दैवे तुझे हे पद लाभले मला ....
अतिशय दुर्लभ असलेल्या मानव योनीचा खरा उद्धार करून 'मीच ज्ञानस्वरूप परब्रम्ह परमात्मा आहे' याचे आकलन करून घेण्यासाठी व त्यासाठी परमावश्यक असलेली सद्गुरू कृपा प्राप्त करून घेण्यासाठी देवाने मनुष्य जन्म दिला आहे. 'हा मनुष्य जन्म सफल कसा करावा' याचे ज्ञान करून देऊन मानवाला त्या परमेश्वरीय तत्त्वामध्ये सम्मिलित करून घेण्यासाठीच, श्रीगुरू परंपरा अखंड चालू ठेऊन, हे परम गुरूतत्त्व पुन्हा पुन्हा निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळया रूपात जन्म घेत असते. त्यातूनच एक समृध्द अशी गुरू-शिष्य परंपरा निर्माण होते. गुरूपरंपरा म्हणजे जपाच्या माळेतील मण्यांना एकाच धाग्यात गुंफलेली माळ व त्या माळेतील एकेक मणी म्हणजे आपल्या गुरूपरंपरेतील श्रेष्ठ दैवते, की ज्यांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने व प्रेरणेने गुरूपरंपरा पुढे चालू ठेवण्याचे कार्य केले. त्याच महान दैवतातील एक म्हणजे माणगावचे प.प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होत.
सिंधुदुर्ग जिल्हयातील माणगांव येथे रहाणा-या श्री. गणेशभट व सौ . रमाबाई या श्रीदत्तभक्त दांपत्याच्या गुरूभक्तीने प्रसन्न होऊन श्रीदत्तप्रभूंनी त्यांना प्रत्यक्ष दृष्टांतरूपाने आशीर्वाद दिला की - "काही महिन्यांतच मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे”. समस्त जनांना केवळ आपल्या दर्शनानेही पावन करणा-या या यतिश्वराच्या आगमनाची चाहूल त्या मात्यापित्यांना लागली व इसवी सन १८५४ साली, श्रावण कृष्ण पंचमी या दिवशी, कलीयुगातील मानवाचा सर्वागीण उद्धार करण्यासाठी, साक्षात् दत्तावतारी परमहंस परिवाजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा जन्म झाला.
साक्षात् दत्तप्रभुंचे स्वयंसिध्द अवतार असुनही वासुदेव ते शास्त्रीबुवा, शास्त्रीबुवा ते वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज व त्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नामक लोकोद्धारी सत्पुरूष हा तीन टप्प्यांचा त्यांचा अध्यात्मिक प्रवास केवळ समाजापुढे कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तीयोगाचा एक आदर्श उपस्थित व्हावा यासाठी झाला . भगवान श्रीदत्तात्रेय हे श्रीस्वामी महाराजांशी प्रत्यक्ष बोलत असत व स्वामी महाराज श्रीदत्तप्रभुंच्या आज्ञेशिवाय काहीही करत नसत. आपली पत्नी सौ . अन्नपूर्णाबाई यांच्या निर्वाणानंतर, दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती , स्वामी महाराजांनी सन १८९१ मध्ये उज्जयिनी येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायणानंद सरस्वती यांच्याकडून दंड ग्रहण केला. त्यावेळी श्री दत्तगुरूंनी त्यांना सर्व भरतखंडात पायीच संचार करून समाजामध्ये ईश्वरनिष्ठा जागृत करण्याची आज्ञा केली व त्यांच्या अवताराचा हेतू स्पष्ट केला. त्यासाठी श्रीदत्तप्रभुंनी त्यांच्याकडून कर्म, भक्ती, ज्ञान, वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे यांचा सर्वांगीण अभ्यास करवून त्यांच्याकडून परिपूर्ण साधना करवून घेतली.
श्रीटेंबेस्वामी महाराजांनी केलेल्या साधनेला व त्यांच्या शास्त्रशुद्ध आचरणाला तोड नाही. साक्षात् श्रीशंकराचार्याची गादी विनम्रपणे नाकारणा-या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या सान्निध्यात आलेल्या तळागाळातील समस्त लोकांचे ऐहिक जीवन सुधारून त्यांना परमार्थाकडे मार्गस्थ करण्याचे महान कार्य केले. त्याचप्रमाणे भूत, प्रेत, पिशाच्च, इत्यादि योनींच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना सोडवण्याचे अद्वितीय कार्य त्यांनी केले . स्वतः अतिशय कर्मठ संन्यासी असुनही स्वामी महाराजांनी सामान्य संसारी जनांसाठी अनेक स्तोत्रे व विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. भगवान दत्तात्रेयांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने सनातन वैदिक धर्माची पताका हातात घेऊन धर्मप्रसार करण्यासाठी एक आदर्श लोकोत्तर यति निर्माण केला. आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या काही समर्थ शिष्य व भक्तप्रभावळीतर्फे ही आदर्श परंपरा पुढे चालू ठेवली.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे जीवन अतिशय भव्य, अलौकिक व एकमेवाद्वितीय असल्याने त्यांच्या ६० वर्षाच्या जीवनकार्यात त्यांच्या संपर्कात हजारो लोक आले . श्रीस्वामी महाराजांच्या दिव्य प्रभावामुळे त्या सर्वांचे जीवन धन्य व कृतार्थ झाले . परंतु ज्याप्रमाणे परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकते; परंतु ते सोने आपल्या स्पर्शाने दुस-या लोखंडाचे सोने बनवू शकत नाही; त्याचप्रमाणे गुरूकृपेने कृतकृत्य झालेले हे जीव इतरांना हे साम्यदान देऊ शकत नाहीत. तथापि स्वतः कृतकृत्य होऊन इतरांनाही दीक्षा देऊन कृतार्थ करण्याचे सामर्थ्य ज्या शिष्यांच्या किंवा भक्तांच्या अंगी बाणले गेले, ज्यांच्यामध्ये आपल्यातील शक्तीचे बीज श्रीसद्गुरूंनी संक्रमित केले ते सर्व साधक-भक्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा संप्रदाय पुढे चालू ठेवण्यास समर्थ ठरले.
सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज
|