श्री. नयन पतंगे
मी ऑक्टोबर १९९४ पासून गुरुवर्य भाऊमहाराजांकडे येत आहे. स्थानावर आल्यापासून इथे होणाऱ्या आरतीमुळे उत्साह द्विगुणित होऊ लागला. शरीरातील मरगळ निघून गेली. सामुदायिक आरतीमुळे निर्माण होणाऱ्या शुभ शक्तीच्या ऊर्जा स्रोतात आम्ही सर्वच भक्त न्हाऊन निघायचो. सद्गुरू भाऊ महाराजांच्या साध्या सोप्या वाणीतील रसाळ व बोधप्रद अशा प्रवचनांमुळे आमच्या दैनंदिन जीवनाची दिशा बदलण्यास मदत झाली. सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग सापडला.
'आत्मा' या विषयावर सद्गुरु भाऊ बोलत असताना जणू काही आपल्या आत्म्यास ते जागे करीत आहेत असे वाटायचे. कारण हा आत्माच आपल्या शरीराचा ड्रायव्हर आहे. तो जर का व्यवस्थित जागृत नसेल तर आपली शरीररुपी गाडी प्रारब्धाच्या खाच खळग्यात गटांगळ्या खात बसेल. त्यामुळे मानसिक शक्ती क्षीण होऊन मन व शरीर कमजोर बनेल. म्हणूनच आपल्या या शरीररूपी गाडीला सद्गुरु भाऊ महाराजांनी स्थापन केलेल्या प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या स्थानरूपी गॅरेजवर रिपेअरिंगसाठी आणण्याची आवश्यकता असते. आत्मा हा ड्रायव्हर, मन हे इंजिन म्हणजेच विचारांचे चक्र आणि बुद्धी म्हणजे ब्रेकप्रमाणे असते. इंजिनरुपी मनामध्ये येणाऱ्या विकल्परुपी विचारचक्रांना लागणार ब्रेक म्हणजे बुद्धीचा उपयोग.
सद्गुरुंकडे आल्यानंतर ते प्रथम आपला आत्मा शुद्ध करुन, प्रज्वलित करून बुध्दिमार्फत मनाच्या विचारांना ब्रेक लावून, मन बुद्धीच्या ताब्यात व बुद्धी आत्म्याच्या ताब्यात ठेवायला मदत करतात. त्यामुळे आपले विचार प्रगल्भ होतात आणि आपण सद्सद्विवेकबुद्धीने विचार करायला लागतो निदान तसा प्रयत्न तरी व्हायला लागतो. आणि स्थानावरच्या माझ्यासारख्या असंख्य भक्तांना गुरुवर्य भाऊंनी दिलेला हाच एक ठेवा आहे.
सद्गुरु भाऊ महाराजांनी सांगितल्यापासून मी नामजपाची डायरी नियमाने लिहायला लागलो. तेव्हापासून तर फक्त माझ्या मनालाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला सात्विक आनंद मिळायला सुरुवात झाली. माझ्यामुळे माझा मुलगाही घरी नामजपाची डायरी लिहायला लागला. त्यालाही त्यात आनंद मिळू लागला. त्यामुळे नकळत त्याच्यावर चांगले संस्कार होऊ लागले. त्याचा अभ्यासातील प्रगतीचा आलेखही उंचावला.
गुरुवर्य भाऊ स्वतः वीणा घेऊन तल्लीन होऊन महाराजांचे नामस्मरण करत असत. त्यांच्याबरोबर नामस्मरणामध्ये रंगून जाताना असं वाटे की परमानंद तो हाच. अशा माझ्या आनंदयोगेश्वर भाऊंकडे माझी कळकळीची प्रार्थना आहे की
जिवा शिवाची जमू दे जोडी |
नामस्मरणाची लागू दे गोडी ||
सर्वसामान्यातूनी घेऊ दे उडी | पैलतीरी ||
डॉ. स्वरुपा कुर्डेकर
१९८५ साली श्री. विजय नाबर नावाचे गृहस्थ मला व आमच्या घरातल्यांना सद्गुरु भाऊंकडे घेऊन गेले. घरातल्या अनेक गोष्टी मनाप्रमाणे होत नसल्याने तो आमच्या चिंतेचा विषय होता. भाऊंना सर्व सांगितल्यानंतर त्यांनी थोडा वेळ चिंतन करुन आम्हाला सांगितले की घरातल्या कुलस्वामिनीचं व्यवस्थित होत नाही. त्यावर मी म्हटलं, "आमचं कुलदैवत सोमेश्वर."
भाऊ शांतपणे म्हणाले, "सोमेश्वर हे कुलदैवत. पण त्याच बरोबर कुळाचं रक्षण करणारी कुलस्वामिनी असणारंच. नात्याने वडिलधाऱ्यांकडे चौकशी कर. आणि बघ दोन दिवसात तुला तुझ्या कुलस्वामिनीचा फोटो मिळणार."
आश्चर्य म्हणजे माझ्या दूरच्या चुलत बहिणीकडे चौकशी केली आणि जी कुलस्वामिनी मला कळली त्या भगवती देवीचा फोटो दोन दिवसातंच घरात आला. त्यानंतर आमच्या घरातील कुठलीही गोष्ट विनाविलंब होऊ लागली.
गुरुवार १८ मार्च १९९९, गुढीपाडवा. या दिवशी आमच्या घराजवळच्या श्री दत्त मंदिरात भाऊ महाराजांचं प्रवचन होतं. सोमवारी भाऊंना फोन केला व थोडासा हट्टही धरला की त्यांनी थोडा वेळ तरी आमच्याकडे आलंच पाहिजे. त्यावर भाऊ उत्तरले, "शब्द देत नाही." दत्त मंदिरातील प्रवचन अप्रतिम झालं. विषय होता ब्रम्हा, विष्णु आणि महेश या श्री दत्तात्रेयांच्या त्रिगुणात्मक त्रैमुर्तीवर.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|