'आनंदयोग धाम' म्हणजे परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज उर्फ श्रीभाऊ महाराज करंदीकर यांचे पादुकास्थान. श्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज म्हणजे दत्तावतारी प. प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा देहातीत रूपात अनुग्रह लाभलेले एक थोर साक्षात्कारी सत्पुरुष होत. परमपूज्य आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांची आपल्या सद्गुरूंची झालेली ओळख ही सामान्य माणसाच्या आकलना पलीकडे होती. प.प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्यामध्ये असलेले अलौकिक सामर्थ्य तात्कालीन समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक वाटल्यामुळेच परमपूज्य सद्गुरु भाऊ महाराजांनी आपल्या सद्गुरु भाऊ महाराजांनी आपल्या सद्गुरूंचा 'असेतु हिमाचल' प्रचार व प्रसार करण्याचे व्रत हाती घेतले. हे कार्य चालू असताना ज्या तत्त्वाचा ध्यास सद्गुरु भाऊमहाराजांनी घेतला होता त्या तत्त्वाशी ते एवढे एकरूप झाले की प.प. श्रीस्वामी महाराजांची चैतन्य रूप स्पंदने सद्गुरु भाऊ महाराजांच्या देहाच्या माध्यमातून दृगोच्चर होऊ लागली. या तेजाची, चैतन्याची जाणीव त्यांच्या काही भक्तांना झाल्यामुळे हे शाश्वत चैतन्य चिरंतर टिकून राहावे व त्याचा आनंद अखिल समाजाला मिळावा या उदात्त हेतूने त्यांच्या पादुका स्थानाची निर्मिती करण्यात आली.
खऱ्या संत सत्पुरुषाप्रमाणेच परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर हे स्वतः प्रसिद्धीपराडमुख होते. त्यांच्यामध्ये असलेल्या तेजाचे तसेच वैश्विक शक्तीचे त्यांनी कधीही प्रदर्शन केले नाही. अनेक व्यक्तींच्या जीवनामधील अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणे; जे सर्व सामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडे होते; अशा अनेक समस्या परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी लिलया सोडवून यांच्यामध्ये असलेले अलौकिक अलौकिकत्वाचे साक्षात्कारी दर्शन घडवले. अनेक गरजू व चिंताग्रस्त जीवांना त्यांनी मानसिक शांतता तर मिळवून दिलीच; तसेच त्यांना सन्मार्गाला लावून त्यांच्या लौकिक जीवनातही सुधारणा घडवून आणली. त्यांची ही महती समाजापर्यंत पोचवणं हे त्या शक्तीचा लाभ झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे नैतिक कर्तव्य होते नव्हे, आहे. आणि या कर्तव्याच्या जाणिवेतूनच परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या प्रार्थना स्थळाची मुहुर्तमेढ ९ जुलै २००० या दिवशी रोवण्यात आली.
तसे पाहता परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे स्थान होणे ही त्यांच्या सद्गुरूंचीच म्हणजे श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचीच इच्छा होती. कारण ९ जुलै २००० या पादुका स्थानाच्या स्थापनेच्या दिवशी परमपूज्य सद्गुरु आनंद योगेश्वरांनी आपल्या भक्तांना त्या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हटले की "आजचा दिवस हा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सगुण रूपात कार्य करण्यास सुरुवात करण्याचा दिवस आहे." अर्थात याची पायाभरणी सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांनी चार वर्षांपूर्वीच करून घेतली होती , जेव्हा त्यांनी आपल्या अनुग्रहित शिष्यांच्या माध्यमातून स्वतःवरील अनेक आरत्या व कवने स्फूर्ति देऊन करून घेतली होती. तसेच "दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरुभाऊ दिगंबरा" व "हे वासुदेव श्रीगुरुदत्त आनंदयोगेश्वर निळकंठ" हे दोन अक्षरब्रह्म असे नाम जपही करून घेतले होते.
हे सर्व करण्यामागे त्यांच्या देहामध्ये असलेल्या परमर्ईश्वरीय तत्त्वाची ओळख समाजाला करून देणे हाच एक उदात्त हेतू होता. कारण निसर्ग नियमानुसार कोणताही देहं आज ना उद्या पंचतत्वामध्ये विलीन होणार आहेच. पण अद्वितीय अशा गुरुपरंपरेनुसार सद्गुरु भाऊंमध्ये असलेले 'सत्' या अविनाशी व शाश्वत तत्त्वाचा पुढील समाजाला प्रेरणादायक होण्यासाठी चैतन्यमय व एकत्रित स्वरूपात संचय होणे आवश्यक होते. याच उद्देशाने सद्गुरु भाऊमहाराज सगुण रूपात असताना त्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या कृपाशीर्वादाने 'आनंदयोग धाम' या त्यांच्या पादुकास्थानाची वाटचाल श्री. विकास खामकर व सौ. श्रद्धा खामकर यांच्या माध्यमातून सुरू झाली; जी आजतागायत त्यांच्याच कृपेने उत्तमरीत्या चालू आहे.
या वाटचालीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये अनेक भक्त या कार्यामध्ये सहभागी झाले. परंतु कालांतराने अनेकांनी आपली अंगे काही ना काही कारणास्तव काढून घेतली. अनेकांनी तर टीकासुद्धा केली की 'सद्गुरु भाऊमहाराजांच्या स्थानाची गरजच काय आहे.' दुर्दैवाने अशी टीका करणारे सद्गुरु भाऊंचे काही भक्तच होते. काही लोकांनी देखाऊपणाचा मदतीचा हात देऊ केला होता. पण परमपूज्य सद्गुरु भाऊमहाराजांनी देह ठेवल्यानंतर अशा भक्तांनी या कार्यातून अंग काढून घेतले व या कार्याची तसेच हे कार्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या खामकर दांपत्यावर चारी बाजूने सामाजिक तसेच वैयक्तिकरित्या बदनामीचे प्रहार केले. व प. पू. आनंदयोगेश्वरांनी हे कार्य सुरू करतांना या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना दिली होती. त्यावेळीचे त्यांचे शब्द होते "तुमच्याबरोबर शेवटी पाच माणसे ही उरणार नाहीत कारण ही सर्व भाऊंच्या देहात अडकलेली आहेत. काही माणसे चपलाही मारायला कमी करणार नाहीत. पण लोकांच्या चपला तुम्हाला लागणार नाहीत याची काळजी महाराज घेतील." हे त्यांचे वचन सद्गुरु आनंद योगेश्वर आजतागायत पाळत आहेत.
ज्या ठिकाणी सुरुवातीला हे प्रार्थना स्थळ तात्पुरते म्हणून सुरू केले होते त्यांनीही सद्गुरु भाऊमहाराजांनी देह ठेवल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी हे प्रार्थना स्थळ, म्हणजेच फक्त दर रविवारी संध्याकाळी होणारी आरती, चालू ठेवण्यास असमर्थता दर्शवली व हे प्रार्थना स्थळ ताबडतोब तेथून हलवण्यास सांगितले. पहिला पर्याय म्हणून खामकर दांपत्याने सद्गुरु भाऊंनी स्वकष्टाने त्यागाने निर्माण केलेल्या त्यांच्या सद्गुरूंच्याच वास्तूमध्ये हे प्रार्थना स्थळ हलवण्याचा प्रस्ताव तेथील व्यवस्थानापुढे ठेवला. पण त्यांनीही याबाबत असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे या प्रार्थना स्थळाची म्हणजेच परमपूज्य सद्गुरु आनंद योगेश्वरांची चैतन्यमय स्पंदनाची स्थापना 'सद्गुरु इच्छा' असे समजून खामकर दांपत्याने आपल्या स्वतःच्या घरी केली. या ठिकाणी एक अनुभव सांगणे आवश्यक वाटते तो म्हणजे प्रार्थना स्थळाच्या स्थापनेच्या वेळेला सद्गुरूंसाठी जी लाकडाची मखर तयार करण्यात आली होती ती बरोब्बर एक सूत सुद्धा मागे पुढे न होता खामकरांच्या घरी अशा ठिकाणी बसली ज्या ठिकाणी परमपूज्य भाऊ महाराजांनी १९९७ साली स्वतःची खुर्ची ठेवण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे दत्त माहात्माच्या पाराण्याच्या उद्यापनाच्या दिवशी प.प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज त्याच ठिकाणी विलीन झाले असेही स्वतः सद्गुरु भाऊंनीच तेंव्हा सांगितले होते.
परमपूज्य आनंद योगेश्वरांसारख्या सत्पुरुषाची जाज्वल्य स्पंदने एकत्रित स्वरूपात जागृत ठेवणे ही सोपी गोष्ट नसून एक मोठे आव्हानच होते. पण त्यांचे कार्य त्यांनी स्वतःच चालू ठेवले याचे सविस्तर वर्णन 'सद्गुरु आनंद योगेश्वर.... एक साक्षात्कारी अनुभूती भाग १' या पुस्तकात आले आहे. आम्ही फक्त सद्गुरूंनी दाखवलेल्या 'नामा'च्या मार्गावर पूर्ण विश्वास ठेवून अथक चालत राहिलो. कालांतराने सत्याचाच विजय झाला आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 'आनंदयोग धाम'' ची वाटचाल समर्थपणे होऊ लागली. (हे म्हणण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी नियमितपणे येणाऱ्या भक्तांना; ज्यांनी कधी सद्गुरु भावना प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते, सद्गुरु भाऊंच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना आलेल्या अनुभवातून झाली.) या वाटचालीतील एक मैलाचा दगड म्हणजे सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने केलेल्या एका वर्षात ७५ ठिकाणी नामस्मरणी करण्याचा संकल्प केवळ नऊ महिन्यात पूर्ण होणे हा होता. त्याचप्रमाणे या नामस्मरणी यात्रेच्या वेळी सद्गुरू कृपेने झालेल्या अनेक सत्पुरुषांची भेट हा ही या वाटचालीतील मोलाचा ठेवा आहे. यापैकी सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचे अध्यात्मिक वारस असलेले सर्वश्री परमपूज्य विनूअण्णा महाराज हे आम्हा भक्तांना सद्गुरूंच्या या महत् कार्यात लाभलेले सगुण रुपातील मार्गदर्शक गुरु आहेत. हे विधिलिखितच असावं याची प्रचिती आम्हाला पुढील काळात वेळोवेळी मिळालीच. पण चिपळूण या ठिकाणी असलेल्या परमपूज्य प्रसादे महाराजांकडे आम्ही जेव्हा मार्गदर्शनाची अपेक्षा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की "या कार्यात तुम्हाला संपूर्ण व योग्य मार्गदर्शन करणारे सद्गुरु याच यात्रेमध्ये भेटतील." याबाबतीत सविस्तर वर्णन 'सद्गुरु आनंद योगेश्वर.... एक साक्षात्कारी अनुभूती भाग २' या मध्ये आले आहे. भाविक तसेच मुमुक्षु आर्त भक्तांना मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक (भाग १ व २) या साइटवर उपलब्ध केले जाईल.
'जे जे घडले त्यामागे ईश्वरी इच्छाच कार्यरत होती' हेच सत्य आहे आपण केवळ निमित्त मात्र असतो.
|