|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

मनोगत

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

वर वर्णन केलेले साक्षात् परब्रम्हरूपी गुरूतत्व एकदा का साधकाच्या जीवनात झिरपले की, त्या साधक भक्ताचे मन आणि बुध्दी आपोआपच 'गुरूमय' होऊन जाते व तो आपल्या कर्तेपणाने देहंभानावर न राहता, त्याच्याकडून घडणारे प्रत्येक कर्म ते सदगुरू घडवून घेतात. असाच काही अनुभव आम्ही सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या कार्याच्या बाबतीत गेली २ वर्षे घेत आहोत. २ वर्षे म्हणायचे कारण म्हणजे, जरी आम्हाला सदगुरू आनंदयोगेश्वरांचे प्रत्यक्ष सगुण रूपातील दर्शन, मार्गदर्शन व त्यांचा अमूल्य असा प्रेममय सहवास जवळ जवळ १४ ते १५ वर्षे मिळाला; तरी ख-या अर्थाने गुरूंचे अध्यात्मिक मार्गदर्शन आम्ही ते निर्गुण रूपामध्ये गेल्यानंतरच अनुभवत आहोत.

'सद्गुरू आनंदयोगेश्वर . .. एक साक्षात्कारी अनुभूति' या पुस्तकाचा पहिला भाग श्रीस्वामी समर्थ परंपरेतील सद्गुरू श्रीशंकरमहाराज यांनी माझ्याकडून कशाप्रकारे लिहून घेतला; हे त्या पुस्तकातील 'संकल्पना व प्रेरणा' या भागामध्ये विस्तृतपणे लिहिले आहे. 'भाग १' लिहिला जाण्याआधी त्या पुस्तकाची पृष्ठसंख्या किती असावी यावर जेव्हा आम्ही दोघे विचार करीत होतो; त्यावेळी आमचे परात्पर गुरू प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दृष्टांतरूपाने सांगितले की “या पुस्तकाची १२८ पाने होतील" . त्या पुस्तकाचा मॅटर, सद्गुरू निळकंठमहाराजांची काही विचारप्रवर्तक वाक्ये व छायाचित्रे आम्ही प्रिंटिंगचे काम करणा-या श्री. विवेक वैद्य यांना, ए फोर साईज पेपरवर देत राहिलो व ज्या दिवशी आम्हाला त्यांनी त्या पुस्तकाची डमी प्रत दाखवली; त्यावेळी त्याची पृष्ठसंख्या बरोब्बर १२८ होती.

त्याचप्रमाणे, मुळामध्ये कुठलेही लहान पुस्तकदेखील लिहिण्याची कुवत व अनुभव नसताना श्रीशंकरमहाराजांच्या आदेशावरून जेव्हा ते पुस्तक लिहून पूर्ण झाले; तेव्हा हे पुस्तक प्रत्यक्ष छापण्याच्या आधी श्रीस्वामी महाराजांनी • सांगितले की, “या पुस्तकावर 'भाग १' असे नमूद करा" • याचाच अर्थ 'भाग २' हा त्यांच्याच कृपेने लिहिला जाणार होता हे निश्चित होते. केव्हा, कसा हे आम्हाला ठाऊक नव्हते. तथापि 'भाग २' लिहिला जाणारच असेल तर तो सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या '७५ व्या जयंती दिना'चे औचित्य साधून लिहून, प्रकाशित व्हावा अशी आमची मनापासूनची इच्छा होती. सद्गुरूंच्याच कृपेने तो योग आज येत आहे.

या पुस्तकामध्ये लिहिलेल्या अनुभवातील पुष्कळशा अनुभूति या सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांच्या ७५ व्या जयंतीवर्षाप्रित्यर्थ केल्या गेलेल्या '७५ नामस्मरण' संकल्पातील यात्रांमध्ये आलेल्या अनुभूति आहेत. एखाद्याला ते निव्वळ प्रवासवर्णन वाटण्याचा संभव आहे. परंतु नामस्मरण संकल्पातील या यात्रांमधील प्रत्येक टप्प्यावर सदगुरूंनी आम्हाला निरनिराळया माध्यमातून एवढे ज्वलंत अनुभव दिले आहेत; की या अनुभूतींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी व 'गुरू- भक्ती'चे महत्व सर्व समाजापर्यंत पोचण्यासाठी त्या सर्व प्रचिती या पुस्तकामध्ये विशद करणे आवश्यक वाटते.

तसेच, सदगुरूंच्या भक्तांना सगुण किंवा निर्गुण रूपात आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तके प्रकाशित करण्यामागचा उद्देश हा कोणाचेही मोठेपण अधोरेखित करण्याचा नसून 'सद्गुरूंची निरलस व मनापासून आंतरिक भक्ती करत असलेल्या साधकाला काय शाश्वत आनंद प्राप्त होऊ शकतो व प्राप्त करून देण्याआधी सदगुरू आपल्या भक्ताची काय काय कसोटी बघतात' हे समाजातील सर्व साधक भक्तांपर्यंत पोचावे यासाठी हा मनःपूर्वक केलेला प्रयत्न आहे. यातील सद्गुरूंच्या साक्षात्कारी अनुभूतींचा आनंद सर्व वाचकांना मिळावा हीच सद्गुरूचरणी प्रार्थना .

सौ. श्रध्दा विकास खामकर

<< Previous      Next >>