स्मिता शाम देसाई , विलेपार्ले
माझे पती श्री. शाम देसाई यांच्या झाम्बियामधील काबवे येथील कंपनीने जुना स्टाफ कमी करण्याचे ठरवले. त्यांनी इंडोला येथील इंडोला विविंग टेक्सटाईल्स या कंपनीमध्ये पूर्वी अर्ज केला होता. त्याच सुमारास आनंदयोगेश्वर भाऊ आमच्या बोरिवली येथील निवासस्थानी आले असता (दिनांक ७ एप्रिल) व त्यांची पाद्यपूजा होत असतांना सद्गुरु भाऊ स्वतःहून पटकन म्हणाले की, "त्याचे (माझ्या पतीचे ) काम झालेले आहे" त्यावेळी या वाक्याचा अर्थ कळला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी मी झाम्बियाला फोन केला असता माझे पती म्हणाले की, "माझे काम झाले. मला इंडोलाला नोकरी मिळाली. आता मी तिथे चाललो आहे." पुढे घडणाऱ्या प्रसंगाची अशा प्रकारे सद्गुरु भाऊंनी आम्हांला आधीच भविष्यवाणी सांगितली.
१९९६ सालातील गोष्ट. नवीन नोकरी असल्यामुळे दोन वर्षे भारतात येता येणार नाही म्हणून माझ्या पतींनी स्वतःहून झाम्बिया-इंडिया तिकिटाचे बुकिंग केले व त्याप्रमाणे सांगण्यासाठी मुंबईला गुरुवर्य भाऊंना फोन केला. तेव्हा मीही समोर होते. त्यावेळी गुरुवर्य भाऊ पटकन मोठ्याने म्हणाले की, "तू एवढ्यात भारतात यायचे नाही." पण "तिकीट काढलेले आहे" असे परत सांगितल्यामुळे भाऊ म्हणाले, "ठीक आहे. ठरवलं आहेस तर ये." परंतु माझ्या लक्षात आले की भाऊंचा स्वर हा उत्स्फूर्त नव्हता. केवळ माझ्या पतींच्या इच्छेखातर तेव्हा भाऊंनी 'हो' म्हटले होते. कारण मुंबईत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोरिवली येथे स्टेशनवर पडल्यामुळे माझ्या पतींचा पाय फ्रॅक्चर झाला आणि महिनाभर त्यांना घरातच बसून रहावे लागले. तसेच निघायच्या वेळी परतीचे तिकीट चेक करताना असे आढळून आले की तिकीटाची एक काउंटर फॉईल गहाळ झाली आहे. त्याची किंमत रुपये १३,००० होती. गुरुवर्य भाऊंच्या मुखातून निघालेले पहिले शब्द न ऐकल्यामुळे हे दोन्ही प्रकारचे नुकसान झाले होते. म्हणून सद्गुरु आज्ञा कधीही टाळू नये. कारण गुरूंच्या दिव्यदृष्टीला जे दिसत असतं ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळत नाही.
अशीच एक गुरूंच्या दिव्यदृष्टीची (व्हिजन) प्रचिती एका दांपत्याला आली. झाले असे, एक दांपत्य अंबरनाथहून दर गुरुवारी व शनिवारी भक्तिभावाने स्थानावर आरतीला येत असे. असेच एक दिवस गुरुवर्य भाऊमहाराजांना नमस्कार करुन निघताना नेहमीप्रमाणे त्यांनी भाऊंची आज्ञा मागितली. यावेळी 'बरं या' असे म्हणण्याऐवजी गुरुवर्य भाऊंनी या दोघांना थांबण्यास सांगितले. थोड्यावेळाने त्या नवराबायकोची चुळबुळ सुरु झाली. कारण त्यांना परत अंबरनाथला जायचे होते. त्यांचा नेहमीचा परतीचा प्रवास हा बोरिवली ते ठाणे एस.टी. ने व तेथून रेल्वेने असायचा.
बोरिवली येथून दर अर्ध्या तासाने एस.टी. सुटायच्या. त्यामुळे जर का भाऊ महाराजांनी जास्त वेळ थांबवले तर एक बस निघून जाईल व घरी पोहोचायला उशीर होईल या विचाराने दोघेही अस्वस्थ होते. मध्ये त्यांनी पुन्हा भाऊंची आज्ञा मागितली परंतु सद्गुरु भाऊ काही त्यांना 'निघा' म्हणायचे नाव घेत नव्हते. नमस्कार संपले. गुरुवर्य भाऊ महाराज आत त्यांच्या गादीवर जाऊन बसले. बऱ्याच वेळानंतर जेव्हा भाऊ स्वतः बाहेर आले आणि त्यांनी या दोघांना पाहिले तेव्हा ते म्हणाले, "अरे, तुम्ही अजुन निघाला नाहीत का?" हे ऐकून आश्चर्यचकित स्वराने ते दोघे म्हणाले, "भाऊ, तुम्हीच तर आम्हांला थांबायला सांगितले होते." तेव्हा हसून भाऊ महाराज म्हणाले, "निघा, बाळा आता."
त्या दांपत्याला असे का झाले ते कळलेच नाही. थांबवायचे कारण काय असा मनाशी विचार करत ते दोघे एस.टी. स्टॅण्डवर पोचले. त्यांची नेहमीची एस.टी. अर्थातच चुकली होती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचून त्यांना कळले की बोरिवलीहून सुटणारी जी एस.टी. चुकली त्या एस.टी ला मोठा अपघात झाला होता. तेव्हा त्यांना सद्गुरु भाऊ महाराजांनी आपल्याला का थांबवून ठेवले याचा उलगडा झाला. किती सहजपणे सद्गुरु आपल्या भक्तांना त्यांच्याही नकळत संकटातून वाचवतात ! जर गुरुआज्ञेचे पालन न करता ती एस.टी. पकडली असती तर...!
नूतन शाम देसाई, विलेपार्ले
सद्गुरुंच्या व परमेश्वराच्या कृपेनेच आपण या परमसुखद मार्गावरून वाटचाल करीत असतो. या मार्गक्रमणामध्ये काही अनुभव द्वैत अद्वैताचे गुढ उकलत आहे की काय असे वाटायला लागते आणि सद्गुरुंच्या ठायी असलेली श्रद्धा व योग्यवेळीच आपण या मार्गात आलो याची खूणगाठ मनाशी पक्की होते.
माझे वडील श्री. शाम देसाई हे झाम्बियाला असतानाची गोष्ट. १९९६ सालापर्यंत ते लुसाकाला होते. १९९७ साली सद्गुरु भाऊंच्याच कृपेने त्यांना इंडोला येथे नोकरी मिळाली. १९९२, १९९३ व १९९४ साली सद्गुरु भाऊ महाराज लुसाकाला आले होते. तिथल्या लोकांना नामस्मरण, महाराजांची आरती हे माहित झाले होते. ७ जुलै १९९७ या दिवशी गुरुवर्य भाऊ महाराज इंडोला येथे आमच्या घरी यायचे होते. पूर्वतयारीसाठी आम्ही थोडे दिवस आधी झाम्बियाला गेलो होतो. तेथे गुरुवार व शनिवार प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची आरती सुरु केली होती. परंतु तिथल्या लोकांना नामस्मरणाविषयी माहिती नव्हती.
गुरुवर्य भाऊंनी आम्हांला नामाच्या माध्यमातूनच भक्तिमार्गाची गोडी लावली होती. म्हणून ५ जुलैला शनिवारी, पुण्यतिथीनिमित्ताने संध्याकाळी ६ ते ७ नामस्मरण व नंतर नेहमीप्रमाणे आरती असा कार्यक्रम ठरवला होता. आनंदयोगेश्वरांनी आपल्या पूर्वीच्या भेटीमध्ये अनेक प्रकारचे अनुभव देऊन बरीच भक्तमंडळी गोळा केली होती. त्यामुळे त्यादिवशी खूप लोकं यायची होती. त्यासाठी सकाळी १० च्या सुमारास माझे वडील, मी व माझा मुलगा शुभंकर आम्ही खरेदीसाठी गेलो होतो. आम्ही जेव्हा घरी परतलो तेव्हा आम्हांला धक्काच बसला. माझी आई पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. आम्ही डॉक्टरला बोलावले. आम्ही जेव्हा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तिला काहीच आठवत नव्हते. आम्हालाही ती ओळखेना. सारखी रडत होती. आम्ही घाबरलो. काय करावे काहीच कळेना.
शेवटी संकटात सापडल्यानंतर जे भक्त करतो तेच आम्ही केले. सद्गुरु भाऊमाऊलीला हाका मारल्या आणि लगेचच त्यांना भारतात फोन लावला. त्यांना सर्व सांगितले. भाऊ म्हणाले, "चिंता करू नका. नामस्मरण करा. मी काय करायचे ते बघतो. संध्याकाळपर्यंत आईला बरं वाटेल." थोड्यावेळाने डॉक्टरही आले. त्यांनी आईला तपासले व म्हणाले "BP is normal. I cannot diagnose this case at this moment but definitely she will require atleast 24 hours to get recovered.”
त्यांनी इंजेक्शन दिले व काही गोळ्या दिल्या. डॉक्टरांच्या सांगण्यामुळे घरातले वातावरण tensed झाले होते.
संध्याकाळचा कार्यक्रम होणे अशक्य वाटत होते. आम्ही सर्वजण नर्व्हस झालो होतो. संध्याकाळी नामस्मरण कसं काय होणार? प्रसाद केव्हा बनवणार ? हे असं का घडलं ? प्रश्न अनेक होते. उत्तरे फक्त सद्गुरुंपाशी होती. आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मनातल्यामनात नामस्मरण सुरु ठेवले.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|