|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

आईला थोडी झोप लागली होती. आम्हीही शारीरिक व मानसिक तणावामुळे विश्रांती घ्यायचे ठरवले. आणि 'सद्गुरु वाक्य हे ब्रम्हवाक्य असतं' याचा प्रत्यय आम्हांला आला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आईला जाग आली. तिला सर्व आठवायला लागले होते. आम्हांला खूप आनंद झाला. ठरल्याप्रमाणेच कार्यक्रम करायचा होता. ६ वाजता माणसे यायची होती. अजुन प्रसाद बनला नव्हता. सहज मी घराचा दरवाजा उघडला तर दारात मोसंबीची मोठी बॅग ठेवली होती. कोणी सेल्समन बॅग ठेवून कॅम्पसमध्ये फिरून येत असेल असे मला वाटले आणि मी दरवाजा बंद केला.

१५ मिनिटांनी कुतूहलाने परत दरवाजा उघडला तर ती बॅग तिथेच होती. म्हणून मी वॉचमनला जाऊन विचारले. त्याचे उत्तर ऐकून मला अतीव आश्चर्य वाटले. स्वामी महाराजांनी आमच्या मनाची अस्वस्थता जाणली होती. भक्तांच्या मनातील प्रसादाची इच्छाही ओळखली होती. नामस्मरणातून आम्ही कळत नकळत त्यांना हाक दिली होती. आणि त्या बॅगेच्या रूपातील त्याची पोचपावती आम्हांला मिळाली होती. वॉचमनचे शब्द होते की, "One madam came. She kept this bag here and asked me to carry the message to you that these fruits are for your Jesus.”

अल्ला मोठा, ईश्वर मोठा की जिझस मोठा अशा artificial barriers निर्माण करणाऱ्या माणसाला चैतन्य तत्व एकच आहे आणि तेच सर्व प्राणीमात्रात आहे हे कधी कळेल का? सद्गुरुंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की या गुरुतत्वाचं भान आम्हाला सतत राहू दे. तरच या मनुष्यजन्माचे सार्थक होणार आहे.

आम्ही शरणार्थी माऊली तुझे दास | तव चरणी अर्पिला प्रत्येक श्वास ||
ये धाऊनि आमुच्या हाकेला | करी प्रार्थना आज जोडोनि हाता ||

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

सौ. कुमुदिनी मनोहर राजाध्यक्ष, विलेपार्ले

काळ आला होता पण भाऊंनी वेळ येऊ दिली नाही.
इ. स. १९९७ मार्च - माझी प्रकृती बरी नव्हती. माझ्या छातीत सात आठ दिवस दुखत होते. मी गुरुवर्य भाऊंना फोन लावला. गुरुवर्य भाऊ म्हणाले, "काही नाही. चिंता करू नकोस, तू माझ्याबरोबर खोपोलीला चल." मी थोडे आढेवेढे घेतले व काहीतरी सबबी सांगू लागले. नंतर थोड्यावेळाने मी "होय" म्हटले. मी व राजाध्यक्ष आम्ही भाऊंच्या गाडीने खोपोलीला गेलो. गुरुवर्य भाऊमहाराज एवढच म्हणाले, "उद्या काय गंमत होते बघ."

रात्री एक ते दीडच्या सुमारास आम्ही खोपोलीला पोचलो. सकाळी उठल्यावर मला एक भक्त म्हणाला, "काकी तुमच्या आंघोळीचं पाणी काढलंय. लवकर जा." ती आंघोळीची खोली मंदिराच्या पाठीमागे एकांतात होती. तिकडे चिटपाखरू पण फिरकत नव्हतं इतकी सामसुम होती. मी कपडे घेऊन अंघोळीला म्हणून त्या खोलीत गेले. आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत इलेक्ट्रिक हीटर घातलेला होता व करंट चालू होता. मी माझ्याच तंद्रीत होते. मी पटकन हात बादलीत घातला. हात पाण्यात घातल्याबरोब्बर माझ्या हाताला दाणकन विजेचा झटका बसला. मला क्षणात काय झाले समजलेच नाही.

मी झटकन हात काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्या बदलीसकट जवळ जवळ १०-२० पाऊले खेचले गेले व माझा हात बादलीतून सुटून मी जमिनीवर धाडकन पडले. थोड्या वेळाने आपणच उठले. मी इतकी घाबरले होते की मला कोणाला काय झालं ते सांगताच येईना. मग मी तशीच गुरुवर्य भाऊंच्या खोलीजवळ आले व त्यांना म्हणाले, "भाऊ, मला शॉक बसला." गुरुवर्य भाऊ फक्त हसले. अहो त्या हसण्यात माझ्या आयुष्याचा अर्थ भरलेला होता, झालं ! संध्याकाळी आम्ही नंबर घेतला. आनंदयोगेश्वर भाऊ माझ्या पतीराजांना म्हणाले, "तुझी बायको आज मुंबईत असती तर जगली नसती; म्हणून मी तिला खोपोलीला चल म्हटलं. आम्ही संतलोक आधी काही सांगत नसतो फक्त कृतीतून दाखवतो." म्हणूनच म्हणते काळ आला होता पण सद्गुरुंच्या कृपेने टळला !

एक आश्चर्य : अशक्य अवस्थेतील हरवलेली वस्तू सापडली

एकदा मी व माझी मुलगी सौ. कल्याणी, आम्ही दोघी अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स ह्या ठिकाणी संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. सौ. कल्याणीचा संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रम फार छान झाला व त्या आनंदातच आम्ही आमचे हार्मोनियम घेऊन तेथून निघालो.

हा हार्मोनियम जवळ जवळ ४५ वर्षांपूर्वी विकत घेतलेला होता. तरीही म्हणतात ना वस्तू जितकी जुनी तेवढे तिचे प्रेम जास्त लागते. असो. आम्ही दोघी हार्मोनियम घेऊन टॅक्सीत बसलो व थेट आमच्या घरी पार्ल्याला उतरलो. रात्रीचे जवळ जवळ १० वाजले होते. टॅक्सीतून उतरताना आम्ही आमचे हार्मोनियम टॅक्सीतून काढायला विसरलो. टॅक्सीवाला निघून गेला.

घरी येतो तोच माझी मुलगी म्हणाली, "आई, हार्मोनियम कुठे आहे." मला जोराचा धसका बसला. मी मोठ्याने ओरडले, "माझी पेटी गेली. महाराज, आता ती कशी मिळणार?" एवढ्या मोठ्या मुंबईत परत तो टॅक्सीवाला मिळणे शक्य आहे का ? तरी आम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी फोन लावला. ते म्हणाले आमच्या कॉलनीत एक-दोन टॅक्सीवाले आहेत. त्यांना विचारून पाहतो कारण टॅक्सी त्यांच्या घराजवळूनच केली होती. रात्रभर झोप नाही. चैन नाही. सारखं रडू यायला लागलं. घरातील एखादा माणूस हरवतो तसं झालं. सकाळी मी व माझे मिस्टर पुन्हा त्या माणसांकडे गेलो. त्यांनीही काही टॅक्सीवाल्यांपाशी चौकशी केली. त्यातून सुगावा लागला की इकडे एक बब्बू नावाचा टॅक्सीवाला रहात होता. सध्या इथे रहात नाही पण तो नेहमी सहार एअर पोर्टवर टॅक्सी कामाला घेऊन जातो. इतकं केल्यावर जवळ जवळ ५०० टॅक्सीवाल्यांकडे बब्बूची चौकशी केली.

<< Previous      Next >>