकलो की माझी विचार करण्याची दृष्टीच बदलून गेली. पूर्वी मी खूप चिडचिडा होतो. लहान लहान गोष्टींवरुन रागवायचो, चिडायचो. महाराजांच्या आरतीमुळे, नामस्मरणामुळे, नामजपाची डायरी लिहिल्यामुळे माझ्या स्वभावात विलक्षण बदल झाला. मी खुप शांत झालो.
नववीमध्ये असताना गणितात नापास झाल्यामुळे माझे ते वर्ष फुकट गेले. म्हणून मी बाहेरून म्हणजे प्रायव्हेटली १०वीची परीक्षा द्यायची ठरवली. शाळेचे मार्गदर्शन नव्हते व गणित हा विषय माझा खुपच कच्चा असल्याने तो पेपर मला खूप कठीण गेला. पास होण्याची शाश्वती वाटत नव्हती. महाराजांवर विश्वास होता. तरी मनामध्ये भीतीही होती. शेवटी १० वीच्या परीक्षेत पास झालो. पण केवळ भाऊ महाराजांच्याच कृपेमुळे याची मला जाणीव आहे. कारण गणितामध्ये मला काठावर म्हणजे ३५ मार्क्स मिळाले.
त्याचप्रमाणे सद्गुरुंच्याच कृपेमुळे माझे पुढचे भविष्यही घडायला मदत झाली. माझी मनापासून इच्छा होती की दहावीनंतर कुठला तरी टेक्निकल जॉब करावा. त्याप्रमाणे मी टेक्निकल कॉलेजचा फॉर्म आणला. मला १० वीला कमी टक्के मिळाल्यामुळे मी डिप्लोमाचा फॉर्म आणला. कारण आय. टी. आय. साठी ६०% गुण आवश्यक होते.
वडिलांच्या इच्छेखातर कॉलेजच्या प्रिंसिपलना भेटायला गेलो. वडिलांच्या एका मित्राची ओळखही होती. पण कॉलेजमध्ये ४-५ चकरा मारुनसुद्धा प्रिंसिपलनी नाही म्हणूनच सांगितले. कारण मला ६०% पेक्षा कमी गुण होते. शेवटी मी डिप्लोमासाठी ऍडमिशन घ्यायचे ठरवले व त्याप्रमाणे प्रिंसिपलना सांगण्यास गेलो. त्यांना सांगून निघणार एवढ्यात त्यांच्या काय मनात आले कोण जाणे ! त्यांनी फोनवरुन क्लार्कला विचारले की, "आय. टी. आय. मध्ये ज्यांना ऍडमिशन मिळाली आहे त्या सर्व मुलांनी फी भरली आहे का?" कारण फी भरण्याची शेवटची तारीख तीच होती. त्या क्लार्कने सांगितले की अजून दोन मुलांची फी येणे बाकी आहे.
आणि काय आश्चर्य ! ध्यानी मनी नसताना प्रिंसिपलनी लगेच मला त्या दोन मुलांपैकी एकाच्या जागेवर ऍडमिशन दिली. १० विच्या परीक्षेत फक्त ४३% मार्क्स असूनसुद्धा केवळ महाराजांच्या कृपेने मला ते ऍडमिशन मिळालं होतं.
नंतर मी आय. टी. आय. परीक्षा पास होऊन मला ६५% मार्क्स मिळाले. बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये अप्रेंटिसचा कोर्स करायला मिळाला व माझे भविष्य सुधारण्यास मदत झाली. ही सर्व केवळ माझ्या भाऊ माऊलीचीच कृपा आहे.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|